no images were found
मंत्री प्रकाश आबिटकर यांच्या शुभहस्ते ‘गोदा ते नर्मदा’ पदयात्रेसाठी जाणाऱ्या दूधगंगा नदीच्या जल कलशाचे पूजन
कोल्हापूर: पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या ३०० व्या जयंती वर्षाचे औचित्य साधून महाराष्ट्र शासनाच्या जलसंपदा विभागामार्फत ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जल व्यवस्थापन कृती पंधरवडा’ (१५ ते ३० एप्रिल २०२६) राबवण्यात येत आहे. या उपक्रमाचा एक मुख्य भाग म्हणून आयोजित करण्यात आलेल्या ‘गोदा ते नर्मदा’ या विशेष पदयात्रेचा महत्त्वपूर्ण टप्पा कोल्हापुरात पार पडला. सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांच्या शुभहस्ते कोल्हापूर येथील शासकीय विश्रामगृह येथे दूधगंगा नदीच्या जल कलशाचे पूजन करून हा कलश जलसंपदा विभागाच्या अभियंत्यांकडे सुपूर्द करण्यात आला.
ही पदयात्रा पुण्यश्लोक अहिल्यादेवींची जन्मभूमी चौंडी आणि गोदावरीचे उगमस्थान श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर येथून एकाच वेळी सुरू होणार आहे. शिर्डी येथे या दोन्ही यात्रांचे एकत्रिकरण होईल आणि त्यानंतर ही यात्रा अहिल्यादेवींची स्मृतीभूमी असलेल्या महेश्वर (मध्यप्रदेश) कडे मार्गक्रमण करेल. दि. २५ एप्रिल ते २९ एप्रिल २०२६ या कालावधीत ही पदयात्रा संपन्न होणार आहे.
या पदयात्रेचा मुख्य उद्देश केवळ जलसंवर्धन नसून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या उदात्त मूल्यांची पुनर्स्थापना करणे हा आहे. विशेषतः लोकाभिमुख प्रशासन आणि पारदर्शक कारभार. स्त्री नेतृत्व आणि त्यांची निर्णयक्षमता अधोरेखित करणे.
न्याय, समता आणि सेवा या तत्वांचा प्रचार. धर्म, संस्कृती आणि समाजहित जोपासत ही मूल्ये पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवणे हा उद्देश आहे.
या कार्यक्रमाप्रसंगी आमदार चंद्रदीप नरके, माजी आमदार उल्हास पाटील, जिल्हा परिषद सदस्य अरुण जाधव, जिल्हा नियोजन समिती सदस्य बाबा नांदेकर यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच जलसंपदा विभागाचे अधीक्षक अभियंता अभिजीत म्हेत्रे, कार्यकारी अभियंता अशोक पवार, उपअभियंता अनिल लांडगे, प्रशांत कांबळे, उदय मानकपुरे, अमोल कमलाकर, अजिंक्य पाटील, शाखा अभियंता विशाल शेळोलकर, स्नेहा शेळोलकर, सोनाली दिगे, आकाश माळी यांच्यासह विभागातील अधिकारी, कर्मचारी आणि समाजातील विविध क्षेत्रांतील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.