no images were found
महापालिकेच्या क्रीडा विकासासाठी सर्वंकष क्रीडा धोरण तयार करणार- सभापती विजयसिंह खाडे-पाटील
क्रीडा सुविधांचा आढावा, ऑलिम्पिक मिशन, फुटबॉल स्टेडियम आणि जलतरण तलाव सुरू करण्यासाठी प्रयत्न
कोल्हापूर : कोल्हापूर महानगरपालिकेच्या क्रीडा सुविधांचा विकास, स्थानिक खेळाडूंना प्रोत्साहन आणि शहरात आंतरराष्ट्रीय दर्जाच्या क्रीडा सुविधा निर्माण करण्याच्या दृष्टीने महापालिकेचे स्वतंत्र सर्वंकष क्रीडा धोरण तयार करण्यात येणार आहे. तसेच शालेय स्तरावरून गुणवंत महापालिकेच्या शाळेतील खेळाडू शोधून त्यांना ऑलिम्पिक स्पर्धांच्या तयारीसाठी शिष्यवृत्ती देण्याच्या उद्देशाने ‘मिशन ऑलिम्पिक’ उपक्रम राबविण्याचा मानस असल्याची माहिती क्रीडा समिती सभापती विजयसिंह खाडे-पाटील यांनी दिली.
महानगरपालिकेच्या स्थायी समिती सभागृहात क्रीडा समितीची पहिली सर्वसाधारण सभा पार पडली. या सभेमध्ये शहरातील क्रीडा सुविधांचा आढावा, क्रीडा धोरणाची निर्मिती आणि स्थानिक खेळाडूंना आर्थिक पाठबळ देणे या तीन प्रमुख विषयांवर चर्चा करण्यात आली. महापालिकेच्या अखत्यारित असलेली क्रीडांगणे, जलतरण तलाव, इनडोअर क्रीडा सुविधा आदींचा सविस्तर आढावा घेण्यात आला. या आढाव्याचा लेखी अहवाल पुढील सभेपूर्वी सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या. राज्य शासन आणि केंद्र शासनाच्या क्रीडा धोरणांच्या धर्तीवर महापालिकेचे स्वतंत्र क्रीडा धोरण तयार करण्यात येणार आहे. यासाठी आवश्यक असणारे क्रीडा अधिकारी आणि अधिनस्त कर्मचारी यांची पदे उपलब्ध करून देण्याच्या सूचना यावेळी करण्यात आल्या.
शहरातील स्थानिक खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी ‘मिशन ऑलिम्पिक’ हा उपक्रम राबविण्यात येणार असून महापालिका स्तरावर शालेय विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्याचा प्रस्ताव आहे. या माध्यमातून महापालिकेच्या शाळेतील गुणवंत खेळाडूंचा शोध घेऊन त्यांना ऑलिम्पिक स्पर्धेच्या तयारीसाठी आवश्यक प्रशिक्षण आणि शिष्यवृत्ती देण्याचा निर्णय क्रिडा समितीने केला आहे. दुधाळी मैदानावरील महापालिकेच्या शूटिंग रेंजचा प्रलंबित प्रस्ताव मार्गी लावण्यासाठी शासनाकडे निधी मिळविण्याचा पाठपुरावा करण्याचे सर्वानुमते ठरविण्यात आले. तसेच अनेक दिवसांपासून बंद असलेला अंबाई टँक जलतरण तलाव पुन्हा सुरू करण्यासाठी जिल्हा नियोजन व विकास समितीकडे (डीपीडीसी) सादर केलेला प्रस्ताव मंजूर करून घेण्याचा निर्णय घेण्यात आला. आगामी उन्हाळ्यापूर्वी हा जलतरण तलाव सुरू करण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहेत.
तसेच प्रभाग क्रमांक २० मधील सुमारे पाच एकर ओपन स्पेस जागेवर भव्य फुटबॉल स्टेडियम उभारण्याचा प्रस्ताव तयार करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. यामुळे कोल्हापूरच्या फुटबॉल खेळाला अधिक प्रोत्साहन व खेळाडू तयार होण्यास मदत होणार आहे. याशिवाय पूर्वी महापालिकेच्या वतीने आयोजित करण्यात येणाऱ्या महापौर चषकांतर्गत विविध क्रीडा स्पर्धा पुन्हा सुरू करण्याचा मानस व्यक्त करण्यात आला. यामध्ये महापालिका अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठीही स्वतंत्र क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात येणार आहे.
क्रीडा समितीच्या माध्यमातून विविध उपक्रमांना गती देण्यासाठी आयुक्तांकडे स्वतंत्र अर्थसंकल्पीय तरतूद करून निधी उपलब्ध देण्याची मागणी करण्यात आली. महापालिकेचे बंधनकारक खर्च वगळून अर्थसंकल्पातील क्रीडा क्षेत्रासाठी मंजूर असलेली पाच टक्के तरतूद प्रत्यक्ष क्रीडा विकासासाठी उपलब्ध करून द्यावी अशी मागणीही यावेळी करण्यात आली. अशा सर्व सदस्यांनी आपल्या विविध सूचना मांडल्या.
यावेळी यावेळी क्रिडा उपसभापती रोहित कवाळे, उपआयुक्त किरणकुमार धनवाडे, मुख्य लेखापरिक्षक कलावती मिसाळ, नगरसचिव दिवाकर कारंडे, सदस्य अश्किन आजरेकर, विजयसिंह देसाई, प्रमोद देसाई, ऋतूराज क्षिरसागर, सचिन शेंडे, प्रशांत खेडकर, पुष्पा नरुटे, आरोग्याधिकारी डॉ.प्रकाश पावरा, इस्टेट ऑफिसर शेखर साळोखे, कनिष्ठ अभियंता मीरा नगीमे, सागर शिंदे, क्रिडा निरिक्षक सचिन पांडव उपस्थित होते.