no images were found
विविध विचारप्रवाहांमध्ये संवाद हाच रानडे यांच्या प्रबोधनाचा संदेश: कुलगुरू डॉ. राजनीश कामत
कोल्हापूर, : विचारांमधील मतभेद समाजाच्या प्रबोधनासाठी आवश्यक असले, तरी त्यातून मनभेद निर्माण होऊ नयेत. विविध विचारप्रवाहांमध्ये संवाद कायम ठेवणे, हीच महाराष्ट्राच्या प्रबोधन परंपरेची खरी ताकद असून आजच्या काळात न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांचा हा विचार अधिक समर्पक आहे, असे प्रतिपादन शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. राजनीश कामत यांनी आज येथे केले.
शिवाजी विद्यापीठाच्या इतिहास अधिविभागाच्या वतीने आयोजित ‘न्या. महादेव गोविंद रानडे: काळ आणि कर्तृत्व’ या विषयावरील दोनदिवसीय कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी प्र-कुलगुरू डॉ. ज्योती जाधव, ज्येष्ठ विचारवंत किशोर बेडकिहाळ आणि अर्थशास्त्रज्ञ डॉ. नीरज हातेकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
कुलगुरू डॉ. कामत म्हणाले, रानडे यांचे कर्तृत्व समजून घेण्यासाठी त्यांचा काळ समजून घेणे आवश्यक आहे. रानडे हे बहुआयामी व्यक्तिमत्त्व होते. त्यांचे मोठेपण केवळ त्यांनी भूषविलेल्या पदांमध्ये नसून त्यांनी उभारलेल्या संस्थांमध्ये आहे. विधवा पुनर्विवाह मंडळ, पुणे सार्वजनिक सभा, प्रार्थना समाज, डेक्कन एज्युकेशन सोसायटी, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस आणि राष्ट्रीय सामाजिक परिषद यांसारख्या संस्थांच्या उभारणीत त्यांचे योगदान महत्त्वपूर्ण आहे. व्यक्ती येतात आणि जातात; मात्र संस्था विचारांना दीर्घायुष्य देतात, असा त्यांचा विश्वास होता. संस्था उभारण्याबरोबरच त्यांनी नेतृत्वही घडविले. त्यांचे शिष्य गोपाळकृष्ण गोखले यांना महात्मा गांधी यांनी आपले राजकीय गुरू मानले, तर प्रार्थना समाजाच्या विचारपरंपरेतून महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांनी अस्पृश्यता निवारणाचे कार्य पुढे नेले. त्यामुळे रानडे हे केवळ समाजसुधारक नव्हते, तर समाजसुधारक घडविणारे मार्गदर्शक होते, असे डॉ. कामत यांनी नमूद केले.
‘छत्रपती शिवाजी महाराजांचा उदय हा लोकशक्तीचा उदय’रानडे यांच्या इतिहासविषयक दृष्टिकोनाचा संदर्भ देताना ते म्हणाले की, परकीय इतिहासकार मराठ्यांच्या उदयाकडे प्रामुख्याने लष्करी विजयाच्या दृष्टिकोनातून पाहत होते. मात्र, रानडे यांनी ‘Rise of the Maratha Power’ या ग्रंथातून छत्रपती शिवाजी महाराजांचा उदय हा केवळ एका राजसत्तेचा किंवा लष्करी शक्तीचा उदय नसून तो लोकशक्तीचा उदय असल्याचे अधोरेखित केले. या भूमीची वैचारिक आणि आध्यात्मिक जडणघडण संतपरंपरेने आधीच केली होती, हा विचारही त्यांनी मांडला.
रानडे यांचे अर्थविषयक विचारही काळाच्या पुढचे होते. ‘भारतीय अर्थशास्त्रावरील निबंध’ या १८९८ मधील ग्रंथात त्यांनी अर्थशास्त्राचे नियम सर्व देशांना एकाच पद्धतीने लागू होऊ शकत नाहीत, हे स्पष्ट केले. परदेशातील आर्थिक प्रारूपे जशीच्या तशी स्वीकारण्याऐवजी भारताच्या परिस्थितीला अनुरूप आर्थिक प्रारूप विकसित करण्याची गरज त्यांनी मांडली, असेही कुलगुरूंनी सांगितले.
‘व्याख्यानांचे पुस्तक व्हावे’
या दोन दिवसीय कार्यशाळेत होणारे विचारमंथन केवळ चर्चेपुरते मर्यादित न राहता त्याचे पुस्तकाच्या स्वरूपात प्रकाशन व्हावे, अशी अपेक्षाही कुलगुरू डॉ. कामत यांनी व्यक्त केली. शिवाजी विद्यापीठाच्या वतीने या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात येईल, अशी ग्वाही त्यांनी दिली.
सुरवातीला डॉ. अवनीश पाटील यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. डॉ. नीलांबरी जगताप यांनी आभार मानले. कार्यक्रमाला डॉ. भारती पाटील, डॉ. अरुण भोसले, डॉ. नागोराव कुंभार, डॉ. रणधीर शिंदे, डॉ. नंदकुमार मोरे, डॉ. दत्तात्रय मचाले. उमाकांत हत्तीकट यांच्यासह इतिहास अभ्यासक, संशोधक, विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.