no images were found
स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या हजेरीची अचानक तपासणी ; 58 कर्मचाऱ्यांवर दंडात्मक कारवाई
कोल्हापूर, : कोल्हापूर महानगरपालिका क्षेत्रातील सर्व 20 प्रभागांमध्ये आज उपायुक्त परितोष कंकाळ, मुख्य आरोग्य निरीक्षक जयवंत पवार व स्वच्छता समन्वयक यांनी आज सकाळी स्वच्छता कर्मचाऱ्यांची प्रत्यक्ष जाऊन अचानक हजेरीची तपासणी करण्यात आली. या तपासणीमध्ये कर्तव्यावर गैरहजर असलेल्या तसेच गणवेश न परिधान केलेल्या कर्मचाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली.
या तपासणीदरम्यान गणवेश न परिधान केलेल्या कर्मचाऱ्यांना प्रत्येकी 500 रुपये दंड करण्यात आला. तसेच विनापरवानगी गैरहजर राहिलेल्या 58 कर्मचाऱ्यांवर प्रत्येकी 1 हजार रुपये दंडात्मक कारवाई करण्यात आली. याशिवाय सातत्याने गैरहजर राहणाऱ्या 14 कर्मचाऱ्यांची नोंद घेण्यात आली असून त्यांच्याविरुद्ध पुढील कायदेशीर कारवाईची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
शहरातील स्वच्छता राखणे हे महानगरपालिका प्रशासनाचे सर्वोच्च प्राधान्याचे काम आहे. स्वच्छता कर्मचाऱ्यांनी आपली कर्तव्ये जबाबदारीने पार पाडणे आवश्यक असून या कामात कोणत्याही प्रकारचा हलगर्जीपणा अथवा कर्तव्यचुकारपणा खपवून घेतला जाणार नाही असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. याबाबत सर्व संबंधित कर्मचाऱ्यांना कडक सूचना देण्यात आल्या आहेत.
शहरातील स्वच्छता व्यवस्थेत अधिक शिस्त व कार्यक्षमता आणण्यासाठी अशा प्रकारच्या आकस्मिक हजेरी तपासण्या यापुढेही नियमितपणे करण्यात येणार आहेत. नागरिकांना स्वच्छ, सुंदर व आरोग्यदायी शहर उपलब्ध करून देण्यासाठी महानगरपालिका कटिबद्ध आहे.