no images were found
‘मी ख्रिश्चन आहे, मला तुमचे देव चालत नाहीत!’ म्हणत देवतांची विटंबना करणाऱ्या ख्रिश्चन नर्सवर गुन्हा दाखल!
आरोपीला तात्काळ अटक करण्याची हिंदु जनजागृती समितीची मागणी
नवी मुंबई – नेरूळ येथे एका ख्रिश्चन नर्सने हिंदु देवतांच्या मूर्तींची आणि देवघराची जाणीवपूर्वक विटंबना करत देवतांना चपलांच्या स्टँडजवळ फेकून दिल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. या धार्मिक द्वेषातून घडलेल्या प्रकाराविरुद्ध तक्रारदार हिंदू महिलेचे बंधू श्री. हर्षल पाटील यांनी हिंदु जनजागृती समितीशी संपर्क साधून साहाय्य मागितले. समितीने तात्काळ साहाय्य देत नेरूळ पोलीस ठाण्यात आरोपी ख्रिश्चन नर्सविरुद्ध भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम २९८ आणि ३५१(२) अन्वये गुन्हा दाखल करण्यास आग्रह धरला. त्यानुसार गुन्हा दाखल झाला असून, त्या आरोपी ख्रिश्चन नर्सला तात्काळ अटक करण्याची *मागणी हिंदु जनजागृती समितीने केली आहे.*
हॉस्टेलच्या खोलीत राहणाऱ्या हर्षला पाटील या देवघरातील श्री गणेश आणि राधाकृष्ण यांच्या मूर्तींची नियमित पूजा करत असत. मे महिन्याच्या अखेरीस तिथे राहायला आलेल्या एका ख्रिश्चन नर्सने देवघराबाबत सातत्याने आक्षेप घेत वाद घालण्यास सुरुवात केली. ५ जून २०२६ रोजी हर्षला कामावरून परतल्या असता, तिला हॉलमधील देवघर थेट चपला काढण्याच्या ठिकाणी ठेवलेले आणि मूर्ती पाडलेल्या दिसल्या. याबाबत जाब विचारला असता त्या ख्रिश्चन नर्सने, ‘‘मी ख्रिश्चन आहे, माझ्या समोर मला देव नको, मी तुमच्या देवाला मानत नाही’’, असे म्हणत उद्धटपणे धार्मिक भावना दुखावणारे वक्तव्य केले.
सदर प्रकार रुग्णालय व्यवस्थापनाच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर त्यांनी ६ जून २०२६ रोजी त्या ख्रिश्चन नर्सला नोकरीवरून निलंबित केले. या कारवाईचा राग मनात धरून त्याच दिवशी संध्याकाळी तिने सामान घेण्याच्या बहाण्याने पुन्हा रूममध्ये प्रवेश केला आणि सूडबुद्धीने पुन्हा एकदा देवघर चप्पल काढण्याच्या ठिकाणी ठेवून मूर्ती पाडल्या. अशा प्रकारे तक्रारदाराच्या अनुपस्थितीत तिने तब्बल तीन वेळा मूर्ती खाली टाकून विटंबना केली आणि जाताना, ‘‘मी ख्रिश्चन आहे मी देवाला मानत नाही, हर्षलाला सांग हॉस्टेलच्या बाहेर भेट, तिला मी दाखविते’’, अशी थेट गुंडगिरीची धमकीही दिली.
या गंभीर प्रकरणाची माहिती मिळताच हिंदु जनजागृती समितीचे मुंबई प्रवक्ते डॉ. उदय धुरी, रणरागिणी शाखेच्या मुंबई जिल्हा समन्वयक सौ. प्रवीणा पाटील, श्री. निशांत चौधरी, श्री. दत्तात्रेय सावंत व अन्य धर्मप्रेमींनी नेरूळ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. अजय कांबळे यांची भेट घेऊन तात्काळ कारवाईची मागणी केली. पोलिसांनी प्रकरणाची गांभीर्याने दखल घेत गुन्हा (FIR No. ०३११) नोंदवला.
याविषयी बोलताना रणरागिणी शाखेच्या सौ. प्रवीणा पाटील म्हणाल्या, ‘‘छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात हिंदूंच्या श्रद्धास्थानांवर होणारे असले आघात आणि हिंदू देवतांची विटंबना करणारे असे प्रकार यापुढे कदापि खपवून घेतले जाणार नाहीत. या प्रकरणात पोलिसांची तत्परता स्वागतार्ह आहे; मात्र कायद्याचा धाक बसण्यासाठी आरोपीला तात्काळ अटक होणे आवश्यक आहे. अटक होईपर्यंत रणरागिणी शाखा आणि अन्य हिंदुत्वनिष्ठ संघटना या प्रकरणाचा सातत्याने पाठपुरावा करत राहतील.’’