no images were found
विभागीय कार्यालयांनी परवाना तपासणी, आपत्ती व्यवस्थापन व महसूलवाढीवर भर द्यावा– आयुक्त डॉ. राजेंद्र भारुड
कोल्हापूर, : महानगरपालिकेच्या सर्व सहाय्यक आयुक्तांनी आपल्या विभागीय कार्यालयांतर्गत येणाऱ्या खाजगी क्लासेस, लॉजिंग व सर्व दुकानांची तपासणी करावी असे निर्देश आयुक्त डॉ. राजेंद्र भारुड यांनी दिले. निवडणूक कार्यालयात आयोजित आढावा बैठकीत त्यांनी विविध विभागांना महत्त्वाच्या सूचना दिल्या.
शहरात खासगी पार्किंगची संख्या वाढत असल्याने अशा सर्व पार्किंगसाठी परवाना बंधनकारक करण्यात येणार असून शासनाची मंजुरी महापालिकेस प्राप्त झाली आहे. त्यानुसार नियमावली निश्चित करून कार्यवाही सुरू करण्याच्या सूचना त्यांनी उपआयुक्तांना दिल्या. खाजगी क्लासेसच्या इमारतींमध्ये अग्निसुरक्षेची व्यवस्था असली तरी आवश्यकतेनुसार क्लासेस साठी स्वतंत्र अग्निसुरक्षा उपाययोजना करण्याबाबत अग्निशमन विभागाने संबंधितांना सूचना द्याव्यात. पावसाळा सुरू झाल्याने आपत्ती व्यवस्थापनाला सर्वोच्च प्राधान्य देण्याचे निर्देश देत शहरात पावसाचे पाणी साचू नये यासाठी युद्धपातळीवर स्वच्छता, नाले व होल क्लिनिंगची कामे तातडीने पूर्ण करण्यास सांगितले. शहरातील धोकादायक इमारतींची सर्व सहाय्यक आयुक्त व उपशहर अभियंत्यांनी श्रेणीवार पुन्हा पडताळणी करावी. संबंधितांनी स्वतःहून धोकादायक इमारती हटवल्या नाहीत तर नियमानुसार पुढील कारवाई करण्यात यावी असे निर्देशही त्यांनी दिले. महापालिकेला सीएसआर निधीतून प्राप्त झालेले 700 दिवे पूर्णपणे बसविण्यात आले असून उर्वरित दिवेही विविध बँकांच्या सीएसआर माध्यमातून उपलब्ध करून घेण्यासाठी आवश्यक कार्यवाही करण्याच्या सूचना लेखा विभागाला देण्यात आल्या. महसूल वाढीसाठी सर्व विभागांनी वसुलीवर विशेष भर द्यावा. आजपासून विभागीय कार्यालय स्तरावर ऑनलाइन परवाना प्रणाली सुरू करण्यात आली असून तिच्या माध्यमातून सुमारे 17 ते 18 हजार नवीन परवानाधारक शोधून काढण्याचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. यासाठी सर्व वसुली विभागांच्या नियमित बैठका घेऊन प्रभावी कारवाई करण्याचे निर्देशही आयुक्त डॉ. राजेंद्र भारुड यांनी दिले.
यावेळी अतिरिक्त रविकांत आडसूळ, उप-आयुक्त परितोष कंकाळ, किरणकुमार धनवाडे, सहाय्यक आयुक्त जयंत जावडेकर, उज्वला शिंदे, स्वाती दुधाणे, डॉ.विजय पाटील, राम काटकर, मुख्य लेखापरिक्षक कलावती मिसाळ, लेखा व वित्त अधिकारी राजश्री पाटील, मुख्य लेखापाल संजय सरनाईक, शहर अभियंता रमेश मस्कर, आरोग्याधिकारी डॉ.प्रकाश पावरा, उपशहर अभियंता महादेव फुलारी, सुरेश पाटील, निवास पोवार, अरुणकुमार गवळी, उपशहर रचनाकार एन.एस.पाटील, करनिर्धारक व संग्राहक सुधाकर चल्लावाड, मुख्य आरोग्य निरीक्षक जयवंत पवार, रवका अधिकारी प्रशांत पंडत, पर्यावरण अधिकारी समीर व्याघ्रांबरे, सिस्टीम मॅनेजर यशपालसिंह रजपूत, इस्टेट ऑफिसर शेखर साळोखे, मुख्य अग्निशमन अधिकारी मनीष रणभिसे, कनिष्ठ अभियंता पदमल पाटील उपस्थित होते.