no images were found
जम्मू-काश्मीरमधील आतंकवादी जाळ्याचा संपूर्ण नायनाट करून हिंदू नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी उपाययोजना करा ! – हिंदु राष्ट्र समन्वय समितीचे निवेदन
कोल्हापूर (प्रतिनिधी):- जम्मू-काश्मीरमधील कुलगाम जिल्ह्यात ३१ जुलै रोजी छत्तीसगडमधील दोन हिंदू स्थलांतरित मजूर दीपक आणि भूपेंद्र यांची निर्घृण हत्या झाल्याची घटना राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीने गंभीर आहे. नागरिकांना त्यांच्या नावावरून आणि धार्मिक ओळखीवरून लक्ष्य केले जाणे ही गोष्ट केवळ कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न नसून भारताच्या संविधानिक मूल्यांवर आणि राष्ट्रीय एकात्मतेवरही थेट आघात करणारी आहे. काही महिन्यांपूर्वी पहलगाम येथे हिंदूंना नाव आणि धर्म विचारून करण्यात आलेल्या सामूहिक हत्येच्या स्मृती ताज्या असतानाच घडली आहे. त्यापूर्वीही काश्मीरमध्ये अनेक वेळा शिक्षक, बँक कर्मचारी, मजूर, व्यापारी आणि सामान्य नागरिक यांना लक्ष्य करून हत्या करण्यात आल्या आहेत. या घटनांचा अभ्यास केल्यास हिंदूंना भयभीत करून काश्मीरमधून बाहेर ढकलण्याचा प्रयत्न होत असल्याची गंभीर शंका निर्माण होते. तरी जम्मू-काश्मीरमधील आतंकवादी जाळ्याचा संपूर्ण नायनाट करून हिंदू नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी उपाययोजना करण्यात यावी, या मागणीचे निवेदन हिंदु राष्ट्र समन्वय समितीच्या वतीने जिल्हा प्रशासनास देण्यात आले. केंद्रीय गृहमंत्र्यांच्या नावे असलेले हे निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी गजानन गुरव यांनी स्वीकारले.
या प्रसंगी शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख श्री. किशोर घाटगे, अखिल भारत हिंदू महासभेचे जिल्हाधक्ष श्री. राजेंद्र तोरस्कर, प्रवक्ता श्री. सुनील सामंत, राज्य संघटक श्री. मनोहर सोरप, श्री. अभिजित पाटील, महिला आघाडीच्या शीलाताई माने, हिंदू जागरणच्या जिल्हा सहसंयोजिका वैद्या अश्विनी माळकर, हिंदू एकताचे शहरप्रमुख श्री. गजानन तोडकर, ‘नमो नमो’चे जिल्हाध्यक्ष श्री. विक्रम जरग, ‘महाराजा प्रतिष्ठान’चे संस्थापक श्री. निरंजन शिंदे, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपजिल्हाप्रमुख श्री. संभाजीराव भोकरे, करवीर तालुकाप्रमुख श्री. कृष्णात पोवार आणि श्री. राजू यादव, बजरंग दलाचे श्री. अनिल दिंडे, हिंदु राष्ट्र समन्वय समितीचे श्री. रामभाऊ मेथे, हिंदु जनजागृती समितीचे श्री. शिवानंद स्वामी, श्री. आदित्य शास्त्री हे उपस्थित होते.