no images were found
५०० हून अधिक भात प्रकारांच्या निर्मितीद्वारे विश्वविक्रम प्रस्थापित करण्याचा ऐतिहासिक प्रयत्न – मास्टर शेफ दिग्विजय भोसले व त्यांच्या टीमकडून तयारी पूर्ण
कोल्हापूर (प्रतिनिधी):अश्विनी भोसले हॉस्पिटॅलिटी अँड कलिनरी इन्स्टिट्यूट एलएलपी यांच्या वतीने एक अत्यंत भव्य, सर्जनशील आणि सांस्कृतिकदृष्ट्या महत्त्वपूर्ण उपक्रम जाहीर करण्यात येत आहे. जगातील विविध खाद्यसंस्कृतींमधील ५०० पेक्षा अधिक भाताच्या अनोख्या पदार्थांची एकाच वेळी निर्मिती करून विश्वविक्रम प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे.
मास्टर शेफ दिग्विजय भोसले आणि त्यांच्या टीमने यापूर्वी यशस्वीरित्या सर्वात मोठ्या प्रमाणात मिसळ तयार करून विक्रम प्रस्थापित केला आहे. अशा प्रकारच्या उपक्रमातून कोल्हापूरच्या खाद्य संस्कृतीच्या वेगळ्या पैलूची माहिती पुढे आणण्याचा आपल्या टीमचा मानस असल्याचे भोसले यांनी सांगितले.
हा अभिनव उपक्रम पूर्ण करण्यासाठी आपल्याबरोबर, १० व्यावसायिक व अनुभवी शेफ्सची विशेष टीम तसेच संस्थेच्या प्रतिभावान विद्यार्थ्यांचा सक्रिय सहभाग असेल, असेही भोसले यांनी नमूद केले .भात हा जगभरातील सर्वात प्राचीन आणि सार्वत्रिक अन्नघटक असल्याने, या विश्वविक्रम प्रयत्नात भारतीय खाद्यपरंपरेचे वैभव जसे की बिर्याणी, पुलाव, खिचडी, पेठा यांसह आंतरराष्ट्रीय खाद्यसंस्कृतीतील रिसोटो, पायेला, सुशी, जांबालय, बिर्यानी इत्यादी विविध प्रकारांचा समावेश करण्यात येणार आहे. हा उपक्रम केवळ विक्रम प्रस्थापित करण्यापुरता मर्यादित नसून, जगभरातील विविध खाद्यसंस्कृतींचा गौरव, जतन आणि प्रसार करण्याच्या ध्येयाने प्रेरित आहे.
या उपक्रमाचे प्रमुख उद्दिष्टे:
* शेफ्सच्या सर्जनशीलता, कल्पकता आणि नवोपक्रमशीलतेचे दर्शन घडविणे
* विद्यार्थ्यांना जागतिक स्तरावरील व्यावसायिक अनुभव प्रदान करणे
* पारंपरिक आणि आंतरराष्ट्रीय खाद्यसंस्कृतींचा आदरपूर्ण प्रचार व प्रसार करणे
* भाताच्या माध्यमातून एकतेचा आणि सांस्कृतिक समन्वयाचा संदेश देणे
हा विश्वविक्रमी प्रयत्न खाद्यप्रेमी, पाककला क्षेत्रातील मान्यवर व्यक्ती, उद्योगपती आणि माध्यम जगताकडून विशेष लक्ष वेधून घेईल अशीअपेक्षा असल्याचे त्यानी सांगितले आहे.