no images were found
प्लास्टिक वापरावर महापालिकेची धडक कारवाई गांधीनगरातील व्यापाऱ्यावर ५ हजारांचा दंड ; १४४ किलो प्लास्टिकचा साठा जप्त
कोल्हापूर, : बंदी असलेल्या प्लास्टिकचा वापर करणाऱ्या व्यावसायिकांविरोधात महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकामार्फत धडक कारवाई सुरू करण्यात आली आहे. या मोहिमेअंतर्गत महापालिकेच्या हद्दीतील गांधीनगर परिसरातील दुकानांची या पथकामार्फत तपासणी करण्यात आली. यामध्ये सचिन ट्रेडर्स या दुकानात सुमारे १४४ किलो वजनाचा अंदाजे रु.३६ हजार किंमतीचा प्लास्टिकचा साठा आढळून आला. याप्रकरणी संबंधित व्यापाऱ्यावर रु. ५ हजारांचा दंड करुन तो वसूल करण्यात आला.
प्लास्टिकचा संपूर्ण साठाही जप्त करण्यात आला. आयुक्त डॉ. राजेंद्र भारुड यांच्या आदेशानुसार ही मोहीम राबविण्यात येत आहे. महापालिकेने गेल्या दहा दिवसांपासून या पथकामार्फत शहरात प्लास्टिकमुक्ती आणि स्वच्छतेबाबत जनजागृती मोहीम सुरू केली असून नागरिक व व्यावसायिकांना प्लास्टिकचा वापर टाळण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
आरोग्य व घनकचरा व्यवस्थापन विभागाने नागरिकांनी दैनंदिन कचरा केवळ महापालिकेच्या अधिकृत घंटागाडीतच द्यावा, असे आवाहन केले आहे. तसेच सार्वजनिक ठिकाणी थुंकणे, उघड्यावर कचरा जाळणे किंवा रस्ते व नाल्यांमध्ये कचरा टाकल्यास संबंधित कायदे व नियमांनुसार दंडात्मक कारवाई किंवा गुन्हा दाखल करण्यात येईल, असा इशाराही महापालिकेने दिला आहे.