no images were found
शिवाजी विद्यापीठात बी.एस्सी.-बी.एड. विद्यार्थ्यांसाठी १५ दिवसीय प्रवेशोत्तर मार्गदर्शन कार्यक्रमास प्रारंभ
कोल्हापूर: शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूरच्या शिक्षणशास्त्र अधिविभागामध्ये बी.एस्सी.-बी.एड. (ITEP) या चार वर्षीय एकात्मिक अभ्यासक्रमाच्या शैक्षणिक वर्ष २०२६–२७ च्या प्रवेशप्रक्रियेनंतर नव्याने प्रवेशित विद्यार्थ्यांसाठी १५ दिवसीय प्रवेशोत्तर मार्गदर्शन कार्यक्रमास काल प्रारंभ करण्यात आला.
या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून विद्यापीठाच्या आंतरविद्याशाखीय विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. अजय साळी उपस्थित होते. विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना त्यांनी केवळ पदवी प्राप्त करण्यापुरते शिक्षण मर्यादित न ठेवता ज्ञान, कौशल्ये आणि अनुभवाच्या कक्षा रुंदावून सर्वांगीण व्यक्तिमत्त्व विकास साधणे ही आजच्या काळाची गरज असल्याचे सांगितले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिक्षणशास्त्र अधिविभागाच्या प्रमुख डॉ. चेतना सोनकांबळे होत्या. त्यांनी विद्यार्थ्यांनी शैक्षणिक प्रगतीबरोबरच सामाजिक जाणीव, मूल्ये आणि व्यक्तिमत्त्व विकासावरही भर देण्याचे आवाहन केले.
बी.एस्सी.-बी.एड. (ITEP) अभ्यासक्रमाच्या समन्वयक डॉ. रुपाली संकपाळ यांनी अभ्यासक्रमाची वैशिष्ट्ये सांगितली. डॉ. विद्यानंद खंडागळे यांनी शिक्षणशास्त्र अधिविभागातील विविध अभ्यासक्रम, शैक्षणिक उपक्रम आणि विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध संधी यांची सविस्तर माहिती दिली.
निशांत कुमार आणि सृष्टी पाटील यांनी सूत्रसंचालन केले. संजना भालकर यांनी परिचय करून दिला, तर डॉ. सुप्रिया पाटील यांनी आभार मानले. यावेळी सरस्वती कांबळे, सारिका पाटील, अजय तरंगे, साबिया बागवान, प्रफुल्ल डांगे, श्रीराम सोनवणे यांच्यासह शिक्षक, संशोधक विद्यार्थी, प्रशिक्षणार्थी आणि विद्यार्थी-विद्यार्थिनी उपस्थित होते.