no images were found
आमदार सतेज पाटलांनी बदनामीचे षडयंत्र थांबवून स्वतःच्या निष्क्रियतेचे आत्मपरीक्षण करावे; आमदार राजेश क्षीरसागर
कोल्हापूरच्या जनतेने विधानसभा आणि महापालिकेत काँग्रेसचा ‘१०-०’ पराभव करून सतेज पाटलांना त्यांची जागा दाखवली!
कोल्हापूर: “आमदार सतेज पाटील यांनी माझ्यावर निरर्थक आणि बिनबुडाचे आरोप करण्यापेक्षा, त्यांनी स्वतः इतकी वर्षे महापालिकेत सत्ता आणि पालकमंत्री पद भोगताना कोल्हापूरच्या जनतेसाठी काय दिवे लावले, याचे विश्लेषण करावे. राजकीय अस्तित्व संपत आल्यामुळे आणि महापालिका निवडणुकीतील मानहानीकारक पराभवाच्या धक्क्यातून ते अजूनही बाहेर न आल्यामुळेच, ते माझ्याविरोधात बदनामीचे छुपे षडयंत्र रचत आहेत,” असा घणाघाती हल्ला राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आणि कोल्हापूरचे आमदार राजेश क्षीरसागर यांनी आज पत्रकार परिषदेत चढवला. “ब्लॅकमेलर काहीही बोलत असला, तरी त्याचा खरा बोलविता धनी आमदार सतेज पाटील हेच आहेत, हे कोल्हापूरची जनता चांगल्या प्रकारे जाणून आहे,” असेही त्यांनी ठणकावून सांगितले.
‘तो’ व्हिडीओ एडिटेड; योग्य वेळी जनतेसमोर पुरावे आणणार!
गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या एका कथित व्हिडीओबाबत बोलताना आमदार राजेश क्षीरसागर यांनी सत्य परिस्थिती समोर आणली. ते म्हणाले, “माझ्या नावावर जो व्हिडीओ प्रसारित केला जात आहे, तो पूर्णपणे व्हॉईस डबिंग करून आणि जाणीवपूर्वक एडिट करून तयार करण्यात आला आहे. तरी नशीब त्यात मी कोणत्याही प्रकारची दादागिरी, निगेटिव्हिटी किंवा ब्लॅकमेलिंग केलेले दाखवलेले नाही. मुळात तो कोणताही शासकीय व्यवहार नव्हता. ज्या व्यक्तीने गैरसमजातून तो व्हिडीओ बनवला होता, त्याने नंतर माझी प्रत्यक्ष भेट घेतली. त्याची अडचण समजून घेऊन मी त्याला न्याय मिळवून देण्याचे काम केले आहे. सदर व्हिडीओ यापूर्वी आमदार सतेज पाटील यांनी दि.14/०1/2026 रोजी पत्रकार परिषदेत प्रसारित केला होता. यानंतर दि.15/01/2026 रोजी त्या व्यक्तीने स्वतःहून माझ्याशी संपर्क साधला आणि या व्हिडीओचा गैरवापर केला जात असल्याचे तसेच ‘या प्रकरणाशी माझा कोणताही संबंध नाही’ असे मला लेखी लिहून दिले आहे. माझ्याकडे सर्व कायदेशीर आणि ठोस पुरावे उपलब्ध असून, योग्य वेळ आल्यावर हे सर्व पुरावे मी जनतेच्या दरबारात सादर करेन.”
…तर सतेज पाटलांच्या पायाखालची वाळू सरकली!
सतेज पाटील यांच्या दुटप्पी भूमिकेवर निशाणा साधताना आमदार क्षीरसागर म्हणाले, “मी पाठीत वार करणारा माणूस नाही आणि सतेज पाटलांनीही आता पाठीत वार करणे बंद करावे. कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीच्या ऐन प्रचाराच्या शेवटच्या दिवशी हा एडिटेड व्हिडीओ व्हायरल करून पाटील यांनी पत्रकार परिषद घेतली होती. यामध्ये त्यांनी माननीय मुख्यमंत्री आणि माननीय उपमुख्यमंत्री यांच्याकडे चौकशीची मागणी केली होती आणि तसे ई-मेलही पाठवले होते. मग आज इतके दिवस झाले, तरी माननीय मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांनी याची चौकशी केली का? याची माहिती घेण्यासाठी सतेज पाटलांना आजपर्यंत वेळ मिळाला नाही का? की आजही ते महानगरपालिका निवडणुकीत महायुतीने दिलेल्या पराभवाच्या धक्क्यातून आणि धसक्यातून बाहेर आलेले नाहीत?”
ते पुढे म्हणाले, “दुसऱ्याच्या खांद्यावर बंदूक ठेवून आपले राजकीय स्वार्थ साधण्याची सतेज पाटलांची जुनी सवय आहे. हा सगळा प्रकार म्हणजे केवळ माझी राजकीय आणि सामाजिक बदनामी करण्याचा एक पूर्वनियोजित कट आहे आणि मी याचा तीव्र शब्दांत निषेध करतो.”
काचेच्या महालात राहणाऱ्यांनी दुसऱ्याच्या घरावर दगड मारू नयेत!
आमदार राजेश क्षीरसागर यांनी सतेज पाटील यांना त्यांच्या मर्यादांची जाणीव करून देताना अत्यंत कडक शब्दांत इशारा दिला. “अनेकांच्या वैयक्तिक आणि त्यांच्या कुटुंबियांच्या कुंडल्या माझ्याकडे तयार आहेत. कोणाच्या पुतण्यांवर बलात्कारासारखे गंभीर गुन्हे दाखल झाले? कोणाच्या कॉलेज, रुग्णालय आणि हॉटेल व्यवसायाच्या माध्यमातून कोल्हापूरकरांची लूट सुरू आहे, याच्या सर्व बातम्या वेळोवेळी प्रसिद्ध झाल्या आहेत. परंतु, मी कधीही कोणाच्या वैयक्तिक आयुष्यात किंवा व्यवसायात लक्ष घातले नाही. कारण राजकारणात काही मर्यादा पाळायच्या असतात. पण सतेज पाटील हे भान विसरले आहेत. त्यामुळे त्यांनी हे लक्षात ठेवावे की, ज्यांचे स्वतःचे महाल काचेचे असतात, त्यांनी दुसऱ्याच्या घरावर दगड मारण्याची चूक करू नये. प्रत्येक राजकीय व्यक्तीने मर्यादा राखणे गरजेचे आहे, अन्यथा कोल्हापूरचे राजकारण वेगळ्या दिशेला जाण्यास वेळ लागणार नाही,” असा सज्जड दम त्यांनी दिला.
माझा विकासनिधी आणि कामे पाहूनच पाटलांच्या पोटात ‘पोटशूळ’
“सतेज पाटलांनी कोल्हापूर शहरावर वर्षानुवर्षे हुकूमशाही गाजवली, पण शहराला काय दिले? त्यांनी फक्त स्वतःचा निष्क्रियपणा दाखवून दिला. याउलट, मी कोल्हापूरकरांसाठी हक्काचा विकास निधी खेचून आणला,” असे सांगत आमदार क्षीरसागर यांनी आपल्या विकासकामांचा पाढा वाचला:
• सर्किट बेंच व आय.टी. पार्क: कोल्हापूरकरांचे अनेक वर्षांचे स्वप्न असलेले सर्किट बेंच शहरात आणण्यासाठी मी सातत्याने प्रयत्न केले. तरुणांच्या हाताला काम मिळण्यासाठी आय.टी. पार्क मंजूर करून आणले.
• कन्व्हेन्शन सेंटर व अंबाबाई विकास आराखडा: संपूर्ण व्यापारी, बांधकाम व्यावसायिक आणि उद्योजकांची मागणी लक्षात घेऊन भव्य ‘कन्व्हेन्शन सेंटर’ मंजूर केले. तसेच, करवीरनिवासिनी आई अंबाबाई तीर्थक्षेत्र विकासासाठी तब्बल १५०० कोटी रुपयांचा निधी आणण्यासाठी पुढाकार घेतला.
• रंकाळा संवर्धन व पूरनियंत्रण: ऐतिहासिक रंकाळा तलावाचे सौंदर्य खुलवून पर्यटनाला चालना दिली. कोल्हापूरला पुराच्या शापातून मुक्त करण्यासाठी ३२०० कोटी रुपयांचा पूरनियंत्रण प्रकल्प मंजूर करून आणला.
• केशवराव भोसले नाट्यगृह: संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृहाला लागलेल्या दुर्दैवी आगीनंतर, तात्काळ माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांकडून २५ कोटी रुपयांचा निधी मंजूर करून घेतला आणि हे वैभव पुन्हा उभे करत आहोत.
• भविष्यातील पायाभूत सुविधा: कोल्हापूरच्या हद्दवाढीसाठी मी पहिल्यापासून आग्रही आहे. आगामी काळात शहरातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी ओव्हरब्रिज, भुयारी मार्ग आणि अद्ययावत पार्किंग व्यवस्था उभारण्यासाठी मी कटिबद्ध आहे.
“माझी ही अभूतपूर्व विकासकामे आणि कोट्यवधींचा निधी पाहूनच आमदार सतेज पाटील यांच्या पोटात पोटशूळ उठला आहे. आपण महापालिकेत असताना जे करू शकलो नाही, ते क्षीरसागर यांनी करून दाखवले, या असूयेपोटीच ते ही षडयंत्रे रचत आहेत,” असा टोला क्षीरसागर यांनी लगावला.
जनतेने काँग्रेसला नाकारले; आता ‘गोकुळ’ही महायुतीच्या ताब्यात येणार!
सतेज पाटील यांच्या घसरत्या राजकीय आलेखावर बोट ठेवत आमदार क्षीरसागर म्हणाले, “सतेज पाटील राजकारणाच्या मर्यादा विसरल्यामुळेच कोल्हापूरच्या सुजाण जनतेने विधानसभा निवडणुकीत त्यांचा १०-० असा दारूण पराभव केला. एवढेच नव्हे, तर नुकत्याच झालेल्या महानगरपालिका, जिल्हा परिषद आणि नगरपरिषदेच्या निवडणुकांमध्येही जनतेने काँग्रेसला नाकारून महायुतीला स्पष्ट बहुमत आणि सत्ता दिली आहे. आता त्यांच्या पायाखालची वाळू पूर्णपणे सरकली असून, आगामी काळात ‘गोकुळ’ दूध संघाची सत्ताही महायुतीच खेचून आणणार आहे. या पराभवाच्या भीतीपोटीच त्यांचे मानसिक संतुलन बिघडले असून ते असे केविलवाणे आरोप करत आहेत.”
फेक व्हिडीओ लगेच व्हायरल होतात.. याउलट सत्यता असणाऱ्या व्हिडिओला प्रसिद्धी मिळत नाही, हे दुर्दैव!
आजकाल सोशल मीडियावर खोट्या आणि सनसनाटी गोष्टी खूप वेगाने पसरतात, तर सत्य माहिती मागे पडते. सत्य व्हिडिओ अनेकदा साधे आणि वास्तववादी असतात, त्यामुळे ते लगेच लक्ष वेधून घेत नाहीत. प्रत्येक व्हिडिओ शेअर करण्यापूर्वी त्याची सत्यता तपासणे अत्यंत गरजेचे आहे. माझ्याबाबतीत तर असे व्हिडीओ काही मिनिटातच संपूर्ण शहरभरात पसरतात. कदाचित हे व्हिडोओ पेड मॅसेज द्वारेही पसरविले जात असतील. पण, मी सादर केलेले सत्यता असणाऱ्या व्हिडिओला मात्र प्रसिद्धी मिळत नाही, हे दुर्दैवच म्हणावे लागेल, असेही आमदार राजेश क्षीरसागर म्हणाले.
सुख-दुःखात मी जनतेसोबत; पाटलांनी आत्मपरीक्षण करावे!
शेवटी आपली सामाजिक बांधिलकी स्पष्ट करताना आमदार राजेश क्षीरसागर म्हणाले, “माझ्या मतदारसंघात साजरे होणारे विविध गणेशोत्सव, नवरात्रोत्सव, महापुरुषांच्या जयंत्या असोत, वा सामाजिक, कला आणि क्रीडा क्षेत्रातील उपक्रम असोत, मी नेहमीच हिरीरीने भाग घेतला आहे. खेळाडूंना, कलाकारांना आर्थिक मदत देणे, जळीतग्रस्त, पूरग्रस्त आणि आपत्तीग्रस्त गोरगरीब नागरिकांना धीर देऊन मदत करणे, शहरातील तालीम संस्था आणि मंडळांना बळ देणे, यात मी कधीही मागे राहिलो नाही. माझ्या एवढी प्रत्यक्ष मदत कोल्हापूरच्या जनतेला कोणी केली आहे का, हे जनतेला चांगले ठाऊक आहे. आम्ही सामाजिक सेवेचे भान ठेवून अहोरात्र काम करत आहोत. त्यामुळे सतेज पाटलांनी माझ्यावर चिखलफेक करण्याचे धंदे बंद करावेत आणि स्वतःचे राजकीय अस्तित्व संपत आल्यामुळे आत्मपरीक्षण करावे, हाच त्यांना माझा सल्ला आहे.”
या पत्रकार परिषदेस शिवसेना जिल्हाप्रमुख सुजित चव्हाण, भाजप जिल्हाध्यक्ष विजय जाधव, माजी प्रदेश सचिव महेश जाधव, उपमहापौर अक्षय जरग, राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे गटनेते आदिल फरास, नगरसेविका मंगल साळोखे, नगरसेविका शिला सोनुले, नगरसेविका अनुराधा खेडकर, नगरसेवक ऋतुराज क्षीरसागर, नगरसेवक अजय इंगवले, विनायक साळोखे, शिवसेना शहरप्रमुख रणजित जाधव, तुकाराम साळोखे, सुनील जाधव, कमलाकर जगदाळे, हर्षल सुर्वे, महिला आघाडी शहरप्रमुख पवित्रा रांगणेकर आदी महायुतीचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.