Home Uncategorized वसुलीचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी सहाय्यक आयुक्तांनी नियमित आढावा घेऊन प्रभावी काम करावे – आयुक्त डॉ.राजेंद्र भारुड

वसुलीचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी सहाय्यक आयुक्तांनी नियमित आढावा घेऊन प्रभावी काम करावे – आयुक्त डॉ.राजेंद्र भारुड

2 min read
0
0
6

no images were found

वसुलीचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी सहाय्यक आयुक्तांनी नियमित आढावा घेऊन प्रभावी काम करावे – आयुक्त डॉ.राजेंद्र भारुड

पाणीपट्टी वसुलीचे १२० कोटी तर घरफाळा वसुलीचे १४० कोटींचे उद्दिष्ट

कोल्हापूर,  : महानगरपालिकेच्या चारही विभागीय कार्यालयांच्या माध्यमातून सुरू असलेल्या पाणीपट्टी, घरफाळा, परवाना व इस्टेट विभागाच्या वसुलीला गती देऊन यावर्षी पाणीपट्टी वसुलीचे १२० कोटी रुपये आणि घरफाळा वसुलीचे १४० कोटी रुपये उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी टीम म्हणून काम करावे अशा सूचना आयुक्त डॉ. राजेंद्र भारूड यांनी दिल्या. महापालिकेच्या महसूलवाढीसाठी घरफाळा, पाणीपट्टी, परवाना व इस्टेट विभागातील वसुली अधिक प्रभावी करण्यासाठी लिपिकांची ‘एकात्मिक कर सहाय्यक’ म्हणून यापुर्वी नियुक्ती करण्यात आली आहे. या सर्व संबंधित लिपिकांचा गेले एक महिन्यातील कामाचा आढावा नर्सरी बाग येथील शाहू समाधीस्थळा शेजारील डॉ.बाबासाहेब आंबेडकर हॉलमध्ये घेण्यात आला.

            यावेळी आयुक्त डॉ. राजेंद्र भारूड यांनी चारही विभागीय कार्यालयनिहाय वसुलीचा आढावा घेतला. विभागीय कार्यालयांतर्गत काम करणाऱ्या वसुली कर्मचाऱ्यांचे काम, त्यांना देण्यात आलेली उद्दिष्टे तसेच प्रत्यक्षात झालेली वसुली याचा दर आठवडयाला नियमित आढावा सहाय्यक आयुक्तांनी घ्यावा. प्रत्येक विभागीय कार्यालयाने आपल्या स्तरावर कामाचे नियोजन करून कर्मचाऱ्यांना आवश्यकतेनुसार कामाचे भाग निश्चित करून द्यावेत असे निर्देश आयुक्तांनी दिले.

आठवड्याच्या कामाचा स्वतंत्र अहवाल तयार करण्याच्या सूचना  प्रत्येक कर्मचाऱ्याने आठवड्याभरात केलेल्या कामाचा आढावा घ्यावा. यामध्ये किती नवीन प्रॉपर्टी सर्वेक्षण करण्यात आले, किती नवीन पाणी कनेक्शन शोधण्यात आले, किती नवीन परवाने शोधण्यात आले, किती नागरिकांनी नवीन परवान्यासाठी अर्ज केले, किती जुने परवाने नियमित झाले, किती अनधिकृत परवाने आढळले, किती कनेक्शन कट करण्यात आले, तसेच संबंधित विभागातून किती वसुली झाली याची आकडेवारी समाविष्ट करावी व त्याचा अहवाल सादर करण्याच्या सूचना आयुक्तांनी सांगितले. इस्टेट, पाणीपट्टी व घरफाळा विभागाने स्वतंत्रपणे केलेल्या कामाचा तसेच नवीन सापडलेल्या मिळकती, नवीन कनेक्शन, नवीन व्यवसाय आणि थकबाकी वसुलीचा सविस्तर आढावा पुढील बैठकीत सादर करण्याचे निर्देशही त्यांनी दिले.

दिवसाला २० ते ३० प्रॉपर्टी सर्वेक्षणाचे उद्दिष्ट  काही कर्मचारी सातत्याने चांगले काम करून महिनाभरात ६०० ते ६५० मिळकतींचे सर्वेक्षण करीत आहेत, तर काही कर्मचाऱ्यांकडून अपेक्षित काम होत नसल्याचे निदर्शनास येत आहे. दिवसाला २० ते ३० मिळकतींचे सर्वेक्षण केले तरी महिन्याभरात मोठ्या प्रमाणात नवीन मिळकती, वाढिव मिळकतींचे सर्वेक्षण पूर्ण होऊ शकते. त्यामुळे कामाच्या पद्धतीत नेमकी कुठे अडचण येत आहे, याचा प्रत्येकाने विचार करून कार्यक्षमतेने काम करावे, असे आवाहन आयुक्त डॉ.राजेंद्र भारूड यांनी केले.       महानगरपालिकेच्या वसुलीचे उद्दिष्ट मोठे असून त्यासाठी प्रत्येक टीमने निश्चित केलेले उद्दिष्ट पूर्ण करणे आवश्यक आहे. वसुलीमध्ये चांगली कामगिरी करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे कौतुक व सन्मान केला जाईल. ९० टक्क्यांपेक्षा अधिक वसुली करणाऱ्या वसुली लिपिकांना प्रमाणपत्र व ट्रॉफी देऊन गौरविण्यात येईल. तसेच यामधील उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या दोन कर्मचाऱ्यांचा विशेष सन्मान करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

उपद्रव शोध पथकाची मदत घेऊन कारवाई करा

            पाणीपट्टी वसुली तसेच अनधिकृत पाणी कनेक्शनच्या प्रकरणांमध्ये आवश्यकतेनुसार उपद्रव शोध पथकाची मदत घेऊन प्रभावी कारवाई करावी. नवीन कनेक्शन शोधणे, थकबाकीदारांवर नियमानुसार कारवाई करणे आणि वसुली वाढविण्यासाठी उपलब्ध असलेल्या सर्व यंत्रणांचा प्रभावी वापर करावा अशा सूचना त्यांनी दिल्या. परवाना विभागाने नवीन परवान्यांचा शोध घेण्यासोबतच जुने परवाने नियमित झाले आहेत का अनधिकृत व्यवसाय किती आहेत, याची अद्ययावत आकडेवारी तयार करून पुढील बैठकीमध्ये परवाना शुल्कामध्ये वाढ करण्याचे निर्देश आयुक्तांनी दिले.

दर आठवड्याला सहाय्यक आयुक्तांनी वसुलीचा आढावा घ्यावा   सर्व सहाय्यक आयुक्तांनी आपल्या विभागातील वसुलीचा दर आठवड्याला आढावा घ्यावा. कोणत्या कर्मचाऱ्याने किती वसुली केली, किती नवीन प्रॉपर्टी शोधल्या, किती नवीन कनेक्शन आढळले, किती परवाने शोधले आणि किती प्रकरणांमध्ये कारवाई केली, याची माहिती संकलित करून आठवड्यामध्ये आढावा घ्यावा. महानगरपालिकेची आर्थिक स्थिती सक्षम करण्यासाठी वसुली वाढविणे अत्यंत महत्त्वाचे आहे. महानगरपालिका ही आपली संस्था असून संस्था सक्षम आणि आर्थिकदृष्ट्या मजबूत राहिली तरच अधिकारी व कर्मचारी यांची व्यवस्था सक्षम राहणार आहे. त्यामुळे प्रत्येकाने संस्थेच्या हितासाठी जबाबदारीने काम करावे, असे आवाहन आयुक्त डॉ. भारूड यांनी केले.

१८ तारखेपर्यंत वसुली २० तारखेला प्रेझेंटेशन

            पुढील महिन्यात याच तारखेला पुन्हा वसुली आढावा बैठक घेण्यात येणार असून, त्या बैठकीत प्रत्येक विभागाकडून ठोस वसुलीचा परिणाम दिसला पाहिजे. त्यासाठी १८ तारखेपर्यंत झालेल्या वसुलीची आकडेवारी अंतिम करून पुढील दोन दिवसांत त्याचे प्रेझेंटेशन तयार करावे. २० तारखेला सायंकाळपर्यंत विभागनिहाय व कर्मचारीनिहाय वसुलीचा चार्ट सादर करावा असे निर्देश आयुक्तांनी दिले.

           बैठकीस अनुपस्थित राहिलेल्या कर्मचाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करावी, तसेच कमी कामगिरी करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या बाबतीत लागू सेवा नियमांनुसार शिस्तभंगाची कार्यवाही करण्याचे निर्देश आयुक्तांनी दिले. सरकारी सेवेत काम करण्याची संधी ही मोठी जबाबदारी आहे. प्रत्येक कर्मचाऱ्याने आपल्या कामाची जाणीव ठेवून नागरिकांना चांगली सेवा देण्याबरोबरच महानगरपालिकेच्या उत्पन्नवाढीसाठी प्रामाणिकपणे योगदान द्यावे. चांगले काम करणाऱ्यांचा सन्मान आणि अपेक्षित कामगिरी न करणाऱ्यांवर कारवाई केली जाईल असे आयुक्त डॉ.राजेंद्र भारूड यांनी स्पष्ट केले.

          यावेळी उपआयुक्त परितोष कंकाळ, नागेंद्र मुतकेकर, किरणकुमार धनवाडे, जल अभियंता हर्षजीत घाटगे, सहाय्यक आयुक्त उज्ज्वला शिंदे, स्वाती दुधाणे, डॉ. विजय पाटील, कर निर्धारक व संग्राहक सुधाकर चल्लावाड, सर्व कर अधिक्षक व वसुली लिपीक मोठया संख्येने उपस्थित होते.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In Uncategorized
Comments are closed.

Check Also

टीबी मुक्त भारत अभियान यशस्वी करा – जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड

टीबी मुक्त भारत अभियान यशस्वी करा – जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड : दानशूर व्यक्ती, सं…