no images were found
कोल्हापूर महानगरपालिकेच्या सेवा प्रवेश नियमावलीस शासनाची मान्यता
आयुक्त डॉ. राजेंद्र भारूड यांच्या पाठपुराव्याला यश; पदोन्नती व सरळ सेवा भरतीचा मार्ग मोकळा
कोल्हापूर, : कोल्हापूर महानगरपालिकेच्या सेवा प्रवेश नियमावलीस महाराष्ट्र शासनाची मान्यता मिळाली असून, याबाबतचे आदेश आज महानगरपालिकेस प्राप्त झाले आहेत. या मान्यतेमुळे महापालिकेतील पदोन्नती तसेच सरळ सेवा भरतीची प्रक्रिया राबविण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
यापूर्वी महानगरपालिकेच्या आकृतीबंधास शासनाची मान्यता मिळाली होती. मात्र, सेवा प्रवेश नियमावलीस मान्यता नसल्याने विविध संवर्गातील पदोन्नती व रिक्त पदे भरण्याची प्रक्रिया रखडली होती. शासनाच्या आजच्या निर्णयामुळे ही अडचण दूर झाली असून, प्रशासकीय कामकाजाला गती मिळणार आहे.
महापालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भारूड यांनी गेल्या दोन महिन्यांपासून शासन स्तरावर सातत्याने पाठपुरावा करून ही मान्यता मिळविण्यात महत्त्वाची भूमिका बजावली.
मान्यताप्राप्त आकृतीबंधामध्ये एकूण ४,४४५ पदे असून त्यामध्ये १९९ विविध संवर्गातील पदांचा समावेश आहे. या नियमावलीनुसार आयुक्त, अतिरिक्त आयुक्त, उपायुक्त, सहाय्यक आयुक्त आदी पदांसह विविध प्रशासकीय पदांसाठी शासन नियुक्ती व पदोन्नतीचे प्रमाण निश्चित करण्यात आले आहे. तसेच कामगार अधिकारी, रावका अधिकारी, महापालिका सचिव, उपसचिव, कर निर्धारक व संग्राहक, मुख्य उद्यान अधीक्षक, जनसंपर्क अधिकारी, ग्रंथपाल, विवाह नोंदणी अधिकारी, सहाय्यक विधी अधिकारी, बागा अधिकारी, मालमत्ता व्यवस्थापक आदी पदे पदोन्नतीद्वारे भरण्यात येणार आहेत. तर महिला व बालकल्याण अधिकारी तसेच विधी अधिकारी ही पदे सरळ सेवा भरतीद्वारे भरण्यात येणार आहेत.
सदर सेवा प्रवेश नियमावली तयार करण्याचे काम अतिरिक्त आयुक्त शिल्पा दरेकर, काय काय तू संजय सरनाईक, कामगार अधिकारी राम काटकर तसेच रावका अधिकारी प्रशांत पंडित यांनी पूर्ण केले आहे.