Home Uncategorized महात्मा फुले आणि महर्षी शिंदे यांच्या विचारांत परिवर्तनाची सलग परंपरा: डॉ. राजन गवस

महात्मा फुले आणि महर्षी शिंदे यांच्या विचारांत परिवर्तनाची सलग परंपरा: डॉ. राजन गवस

5 second read
0
0
8

no images were found

महात्मा फुले आणि महर्षी शिंदे यांच्या विचारांत परिवर्तनाची सलग परंपरा: डॉ. राजन गवस

कोल्हापूर : महात्मा ज्योतीराव फुले आणि महर्षी विठ्ठल रामजी शिंदे हे स्वतंत्र काळातील असले तरी त्यांच्या विचारांमध्ये समाजपरिवर्तनाची एक सलग परंपरा दिसून येते, असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक व विचारवंत डॉ. राजन गवस यांनी आज येथे केले.

शिवाजी विद्यापीठाचा मराठी अधिविभाग आणि महर्षी विठ्ठल रामजी शिंदे अध्यासन यांच्या वतीने महात्मा फुले यांचे द्विशताब्दी जयंती वर्ष व महर्षी शिंदे यांची १५३ वी जयंती या संयुक्त निमित्ताने “महात्मा फुले आणि महर्षी शिंदे: अनुबंधांचा अन्वयार्थ” या विषयावर एकदिवसीय राष्ट्रीय चर्चासत्र आयोजित करण्यात आले. त्या चर्चासत्राचे उद्घाटक म्हणून डॉ. गवस बोलत होते.

डॉ. गवस म्हणाले, महात्मा फुले आणि महर्षी शिंदे यांची कार्यपद्धती व अनुभव वेगवेगळे असले तरी दोघांचाही केंद्रबिंदू सामाजिक विषमता दूर करणे हा होता. फुले यांनी जातिव्यवस्था, कर्मविपाक सिद्धांत आणि अवतार संकल्पना यांना ठामपणे विरोध करत “सत्य” हा धर्म मानला आणि समाजाला पर्यायी मूल्यव्यवस्था दिली. त्यांनी थेट अन्यायावर प्रहार करत समाजजागृती केली. तर, महर्षी शिंदे यांनी अध्यात्म आणि सामाजिक सुधारणांचा समन्वय साधत जीवनाभिमुख अध्यात्माचा पुरस्कार केला. फुले यांच्या काळातील सामाजिक जखमा, अपमान आणि अन्याय यांचा त्यांनी प्रत्यक्ष अनुभव घेतला होता, तर शिंदे यांचा प्रवास तुलनेने वेगळा होता. तरीही शिंदे यांनी धर्माचा अभ्यास करून समाजातील विषमता कमी करण्यासाठी प्रयत्न केले. त्या काळात हिंदू धर्मावर विविध बाह्य प्रभावांचा दबाव असताना फुले यांनी “सत्यधर्म” मांडला, तर शिंदे यांनी प्रार्थना समाजासारख्या चळवळींतून सुधारणा घडवून आणण्याचा मार्ग स्वीकारला.

फुले आणि शिंदे यांच्या विचारांचा अनुबंध समजून घेताना त्यांच्या काळाचा संदर्भ लक्षात घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे. दोघांनीही समाजाला नवीन विचार दिले, परंतु त्यांची पद्धत आणि दृष्टिकोन वेगळा होता. या दोन्ही प्रवाहांचा एकत्रित विचार केल्यास महाराष्ट्रातील सामाजिक सुधारणांची व्यापक परंपरा अधिक स्पष्ट होते, असेही डॉ. गवस यांनी अधोरेखित केले.

यावेळी पुण्याच्या प्रा. सुशील धसकटे यांचे बीजभाषण झाले. त्यांनी सामाजिक परिवर्तनाच्या इतिहासातील या दोन विचारवंतांच्या कार्यातील परस्परसंबंध अत्यंत अभ्यासपूर्ण पद्धतीने उलगडून दाखवला. धसकटे यांनी पुणे शहराच्या सामाजिक-सांस्कृतिक संदर्भातून या अनुबंधाचा वेध घेतला. पुणे हे बहुजनांचे शहर असताना कालांतराने प्रस्थापितांचे केंद्र कसे बनले, याचा उल्लेख करत त्यांनी पूर्व पुण्यातूनच महाराष्ट्राला समतेचा, पुरोगामी विचार मिळाल्याचे सांगितले. महात्मा ज्योतिराव फुले यांचा वाडा आणि महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांचा अहिल्याश्रम या दोन्ही ठिकाणांची भौगोलिक जवळीक हा त्यांच्या विचारसरणीतील अनुबंध अधोरेखित करणारा महत्त्वाचा दुवा असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

       धसकटे म्हणाले, फुले यांनी ज्या ठिकाणी अस्पृश्य मुलांसाठी शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली, त्याच भूमीवर पुढे महर्षी शिंदे यांनी आपले कार्य उभारले. यावरून शिंदे यांनी फुले यांच्या कार्याचा वारसा पुढे नेण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न केल्याचे दिसते. फुले यांनी सुरू केलेल्या सामाजिक परिवर्तनाच्या चळवळीला शिंदे यांनी अधिक संशोधक, चिकित्सक दृष्टिकोनातून पुढे नेले.

धसकटे यांनी या महामानवांच्या धर्मविषयक चिंतनावर विशेष भर दिला. त्यांनी नमूद केले की, १९व्या शतकात फुले यांनी धर्मसुधारणेची ठाम भूमिका घेत “सत्य” हा धर्माचा पाया असल्याचे प्रतिपादन केले. त्यांनी धर्मातील अंधश्रद्धा व शोषणाविरुद्ध आवाज उठवला आणि सत्यशोधक समाज सारखा संस्थात्मक पर्याय उभा केला. त्याच धर्तीवर महर्षी शिंदे यांनी प्रार्थना समाज आणि डिप्रेस्ड क्लासेस मिशनच्या माध्यमातून समाजकार्य केले. या दोघांनीही केवळ भाषणांपुरते मर्यादित न राहता प्रत्यक्ष कृतीतून परिवर्तन घडवण्यावर भर दिला. धर्माच्या नावाखाली होणारे शोषण थांबवण्यासाठी या विचारवंतांनी संस्थात्मक पर्याय उभे केले. मात्र, पुढील काळात या संस्था दुर्लक्षित झाल्याने धर्माचे विकृत आणि हिंस्र स्वरूप समाजात वाढीस लागले. आजच्या परिस्थितीत या संस्थांचा पुनर्विचार आणि पुनरुज्जीवन आवश्यक असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.

धसकटे यांनी महात्मा गांधी यांच्या संदर्भातही फुले आणि शिंदे यांच्या विचारांचा प्रभाव स्पष्ट केला. गांधींमध्ये फुले यांचा आग्रहीपणा आणि शिंदे यांचा उदारमतवाद यांचा संगम दिसतो, असे त्यांनी नमूद करत “फुले–शिंदे–गांधी” हे सूत्र समाजाने नव्याने स्वीकारण्याची गरज व्यक्त केली.

अध्यक्षीय मनोगतात कुलसचिव डॉ. विलास शिंदे म्हणाले, समताधारित समाजनिर्मितीसाठी काम करणाऱ्या सर्व महामानवांचा एकत्रित, संतुलित असा अभ्यास साकल्याने करण्याची आजघडीला गरज आहे. फुले आणि शिंदे यांनी समाजसुधारणा आणि प्रबोधनाचे मोठे पर्व महाराष्ट्रभूमीत निर्माण केले. त्या पर्वाच्या स्मृती जागवत असताना त्यातील चांगले वेचून घेणे आणि समाजामध्ये रुजविणे याची नितांत आवश्यकता असल्याचेही त्यांनी सांगितले.

सुरवातीला महात्मा फुले आणि महर्षी शिंदे यांच्या प्रतिमांना मान्यवरांनी अभिवादन केले. डॉ. श्रीकृष्ण महाजन यांना यावेळी श्रद्धांजली वाहण्यात आली. मराठी अधिविभागाचे प्रमुख डॉ. रणधीर शिंदे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. डॉ. नंदकुमार मोरे यांनी परिचय करून दिला, तर प्रांजली क्षीरसागर यांनी आभार मानले. कार्यक्रमास डॉ. अनिल गवळी, डॉ. भारतभूषण माळी, डॉ. अवनीश पाटील, डॉ. अक्षय सरवदे, डॉ. सुखदेव उंदरे, डॉ. दत्तात्रय मचाले आदी उपस्थित होते.

    दुपारच्या पहिल्या सत्रात ‘महात्मा फुले आणि महर्षी शिंदे यांच्या कार्याचा अन्वयार्थ’ या विषयावरील चर्चेत उद्धव धुमाळ (पुणे), डॉ. प्रकाश पवार आणि रमेश चव्हाण (पुणे) यांनी सहभाग घेतला. डॉ. नंदकुमार मोरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या दुसऱ्या सत्रात ‘महात्मा फुले आणि महर्षी शिंदे यांच्या कार्याचा सामाजिक- सांस्कृतिक अनुबंध’ या विषयावरील चर्चेत डॉ. भक्ती महाजन (गोवा), डॉ. सुरेश शिखरे, मोहसीन पठाण यांनी सहभाग घेतला. प्राचार्य डॉ. शंकरराव कदम (कराड) यांच्या प्रमुख उपस्थितीत चर्चासत्राचा समारोप झाला.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In Uncategorized
Comments are closed.

Check Also

उद्योगस्नेही धोरणामुळे ‘ग्लोबल इन्व्हेस्टमेंट हब’ म्हणून महाराष्ट्राची ओळख-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

उद्योगस्नेही धोरणामुळे ‘ग्लोबल इन्व्हेस्टमेंट हब’ म्हणून महाराष्ट्राची ओळख-मुख्यमंत्री देव…