Home Uncategorized या गणेशोत्सवात चला करुया अष्टविनायक दर्शन

या गणेशोत्सवात चला करुया अष्टविनायक दर्शन

1 min read
0
0
7

no images were found

या गणेशोत्सवात चला करुया अष्टविनायक दर्शन

 “मंगलमूर्ती मोरया…” च्या गजराने अवघा महाराष्ट्र दुमदुमून जातो, तेव्हा प्रत्येक भक्ताचे मन एका अनामिक भक्ती रसात न्हाऊन निघते. महाराष्ट्राची आध्यात्मिक, सांस्कृतिक आणि धार्मिक ओळख ज्या विविध दैवतांनी समृद्ध केली आहे, त्यात अग्रस्थानी विराजमान आहेत ते म्हणजे सर्वांचे लाडके विघ्नहर्ता – श्री गणेश! भाद्रपद शुद्ध चतुर्थीला घराघरांतून आणि गल्लीबोळांतून होणारा श्री गणेशाचा जयघोष, दुर्वा-शमीची पत्री, जास्वंदाचे लालभडक फूल नि मोदकांचा दरवळणारा नैवेद्य हा केवळ उत्सव नसून तो मराठी माणसाच्या संस्कृतीचा श्वास आहे. या गणेशभक्तीचा खरा पाया आणि परमोच्च बिंदू म्हणजे महाराष्ट्रातील मानाची ‘अष्टविनायक’ स्थाने!

मोरेश्वर (मोरगाव)

अष्टविनायकांपैकी पहिला गणपती हा मोरगावचा मोरेश्वर आहे. गाणपत्य संप्रदायाचे हे महत्त्वाचे स्थान आहे. या गणपतीस श्री मयुरेश्वर असेही म्हणतात. थोर गणेशभक्त श्री मोरया गोसावी महाराज यांनी श्री मयुरेश्वराची  अत्यंत श्रध्देने भक्ती केली. प्रत्येक घरात म्हटली जाणारी ‘सुखकर्ता दुःखहर्ता’ ही आरती श्री समर्थ रामदास स्वामींना याच मंदिरात स्फुरली, असे मानले जाते. जवळच कऱ्हा ही नदी आहे. मंदिरावर अनेक प्रकारचे नक्षीकाम केलेले आहे. श्री मोरेश्वराच्या डोळ्यांत व बेंबीत हिरे बसवलेले आहेत. या मंदिराच्या भोवती  बुरूजसदृश  दगडी बांधकाम प्राचीन काळापासून आहे. पुणे जिल्ह्यातील बारामती तालुक्यात मोरगांव हे ठिकाण आहे. तर बारामतीपासून ३५ कि. मी. अंतरावर आहे.  जेजुरी हे सर्वात जवळचे रेल्वे स्थानक आहे ते मोरगावपासून अगदी १७ कि. मी. अंतरावर आहे.  या तीनही ठिकाणांपासून मोरगांवला जाण्यासाठी सार्वजनिक वाहतुकीची सोय आहे.

चिंतामणी (थेऊर)

अष्टविनायकांपैकी थेऊरचा श्री चिंतामणी हा दुसरा गणपती आहे. चिंचवडचे सत्पुरुष श्री चिंतामणी महाराज देव यांनी सुमारें ४० हजार रुपये खर्चून हे गणपती मंदिर बांधले. चिंचवडकर श्री नारायण महाराज तथा श्रीधरणीधर महाराज यांच्या काळात या वैभवात भर घालण्यात आली आहे. त्यानंतर सुमारे १०० वर्षांनीं थोरले माधवराव पेशवे यांनी देवालयाचा सागवानी लाकडाचा घडवलेला भव्य सभा मंडप श्रीचरणी समर्पित केला व देवळाचा विस्तार वाढविला.

     श्रीचिंतामणींची मूर्ती भव्य, पूर्वाभिमुख व डाव्या सोंडेची आहे. मूर्ती मांडी घालून बसलेल्या अवस्थेत आहे. श्री मंदिराचे मुख्य प्रवेशद्वार उत्तरमुखी असून श्री चिंतामणीचा विग्रह पूर्वाभिमुखी आहे. देवालयाचा महादरवाजा उत्तरेकडे तोंड करून आहे. मुख्य मंदिराच्या बाहेर तीन बाजूंना तीन कोनाड्यात तीन छोट्या मूर्ती आहेत. उत्तर दिशेला दक्षिणमुखी हनुमान स्थापित आहेत. श्री चिंतामणीच्या पाठीशी पश्चिमेला असणाऱ्या गणेशांना लंबोदर गणेश अशी संज्ञा आहे. श्री मुद्गल पुराणात पश्चिम दिशेची देवता म्हणून श्री लम्बोदरांचे वर्णन आहे. तर उत्तर दिशेला उत्तरेश्वर गणेशाची स्थापना केली आहे. मंदिरात प्रवेश करताच लक्ष वेधून घेणाऱ्या विशाल दीपमाला दिमाखात उभ्या आहेत. श्री चिमाजीअप्पा यांनी वसईच्या विजयाच्या वेळी पोर्तुगीजांकडून हस्तगत केलेली विशाल घंटा श्रीचिंतामणींच्या प्रांगणाचे एक विशेष आकर्षण आहे. या ठिकाणी भव्य कंदबवृक्ष आहे.

चिंतामणी गणपती मंदिर पुण्यापासून अवघ्या २५ किलोमीटर अंतरावर असल्यामुळे तथे पोहोचणे सोपे आणि सोयीस्कर आहे. पुणे-सोलापूर महामार्गावर वसलेले हे मंदिर सहज गाठता येते. एसटी बसेस आणि खासगी टॅक्सी सहज उलब्ध होतात.

सिद्धिविनायक (सिद्धटेक)

सिद्धटेकचा श्री सिद्धिविनायक हा अष्टविनायकांपैकी तिसरा गणपती. उजवी सोंड असणारा एकमेव अष्टविनायक हे भीमा नदीवर वसलेले सिद्धिविनायकाचे स्थान आहे.  या मंदिराचा जीर्णोध्दार बांधकाम आहिल्याबाई होळकरांच्या काळात झाले. मंदिरात आत जातांना डाव्या बाजूला शिवविष्णुसूर्यगणपती, आदिमाया असे पंचायतन आहे. श्रींचे मंदिर उत्तराभिमुख आहे. गाभारा १५ फूट उंच व १० फूट रूंद आहे. श्री सिद्धिविनायकाच्या भोवती चांदीचे मखर आहे. श्रींच्या डाव्या उजव्या बाजूला जय विजयाच्या मोठ्‍या मूर्ती आहेत. सिंहासन दगडी आहे. मधल्या गाभाऱ्यात देवाचे शेजघर आहे. सभामंडपाच्या पुढे महाद्वार आहे. त्यावर नगारखाना आहे.

     अहिल्यानगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यात हे ठिकाण असून दौंडपासून १९ कि. मी. अंतरावर आहे. तर राशिनपासून  २३ कि. मी. अंतरावर आहे. राशीन येथे पण जगदंबा देवीचे प्रसिद्ध मंदिर आहे आणि येथे जगप्रसिद्ध दगडाच्या हलत्या दीपमाळा प्रसिद्ध आहे. दौंडहून गेल्यास वाटेत भीमा नदी लागते, ती ओलांडायला होडी असते मात्र सध्या पूल झाला आहे.

    महागणपती (रांजणगाव)

अष्टविनायकांपैकी चौथा गणपती रांजणगावला आहे. या गणपतीला महागणपती असे म्हणतात. पुणेअहिल्यानगर  मार्गावर शिरूर तालुक्यात हे ठिकाण आहे. या गणेशाला ‘त्रिपुरारिवदे महागणपती’ असेही म्हटले जाते. श्री महागणपती डाव्या सोंडेचा असून गणेशाला कमळाचे आसन आहे. माधवराव पेशव्यांच्या काळात या मंदिराचा जीर्णोद्धार केल्याचे इतिहासात आढळते. इंदूरचे सरदार किबे यांनीदेखील या मंदिराचे नूतनीकरण केल्याचा उल्लेख आढळतो. त्यांनी या देवळातला लाकडी सभामंडप बांधून दिला आहे. हे श्री महागणपतीचे स्थान इ.स. १० व्या शतकातील आहे. श्री गणेशाला दहा हात आहेत आणि प्रसन्न व मनमोहक अशी पूर्वाभिमुख श्रींची मूर्ती आहे.रांजणगाव महागणपती मंदिराला पोहोचणे अत्यंत सोपे आणि सुखकर आहे. पुण्यापासून अवघ्या ५० किलोमीटर अंतरावर आहे.

विघ्नहर (ओझर)

अष्टविनायकांपैकी ओझरचा  विघ्नेश्वर हा पाचवा गणपती आहे.  श्रींच्या डोळ्यात माणिक असून, कपाळावर  हिरा  आहे.  अशी प्रसन्न व मंगल मूर्ती असलेला श्रीगणेश विघ्नांचे हरण करतो, म्हणून या गणपतीला विघ्नेश्वर म्हणतात. ही गणेशाची स्वयंभू मूर्ती आहे. मंदिराच्या चारही बाजूंना तटबंदी-बांधकाम असून, मध्यभागी गणेशाचे मंदिर आहे. कुकडी नदीच्या तीरावर असलेले हे मंदिर एक जागृत स्थान आहे. थोरल्या बाजीराव पेशव्यांचे बंधू चिमाजी अप्पा यांनी या मंदिराचा जीर्णोद्धार केल्याचा उल्लेख इतिहासात आढळतो.

    मंदिराच्या परिसरात भाविकांना राहण्यासाठी धर्मशाळेची उत्तम व्यवस्था आहे. जुन्नर तालुक्यातील हे स्थान लेण्याद्रीपासून १४ कि. मी. वर तर पुण्यापासून ८५ कि. मी. अंतरावर आहे. येथून जवळच आर्वी उपग्रह केंद्र व खोडद येथील आशिया खंडातील सर्वात मोठी इलेक्ट्रॉनिक दुर्बिण आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे जन्मस्थान असलेला शिवनेरी किल्ला हा देखील जवळच आहे.

गिरिजात्मज (लेण्याद्री)

अष्टविनायकापैकी सहावा गणपती लेण्याद्रीचा श्री गिरिजात्मज. किल्ले शिवनेरीच्या सान्निध्यात, जुन्नर तालुक्यातील प्राचीन जुन्नर लेण्यांच्या समुदायात आणि कुकडी नदीच्या परिसरात डोंगरावर श्री गिरिजात्मज गणेशाचे हे स्थान आहे. श्री गणेशाची प्रसन्न मूर्ती असून ती दगडामध्ये कोरलेली आहे. मंदिर परिसरातील खडकामध्ये कोरीवकाम, खोदकाम केलेले आहे. पेशवे काळात या मंदिराचा जीर्णोद्धार झाला होता. मंदिरात दगडी खांब आहेत व त्यावर वाघसिंहहत्ती असे सुंदर नक्षीकाम केलेले आहे. मंदिरात जाण्यासाठी अनेक पायऱ्या चढून जावे लागते. लेण्याद्रीचा श्री गिरिजात्मज हा जुन्नरपासून ७ कि.मी. अंतरावर आहे, तर पुण्यापासून सुमारे ९७ कि. मी. अंतरावर हे ठिकाण आहे.

वरदविनायक (महाड)

महाडचा वरदविनायक हा अष्टविनायकांपैकी सातवा गणपती आहे. श्री वरदविनायकाचे मंदिर साधे, कौलारू असून मंदिराला घुमट आहे व त्याला सोनेरी कळस आहे. कळसावर नागाची नक्षी आहे. मंदिरात दगडी महिरप असून गणेशाची मूर्ती सिंहासनारूढ आहे व उजव्या सोंडेची आहे. इ.स. १७२५ मध्ये पेशवे काळात हे मंदिर बांधले गेले. रायगड जिल्ह्यातील महाड हे पुणे-मुंबई राष्ट्रीय महामार्गावर खोपोली – खालापूरच्या दरम्यान आहे.

बल्लाळेश्वर (पाली)

पालीचा गणपती हा अष्टविनायकांपैकी आठवा गणपती आहे. या गणपतीला श्री बल्लाळेश्वर म्हणतात. मंदिर पूर्वाभिमुख आहे. गणेशाचे कपाळ विशाल असून डोळ्यात हिरे आहेत. मंदिर चिरेबंदी आहे. मंदिरात प्रचंड घंटा असून ती चिमाजी अप्पांनी अर्पण केली आहे. हे स्थान रायगड जिल्ह्यातील सुधागड तालुक्यात असून, सुधागड या भव्य किल्ल्याची पार्श्वभूमी व अंबा नदीच्या निसर्गरम्य सान्निध्यात बल्लाळेश्वराचे मंदिर वसले आहे. पालीपासून जवळच उन्हेरचे गरम पाण्याचे झरे व सरसगड हा प्राचीन किल्ला आहे.

      पाली खोपोलीपासून ३८ कि. मी. अंतरावर आहे तर पुण्यापासून १११ कि. मी. अंतरावर आहे. खोपोली – पेण रस्त्यावर पालीस जाण्यास रस्ता फुटतो, तर पनवेल – गोवा या राष्ट्रीय महामार्गावर वाकणपासून पालीस रस्ता जातो. भाद्रपद महिन्यातील चतुर्थीला या आठही ठिकाणी यात्रा भरते. सर्व जाती-धर्माचे लोक या ठिकाणी येऊन श्रद्धापूर्वक दर्शन घेतात. भाद्रपद शुद्ध चतुर्थी ते अनंत चतुर्दशी या काळात श्री गणेशाचा उत्सव सर्वत्र साजरा केला जातो.

       यात्रा अष्टविनायकाच्या आठ ही ठिकाणी भोजनाची व निवासाची उत्तम व्यवस्था आहे. अष्टविनायक दर्शनासाठी पुणेअहिल्यानगररायगड या तीन जिल्ह्यांतून प्रवास होतो. निरनिराळ्या रूपांत श्री गणेशमूर्ती आहेत. त्याही कुठे डोंगरात, खडकात, कुठे नदीकाठी आहेत, त्यामुळे अष्टविनायकाची यात्रा करणाऱ्या भाविकाला यात्रेबरोबरच पर्यटनाचाही अनुभव मिळतो. अशा या अष्टविनायकाची महती केवळ महाराष्ट्रापुरती नाही, तर संपूर्ण भारतभर पसरली आहे.

संकलन- संदिप राठोड,जिल्हा माहिती कार्यालय, कोल्हापूर

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In Uncategorized
Comments are closed.

Check Also

स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या हजेरीची अचानक तपासणी ; 58 कर्मचाऱ्यांवर दंडात्मक कारवाई

स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या हजेरीची अचानक तपासणी ; 58 कर्मचाऱ्यांवर दंडात्मक कारवाई…