no images were found
महारेशीम अभियान 2023: शेतकऱ्यांना संपर्क करण्याचे आवाहन
कोल्हापूर : जिल्ह्यात महारेशीम अभियान 2023 राबविण्यात येत असून या अंतर्गत नवीन तुती क्षेत्र नोंदणीचा कार्यक्रम 15 डिसेंबरपर्यंत असणार आहे. इच्छुक शेतकऱ्यांनी जिल्हा रेशीम कार्यालयाशी संपर्क साधण्याचे आवाहन जिल्हा रेशीम अधिकारी राजेश कांबळे यांनी केले आहे. जिल्हा रेशीम कार्यालयातर्फे महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत तुती लागवडीव्दारे रेशीम कोष उत्पादन योजना राबविण्यात येत आहे. यात लाभार्थी निवडताना अनुसुचित जाती, अनुसुचित जमाती, विमुक्त जमाती, दारिद्रय रेषेखालील कुटुंबे, शारीरिक अपंगत्व प्रधान कुटुंबे, भूसुधार योजनेचे लाभार्थी, कृषी कर्ज माफी योजनेनुसार अल्प भूधारक सीमांत शेतकऱ्यांना निवडण्यात येणार आहे. योजनेअंतर्गत रेशीम विकास प्रकल्पासाठी तीन वर्षामध्ये अकुशल व कुशल मजुरी देण्यात येते. यात तुती लागवड व जोपासनेसाठी 682 मनुष्य दिवस व किटक संगोपन गृहासाठी 213 दिवस असे एकूण 895 दिवसांची मजुरी देण्यात येते. स्वत: मजुर म्हणून स्वत:च्या शेतात काम करणे आवश्यक आहे.
लाभार्थी निवडताना इच्छुक लाभार्थ्यांकडे मध्यम ते भारी व पाण्याची निचरा होणारी जमीन असावी. नवीन तुती लागवड क्षेत्रासाठी सिंचनाची पुरेशी सोय उपलब्ध असणे आवश्यक आहे. सर्व खर्च वजा जाता एकरी वार्षिक किमान दिड लाख रुपये उत्पन्न निश्चित मिळेल. जिल्ह्यात रेशीम शेती उद्योगासाठी वाव आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी आठमाही सिंचनाची सोय व खर्च करण्याची तयारी असलेल्या शेतकऱ्यांनी जिल्हा रेशीम कार्यालय, 564 ई वॉर्ड, व्यापारी पेठ, शाहुपुरी, कोल्हापूर 416001 येथे संपर्क साधावा, असेही श्री. कांबळे यांनी कळविले आहे.
अधिक माहितीसाठी 0231-2654403 व 2666682 वर संपर्क साधावा.