no images were found
कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिर विकास कामांच्या पार्श्वभूमीवर भव्य कृतज्ञता मेळाव्याचे आयोजन
कोल्हापूर (प्रतिनिधी): साडेतीन शक्तीपीठांपैकी एक असलेल्या कोल्हापूरच्या श्री अंबाबाई मंदिराच्या विकास कामांसाठी केंद्र आणि राज्य शासनाने दिलेल्या भरघोस निधीबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी कोल्हापुरात भव्य कृतज्ञता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या विकास कामांच्या भूमिपूजनासाठी देशाचे गृहमंत्री अमित शहा हे दि. १९ आणि २० रोजी कोल्हापूर दौऱ्यावर येत आहेत. या पार्श्वभूमीवर खासदार धनंजय महाडिक यांनी पत्रकारांशी संवाद साधताना या दौऱ्याची आणि नियोजित मेळाव्याची सविस्तर माहिती दिली.
खासदार महाडिक यांनी सांगितले की, अनेक वर्षांपासून विकासाच्या प्रतीक्षेत असलेल्या अंबाबाई मंदिर परिसराचा विकास आता मार्गी लागला आहे. राज्य सरकारने या तीर्थक्षेत्राच्या आणि परिसराच्या विकासासाठी तब्बल १४४५ कोटी रुपयांचा भरीव निधी मंजूर केला असून, त्यापैकी १४५ कोटी रुपयांच्या प्रत्यक्ष कामांना सुरुवातही झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून ज्याप्रमाणे उज्जैनचे महाकाल मंदिर, वाराणसी, केदारनाथ आणि बद्रीनाथ यांसारख्या तीर्थक्षेत्रांचा देशभरात विकास झाला, त्याच धर्तीवर आता कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिराचाही कायापालट होणार आहे. शहराच्या मध्यभागी मंदिर असल्यामुळे पार्किंग, अन्नछत्र आणि स्वच्छतागृहांसारख्या मूलभूत सुविधांचा अभाव होता. आणि भाविकांची मोठी गैरसोय होत होती. मात्र, या नव्या आणि भव्य आराखड्यामुळे भविष्यात वाढणाऱ्या भाविकांच्या संख्येला सामावून घेता येईल आणि सर्व सोयी-सुविधा उपलब्ध होतील.
या ऐतिहासिक निर्णयाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व पवार यांचे आभार मानण्यासाठी दि. २० तारखेला पोलीस मैदान येथे सकाळी १० वाजता या कृतज्ञता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्यास सुमारे १० ते १५ हजार नागरिक आणि भाविक उपस्थित राहतील असा अंदाज आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील आणि महाराष्ट्रातील सर्व अंबाबाई भक्तांनी, तसेच नागरिकांनी या सोहळ्यात मोठ्या संख्येने सहभागी होऊन महायुती सरकारचे आभार मानावेत, असे आवाहन खासदार धनंजय महाडिक यांनी केले आहे.