no images were found
पदक प्राप्त खेळाडूंचा जिल्हाधिकारी यांच्या हस्ते सत्कार
कोल्हापूर, : भारतीय संस्कृतीत योगाला असलेले महत्त्व यामध्ये, पहिल्या जागतिक योगासन स्पर्धेमध्ये कोल्हापूरच्या खेळाडूंनी मिळवलेले यश हे अत्यंत कौतुकास्पद आहे. खेळामध्ये कोल्हापूर अग्रगण्य राहील यासाठी खेळाडूंना आवश्यक त्या पायाभूत सुविधा व सहकार्य करण्यात येईल, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांनी जागतिक योगासन स्पर्धेमध्ये पदकप्राप्त विजेत्यांच्या सत्कार प्रसंगी केले.
4 ते 8 जून दरम्यान ट्रांस स्टडिया स्टेडीयम, अहमदाबाद (गुजरात) येथे संपन्न झालेल्या पहिल्या जागतिक योगासन स्पोर्टस चॅम्पियन स्पर्धेमध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील तीन खेळाडूंची भारतीय संघात निवड झाली होती. या स्पर्धेत सीनियर ब गटात सुपाईन या प्रकारात रोहित चव्हाण याने तर ज्युनिअर गटात वृंदा भुतडा हिने फाँरवर्ड बेंडिंग व निवेष पाटील याने सब ज्युनिअर गटात फाँरवर्ड बेंडिंग व पारंपरिक सांघिक स्पर्धेत सहभाग घेतला होता. या स्पर्धेत वृंदा भुतडा हिने सुवर्णपदक, निवेश पाटील याने दोन सुवर्णपदक तसेच रोहित चव्हाण याने रौप्यपदक संपादन केले.
स्पर्धेत प्राविण्य प्राप्त खेळाडू व त्यांचे प्रशिक्षक राज्य क्रीडा मार्गदर्शक रविभुषण कुमठेकर व सुहास पवळे यांचा सत्कार जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी क्रीडा व युवक सेवा, कोल्हापूर विभागाचे उपसंचालक सुहास पाटील, जिल्हा क्रीडा अधिकारी विद्या शिरस, कोल्हापूर जिल्हा गुरुप्रसाद योग परिषद, इचलकरंजी व सरदार तालीम मंडळाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.