no images were found
छत्रपतींचा शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख सहन करणार नाही-आनंद रेखी
नवी दिल्ली / मुंबई : हिंदवी स्वराज्याचे संस्थापक, महाराष्ट्राचे दैवत छत्रपती शिवाजी महाराज तमाम हिंदुस्तानासाठी वंदनीय, पुज्यनीय आहेत. महाराजांची गौरवगाथा आजही असंख्यांना प्रेरणा देणारी आहे. पंरतु,राजधानी दिल्लीत श्रीमंत छत्रपतींच्या नावाचा एकेरी उल्लेख असलेले मेट्रो-रेल्वे स्टेशन, स्टेडियम तसेच पार्क आहेत. ही बाब मन दुखावणारी असून महाराजांवर असलेल्या श्रद्धेचा अपमान करणारी आहे. त्यामुळे या सर्व ठिकाणांची नावे बदलून ती छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम, छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम मेट्रो स्टेशन, छत्रपती शिवाजी महाराज ब्रीज स्टेशन आणि छत्रपती शिवाजी महाराज पार्क असे करावे, अशी मागणी भाजप नेते आनंद रेखी यांनी केली आहे. मागणी मान्य झाली नाही तर तीव्र आंदोलन करू, असा इशारा देखील आनंद रेखी यांनी दिला आहे.
यासंदर्भात लवरकरच केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव,दिल्ली मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशन (डीएमआरसी) तसेच संबंधित अधिकाऱ्यांच्या भेटी घेणार असल्याची माहिती रेखी यांनी सोमवारी दिल्लीत दिली. राज्यसभेचे माजी खासदार संभाजी राजे छत्रपती यांच्याही निर्दशनात ही बाब आणून देवू, असे रेखी म्हणाले. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील या मागणीला समर्थन देत या ठिकाणांवरील महाराजांचा एकेरी उल्लेख असलेले नाव हटवण्याच्या अनुषंगाने पाठपुरावा करण्याचे आवाहन रेखी यांनी केले.
दिल्लीच्या मध्यभागी कॅनॉट प्लेस परिसरात ‘शिवाजी स्टेडियम’ तसेच ‘शिवाजी स्टेडियम मेट्रो स्टेशन’ आहे. यासोबतच याच परिसरात रेल्वेचे ‘शिवाजी ब्रीज’ नावाचे छोटे रेल्वे स्टेशन आहे. पंरतु, या ठिकाणी करण्यात आलेला महाराजांचा एकेरी उल्लेख तमाम शिवभक्तांचा तसेच मराठी जणांचा अपमान करणारा आहे.छत्रपतींनी हिंदुत्व रक्षणासाठी दिलेला लढा प्रेरणादायी आहे. छत्रपती शिवराय हे आमचे दैवत आहे. त्यांना देव्हाऱ्यात नाही तर काळजात जपणारी मराठी जनतेची जात आहे.समाजातील प्रत्येक वर्ग महाराजांना मानतो. ज्यांनी हे सर्व धर्म राखणारे स्वराज्य उभे केले आहे त्या छत्रपतींचा एकेरी नावाने उल्लेख वेदनादायी,असहनीय आहे. त्यामुळे तात्काळ संबंधित ठिकाणांची नावे बदलण्याचे आवाहन रेखी यांनी केले आहे.