
no images were found
अडगळीत पडलेल्या माने गटाला खासदार केले, शिवसैनिकांचे काय चुकले? : मुरलीधर जाधव
कोल्हापूर : हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील शिवसेनेचे खासदार धैर्यशील माने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात सामील झाल्याच्या निषेधार्थ हजारो शिवसैनिकांनी खासदार धैर्यशील माने यांच्या निवासस्थानावर मोर्चा काढला. यावेळी अडगळीत पडलेल्या माने गटाला शिवसेनेने ताकद दिली, मते दिली, माने यांना खासदार केले यात शिवसैनिकांचे काय चुकले असा सवाल जिल्हाप्रमुख मुरलीधर जाधव यांनी केला. मोर्चा वेळी आक्रमक झालेल्या शिवसैनिकांना आवरताना पोलिसांची तारांबळ उडाली.
हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील शिवसैनिकांचा हा मोर्चा जिल्हाप्रमुख मुरलीधर जाधव यांच्या नेतृत्वाखाली मार्केट यार्ड येथून खासदार धैर्यशील माने यांच्या रुईकर कॉलनीतील निवासस्थानाकडे दुपारी बारा वाजता निघाला. यावेळी त्यांच्यासोबत उपजिल्हाप्रमुख साताप्पा भवान, हातकणंगले तालुकाप्रमुख बाजीराव पाटील, माजी जि. प. सदस्य महेश चव्हाण, युवा सेनेचे वैभव उगळे तसेच अनिल खवरे, शिरोलीचे उपसरपंच सुरेश यादव, शिरोली शहर प्रमुख राजकुमार पाटील, अशोक खोत. आदींसह हजारो शिवसैनिक युवासैनिक सहभागी झाले होते.
मोर्चात कोल्हापूर लोकसभा मतदारसंघाचे जिल्हाप्रमुख संजय पवार, विजय देवणे, शहर प्रमुख रविकिरण इंगवले, सुनील मोदी, हर्षल सुर्वे, माजी जिल्हाप्रमुख विनायक साळुंखे आदींसह शिवसैनिक ही सहभागी झाले. खासदार धैर्यशील माने यांचा शेलक्या शब्दात निषेध करीत निघालेल्या या मोर्चासाठी मोठा फौज फाटा लावून पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
रुईकर कॉलनीतील धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज पुतळ्याजवळ बॅरिकेट्स लावून हा मोर्चा अडवण्यात आला. या ठिकाणी निषेध सभा घेण्यात आली. यामध्ये शहर प्रमुख रवीकिरण इंगवले यांनी धैर्यशील माने हा शिवसेनेचा बोलका होता पण तो उडाला. असा टोला लगावला. जिल्हाप्रमुख मुरलीधर जाधव यांनी जरा जरी लाज वाटत असेल तर शिवसेनेत परत या अन्यथा खासदारकीचा राजीनामा द्या आणिपुन्हा निवडणूक लढवा असे आव्हान दिले. याच वेळी खासदार धैर्यशील माने यांच्या निवासस्थानाकडे धाव घेणाऱ्या शिवसैनिकांना पोलीस आणि जलद कृती पथकाच्या जवानांनी अडवले. मोर्चाचे नेतृत्व करणारे नेते आणि काही शिवसैनिकांना पोलिसांनी ताब्यात घेतले.