no images were found
जिल्हा परिषदेत प्रतिष्ठापना केलेल्या श्री गणेशाचे हिंदू एकता आंदोलनाकडून दर्शन
कोल्हापूर, : जिल्हा परिषद कोल्हापूर येथे गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर प्रतिष्ठापना करण्यात आलेल्या श्री गणेशाचे दर्शन गुरुवारी हिंदू एकता आंदोलनाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी घेतले.
जिल्हा परिषद प्रशासनाने गणेशोत्सव साजरा करण्यास सुरुवातीला विरोध केल्यानंतर हिंदू एकता आंदोलनाने याबाबत तीव्र भूमिका घेत जिल्हा परिषदेत गणेशोत्सव साजरा करण्याचा इशारा दिला होता. त्यानंतर प्रशासनाने आपली भूमिका बदलत जिल्हा परिषद कार्यालयात श्री गणेशाची प्रतिष्ठापना केली. या पार्श्वभूमीवर हिंदू एकता आंदोलनाच्या कार्यकर्त्यांनी गुरुवारी जिल्हा परिषदेत जाऊन गणरायाचे दर्शन घेतले.
दरम्यान, कार्यकर्त्यांनी शिवसेनेचे जिल्हा परिषद सदस्य शिवाजी जाधव यांची भेट घेतली. तसेच जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष, सर्व जिल्हा परिषद सदस्य तसेच जिल्हा परिषद कर्मचारी यांना गणेशोत्सवाच्या शुभेच्छा देण्यात आल्या.
यावेळी बोलताना हिंदू एकता आंदोलनाचे जिल्हाध्यक्ष दिपक देसाई म्हणाले, “आज आम्ही जिल्हा परिषदेत विरोध झुगारून प्रतिष्ठापना करण्यात आलेल्या श्री गणेशाचे दर्शन घेतले. गणरायाकडे आम्ही प्रार्थना केली आहे की, गणेशोत्सवासारख्या पवित्र उत्सवाच्या परंपरा बंद पाडण्याचा प्रयत्न करणाऱ्या तसेच समाजात तेढ निर्माण करू पाहणाऱ्या समाजकंटकांना सुबुद्धी मिळावी.”
गणेशोत्सव हा श्रद्धा, संस्कृती आणि सामाजिक एकोप्याशी जोडलेला उत्सव असून, अशा परंपरा जपण्यासाठी सर्वांनी सकारात्मक भूमिका घ्यावी, असे आवाहनही हिंदू एकता आंदोलनाच्या वतीने करण्यात आले.
गणेशोत्सवाच्या निमित्ताने जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष, सदस्य आणि कर्मचाऱ्यांना शुभेच्छा देत सर्वांनी शांततेत, भक्तिभावाने आणि सामाजिक सलोखा राखत गणेशोत्सव साजरा करावा, असा संदेश देण्यात आला.
यावेळी हिंदू एकता आंदोलनाचे शहराध्यक्ष विलास मोहिते, हिंदुराव शेळके, आनंदराव कवडे, अनिरुद्ध कोल्हापूरे, राजेंद्र करंबे, काडाप्पा हिरेमठ यांच्यासह अन्य हिंदुत्ववादी कार्यकर्ते उपस्थित होते.