Home Uncategorized अंध महिला राष्ट्रीय क्रिकेट संघाची कामगिरी अभिमानास्पद – राज्यपाल जिष्णु देव वर्मा

अंध महिला राष्ट्रीय क्रिकेट संघाची कामगिरी अभिमानास्पद – राज्यपाल जिष्णु देव वर्मा

59 second read
0
0
6

no images were found

अंध महिला राष्ट्रीय क्रिकेट संघाची कामगिरी अभिमानास्पद राज्यपाल जिष्णु देव वर्मा

            मुंबई, : दृष्टिहीन महिला राष्ट्रीय क्रिकेट संघाची वाटचाल दाखवणाऱ्या ‘देख ले! इंडिया’ या माहितीपटाचे युनिसेफतर्फे लोकभवन येथे राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रदर्शन करण्यात आले. भारताच्या अंध महिला राष्ट्रीय क्रिकेट संघाच्या विविध सदस्यांसह हा माहितीपट पाहून त्यांनी संपूर्ण संघाला आणि खेळाडूंना कौतुकाची थाप दिली. 

            दृष्टिहीन खेळाडूंना सहानुभूती नको तर संधी हवी असते असे सांगून अंधांच्या महिला क्रिकेट संघाची वाटचाल तसेच आंतरराष्ट्रीय स्पर्धेतील विजय दाखवणारा माहितीपट प्रेरणादायी आहे. या माहितीपटाचा आणखी एक प्रयोग लोकभवन येथे आयोजित करून विविध क्षेत्रातील मान्यवरांना तो पाहण्यास निमंत्रित करण्यात येईल, असे राज्यपालांनी सांगितले.

            माहितीपट निर्माते मुकुंद मूर्ती यांनी सांगितले की, या माहितीपटातून अंध महिला क्रिकेटपटू विशेष आवाज करणाऱ्या चेंडूच्या साहाय्याने क्रिकेट कसे खेळतात, याची माहिती समाजाला मिळते. या संघातील खेळाडू अतिशय प्रतिकूल सामाजिक व आर्थिक परिस्थितीतून पुढे आल्या असून, त्यांच्या उल्लेखनीय प्रवासाचे दस्तऐवजीकरण या चित्रपटातून करण्यात आले आहे. हा चित्रपट केवळ क्रिकेटविषयी नाही, तर धैर्य, मैत्री आणि आत्मविश्वासाविषयी आहे. या तरुणींनी सामाजिक, आर्थिक किंवा शारीरिक अशा कोणत्याही अडथळ्यावर दृढनिश्चयाच्या बळावर मात करता येते, हे सिद्ध करून दाखवले आहे.

            भारतीय अंध महिला राष्ट्रीय क्रिकेट संघाच्या उपकर्णधार गंगा कदम यांनी आपल्या अनुभवांना उजाळा दिला. त्या म्हणाल्या “क्रिकेटमुळे माझे आयुष्य बदलले. या खेळामुळे मला आत्मविश्वास, आयुष्याला दिशा आणि देशाचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली. इतरांप्रमाणे मला वाचता येत नसल्यामुळे मला पूर्वी खूप वाईट वाटायचे. मात्र आज मी क्रिकेट खेळत असल्याचा अभिमान वाटतो. हा चित्रपट आमच्या संघाचा प्रवास आहे, पण तो प्रत्येक त्या मुलीचीही कहाणी आहे जी विविध अडचणींवर मात करून आपले स्वप्न पूर्ण करण्यासाठी झटत असते.

            यावेळी संघातील खेळाडू प्रिया खीर आणि सुषमा पटेल उपस्थित होत्या. क्रिकेट असोसिएशन फॉर द ब्लाइंड इन इंडियाचे अध्यक्ष तसेच समर्थनम ट्रस्ट फॉर द डिसेबल्डचे संस्थापक व व्यवस्थापकीय विश्वस्त डॉ. महांतेश जी. किवडसन्नावर यांनी दृष्टिदोष असलेल्या व्यक्तींसाठी क्रिकेटने उभ्या केलेल्या नव्या संधींचा आढावा घेतला. क्रिकेट असोसिएशन फॉर द ब्लाइंड इन इंडियाच्या (CABI) पुढाकारातून अमेरिकेच्या अंध क्रिकेट संघाची स्थापना करण्यात आली असून, त्या संघाने विश्वचषक स्पर्धेत सहभाग नोंदविला. क्रीडा क्षेत्रातील भारताच्या ‘सॉफ्ट पॉवर’चे हे उत्तम उदाहरण असल्याचे त्यांनी नमूद केले.

            70 मिनिटांच्या या माहितीपटात भारतातील विविध भागांतून आलेल्या अंध महिला क्रिकेटपटूंचा इंग्लंडमध्ये झालेल्या वर्ल्ड ब्लाइंड गेम्सपर्यंतचा प्रेरणादायी प्रवास उलगडण्यात आला आहे.     दृष्टिदोष असलेल्या तरुण-तरुणींमधील जिद्द, सर्वसमावेशकता आणि समान संधींचे महत्त्व या माहितीपटातून अधोरेखित करण्यात आले आहे. यावेळी युनिसेफ महाराष्ट्रचे क्षेत्रीय अधिकारी संजय सिंह, युनिसेफच्या कम्युनिकेशन स्पेशालिस्ट स्वाती महापात्रा, खेळाडू प्रिया खीर व सुषमा पटेल, तसेच संघाच्या व्यवस्थापक शिखा शेट्टी उपस्थित होत्या.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In Uncategorized
Comments are closed.

Check Also

आयसीआयसीआय प्रुडेन्शियल लाइफतर्फे अल्पकालीन आर्थिक जबाबदाऱ्यांसाठी खास तयार केलेला 10 वर्षांचा जीवन विमा संरक्षण प्रस्ताव सादर

आयसीआयसीआय प्रुडेन्शियल लाइफतर्फे अल्पकालीन आर्थिक जबाबदाऱ्यांसाठी खास तयार केलेला 10…