no images were found
भीषण कार अपघातात गटविकास अधिकारी ठार
जळगाव : जिल्ह्यातील भोणे फाट्याजवळ कार आणि ट्रकचा भीषण अपघात गटविकास अधिकारी ठार झाले. कारने नाशिककडे निघाले असताना गटविकास अधिकारी एकनाथ चौधरी यांच्यावर काळानं घाला घातला. एकनाथ चौधरी यांच्या अपघाती मृत्यूमुळे हळहळ व्यक्त केली जातेय. या अपघातात कारचा अक्षरशः चुराडा झाला.
एकनाथ चौधरी हे सरकारी कामासाठी नाशिककडे निघाले होते. धरणगाव तालुक्यातील भोणे फाट्यावर कार आणि ट्रक यांच्यात जोरदार धडक होऊन भीषण अपघात झाला. यात एकनाथ चौधरी यांचा मृत्यू झाला. एकनाथ चौधरी हे अमळनेर येथे गटविकास अधिकारी म्हणून कार्यरत होते. तसंच यावल येथील गटविकास अधिकारी म्हणून ही त्यांच्याकडे पदभार होता. मात्र पहाटे झालेल्या भीषण अपघातात एकनाथ चौधरी यांचा जागीच जीव गेला. ही धडक इतकी जबर होती की, कारचा डाव्या बाजूचा भाग पूर्णपणे चेपला.
या अपघाताची माहिती मिळाल्यानंतर स्थानिक ग्रामस्थांनी लगेचच घटनास्थळी धाव घेतली आणि मदतकार्य केलं. पहाटेच्या सुमारास घडलेल्या या अपघातानंतर एकच गोंधळ उडाला होता. या अपघाताची पोलिसांनीही नोंद घेतली आहे. दरम्यान, एकनाथ चौथरी यांच्या अपघाती मृत्यूमुळे त्यांच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळलाय.