Home साहित्यिक बदलत्या सामाजिक परिस्थितीतही खांडेकरांचे साहित्य प्रस्तुत: डॉ. भालचंद्र मुणगेकर

बदलत्या सामाजिक परिस्थितीतही खांडेकरांचे साहित्य प्रस्तुत: डॉ. भालचंद्र मुणगेकर

14 second read
0
0
7

no images were found

  बदलत्या सामाजिक परिस्थितीतही खांडेकरांचे साहित्य प्रस्तुत: डॉ. भालचंद्र मुणगेकर

कोल्हापूर : मानवी जीवनातील नैतिक द्वंद्व, स्त्री-पुरुष संबंध, सामाजिक विषमता, शिक्षणाचे उद्दिष्ट आणि शोषणमुक्त समाजाची आकांक्षा यांचा वेध घेणारे, वि. स. खांडेकरांचे साहित्य आजच्या बदलत्या सामाजिक परिस्थितीतही तितकेच प्रस्तुत आहे. त्यांच्या साहित्याचा गाभा मानवी जीवनाच्या सार्वकालिक प्रश्नांशी जोडलेला असल्याने नव्या पिढीने खांडेकरांना केवळ अभ्यासक्रमापुरते न पाहता त्यांच्या साहित्याचा नव्याने शोध घेण्याची गरज आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ व विचारवंत डॉ. भालचंद्र मुणगेकर यांनी आज केले.

शिवाजी विद्यापीठाचा मराठी अधिविभाग आणि आंतरभारती शिक्षण मंडळ, कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित वि. स. खांडेकर सुवर्ण स्मृतिवर्षाच्या सांगता समारंभात ‘वि. स. खांडेकर : सुवर्ण स्मरण’ या विषयावर विशेष स्मृती व्याख्यान देताना ते बोलत होते. अध्यक्षस्थानी प्र-कुलगुरू डॉ. ज्योती जाधव होत्या. आंतरभारती शिक्षण मंडळाच्या अध्यक्षा सुचेता कोरगावकर, माजी कुलगुरू डॉ. माणिकराव साळुंखे, डॉ. सुनीलकुमार लवटे, खांडेकरांचे नातू डॉ. अतुल कापडी प्रमुख उपस्थित होते.

खांडेकरांच्या ‘ययाती’ची आजची प्रस्तुतता १९६०च्या दशकापेक्षाही अधिक असल्याचे सांगताना डॉ. मुणगेकर यांनी ‘क्रौंचवध’मधील दिनकर-सुलोचना यांच्या नात्यातून शारीरिक वासनेपलीकडील आंतरिक प्रेम, तर ‘ययाती’मधून पुरुषप्रधान व्यवस्थेतील स्त्रीच्या शोषणाचे टोकदार चित्रण खांडेकरांनी केले असल्याचे नमूद केले. मानवी जीवनातील विविध टोकांमधील संघर्ष आणि त्याचा आलेख मांडणारा साहित्यिक म्हणून खांडेकरांचे महत्त्व अधोरेखित होते, असेही त्यांनी सांगितले.

डॉ. मुणगेकर यांनी खांडेकरांच्या विविध साहित्यकृतींच्या आधारे त्यांच्या लेखनातील मानवी जीवनाचा व्यापक पट उलगडला. ते म्हणाले, खांडेकरांच्या साहित्यातून उपभोगवाद, पुरुषप्रधान मानसिकता आणि मानवी वासनेचा संघर्ष, प्रेम, त्याग, नैतिकता आणि हिंसेविषयीची भूमिका आजच्या समाजातील अनेक प्रश्नांशी थेट संवाद साधते. खांडेकर केवळ अलंकारिक भाषेचे साहित्यिक नव्हते, तर मानवी जीवनाचे भाष्यकार होते. जीवनात निर्मळता, सुसंस्कृतपणा, ध्येयनिष्ठा आणि शोषणमुक्त समाज निर्माण व्हावा, हे त्यांच्या साहित्यामागील मूलभूत स्वप्न होते. त्यामुळे त्यांच्या साहित्याची प्रासंगिकता काळाच्या पुढेही टिकून राहते.

“‘क्रौंचवध’चा माझ्या जीवनावर मोठा प्रभाव”

       ‘क्रौंचवध’मधील दिनकरच्या व्यक्तिरेखेने मला इतके प्रभावित केले की, माझ्या आयुष्याची वाटचालही त्याच मार्गाने व्हावी, अशी इच्छा निर्माण झाली. विद्यार्थीदशेतील त्या साहित्यिक अनुभवाने मला जीवन जगण्याची प्रेरणा दिली. गेल्या पन्नास वर्षांच्या माझ्या जीवनप्रवासात खांडेकरांचे ऋण अग्रस्थानी आहे आणि अखेरच्या श्वासापर्यंत ते माझ्यावर राहील, अशी कृतज्ञ भावना डॉ. भालचंद्र मुणगेकर यांनी यावेळी व्यक्त केली.

       माजी कुलगुरू डॉ. माणिकराव साळुंखे यांनी खांडेकरांचे साहित्य हे केवळ एका पिढीपुरते मर्यादित नसून आजच्या कृत्रिम बुद्धिमत्ता आणि तंत्रज्ञानाच्या युगातही तितकेच महत्त्वाचे असल्याचे सांगितले. ते म्हणाले, तंत्रज्ञानामुळे माणूस अधिक सामर्थ्यवान झाला असला, तरी तो अधिक ‘माणूस’ झाला आहे का, हा प्रश्न आज विचारण्याची गरज असून खांडेकरांच्या साहित्याचा केंद्रबिंदू असलेली माणुसकी, नैतिकता, संवेदना, सामाजिक बांधिलकी आणि जीवनदृष्टी आजच्या पिढीला दिशादर्शक ठरू शकते. विद्यार्थ्यांच्या हातात केवळ पदवी नव्हे, तर विचार; केवळ कौशल्य नव्हे, तर विवेक आणि रोजगारासाठीच नव्हे, तर जीवनासाठी शिक्षण देणे, हीच खऱ्या अर्थाने खांडेकरांना आदरांजली ठरेल, असे त्यांनी नमूद केले.

       ज्येष्ठ विचारवंत डॉ. सुनीलकुमार लवटे यांनी वि. स. खांडेकर यांचे शिवाजी विद्यापीठाशी स्थापनेपासूनच अतूट नाते राहिले असल्याचे सांगितले. ते म्हणाले, विद्यापीठाच्या पहिल्या अधिसभेचे राज्यपाल नियुक्त सदस्य म्हणून खांडेकरांनी प्रारंभीच्या काळात विद्यापीठाला मार्गदर्शन केले, तर ज्ञानपीठ पुरस्कारानंतर त्यांना मानद डी.लिट. पदवी देणारे महाराष्ट्रातील शिवाजी विद्यापीठ हे एकमेव विद्यापीठ ठरले. शिवाजी विद्यापीठाने साकारलेले खांडेकरांचे स्मृती संग्रहालय म्हणजे विद्यापीठाने खांडेकरांविषयी जपलेल्या आदरभावाचेच प्रतीक आहे.

अध्यक्षीय मनोगतात प्र-कुलगुरू डॉ. ज्योती जाधव यांनी कृत्रिम बुद्धिमत्तेच्या युगातही साहित्यिकांच्या प्रत्यक्ष विचारांतून आणि अनुभवांतून मिळणाऱ्या संस्कारांचे महत्त्व अधोरेखित केले. त्या म्हणाल्या, आज माहिती आणि भाषणे काही क्षणांत कृत्रिम बुद्धिमत्तेच्या माध्यमातून उपलब्ध होत असली, तरी प्रत्यक्ष दिग्गज साहित्यिकांचे विचार ऐकताना मिळणारा भावनिक आणि मानवी स्पर्श कृत्रिम बुद्धिमत्तेला पर्याय ठरू शकत नाही. खांडेकरांच्या साहित्यात केवळ एका पिढीला नव्हे, तर पुढील पिढ्यांनाही घडविण्याची क्षमता असल्याने अशा साहित्यिकांच्या विचारांशी विद्यार्थ्यांचा प्रत्यक्ष संवाद घडविणारे कार्यक्रम सातत्याने होत राहणे आवश्यक आहे.

यावेळी सुचेता कोरगावकर आणि डॉ. अतुल कापडी यांनीही खांडेकरांविषयीच्या आठवणींना उजाळा दिला. मराठी अधिविभागाचे प्रमुख डॉ. रणधीर शिंदे यांनी स्वागत, प्रास्ताविक व परिचय करून दिला. प्रांजली क्षीरसागर यांनी सूत्रसंचालन केले, तर डॉ. सुखदेव एकल यांनी आभार मानले.

कार्यक्रमाला डॉ. शरद नावरे, बी.एस. पाटील, डॉ. बी.एम. हिर्डेकर, डॉ. प्रवीण चौगुले, डॉ. अनिल गवळी, चंद्रकांत पोतदार, तनुजा शिपूरकर, डॉ. आर.जी. कुलकर्णी, डॉ. सागर देशपांडे यांच्यासह शिक्षक, आंतरभारती संस्थेतील शिक्षक व सेवक तसेच विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

खांडेकरांविषयी ग्रंथचर्चा व विशेषांकांचे प्रकाशन

दिवसभरात झालेल्या सत्रांमध्ये पुणे येथील प्रा. मिलींद जोशी व ज्येष्ठ पत्रकार डॉ. विजय चोरमारे यांच्या प्रमुख उपस्थितीत ‘वि.स.खांडेकर यांचे असंग्रहित लेखन व त्यांच्याविषयीचे ग्रंथ’ या विषयीचे सत्र पार पडले. अध्यक्षस्थानी कुलसचिव डॉ. विलास शिंदे होते. या सत्रात वि.स. खांडेकर लिखित वृंदावन (कादंबरी), आगरकर चरित्र, स्मृतींची चाळता पाने (संकीर्ण), अर्ध्यदान (काव्यसंग्रह प्रस्तावना) या ग्रंथांसह आंतरभारती: उगम आणि विकास (लेखक- डॉ. सुनीलकुमार लवटे), कुमारांसाठी वि.स. खांडेकर (ले. नीलम माणगावे), वि.स. खांडेकर: साहित्यिक आणि माणूस (ले. राम देशपांडे), वि.स. खांडेकर चरित्र (ले. डॉ. लवटे), वि.स. खांडेकर: एक ध्येयवादी शिक्षक (ले. जया दडकर) या पुस्तकांचेही प्रकाशन झाले. त्याचबरोबर साप्ताहिक साधना, दक्षिण महाराष्ट्र साहित्य पत्रिका, जडण-घडण, मेहता ग्रंथजगत या नियतकालिकांच्या खांडेकर सुवर्ण स्मृतिवर्ष विशेषांकांचेही प्रकाशन करण्यात आले.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In साहित्यिक
Comments are closed.

Check Also

स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या हजेरीची अचानक तपासणी ; 58 कर्मचाऱ्यांवर दंडात्मक कारवाई

स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या हजेरीची अचानक तपासणी ; 58 कर्मचाऱ्यांवर दंडात्मक कारवाई…