Home Uncategorized मतदार याद्यांची ‘विशेष सखोल पुनरिक्षण’ मोहिम; जून ते ऑक्टोबर दरम्यान राबवला जाणार कार्यक्रम

मतदार याद्यांची ‘विशेष सखोल पुनरिक्षण’ मोहिम; जून ते ऑक्टोबर दरम्यान राबवला जाणार कार्यक्रम

30 second read
0
0
5

no images were found

मतदार याद्यांची ‘विशेष सखोल पुनरिक्षण’ मोहिम; जून ते ऑक्टोबर दरम्यान राबवला जाणार कार्यक्रम

  कोल्हापूर मध्ये ३४५० मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांमार्फत (BLO) व ३९२८ राजकीय पक्षांतर्फे मतदान केंद्रस्तरीय प्रतिनिधींची (BLA) नेमणूक

कोल्हापूर, : भारतीय संविधानाच्या कलम ३२४ अन्वये प्राप्त अधिकारात भारत निवडणूक आयोगाने संपूर्ण देशात मतदार याद्यांचे विशेष सखोल पुनरिक्षण (SIR) घेण्याबाबत २४ जून २०२५ रोजी आदेश निर्गमित केले आहेत. यापूर्वी देशामध्ये १९५२-५६, १९५७, १९६१, १९६५-६६, १९८३-८४, १९८७-८९, १९९२-१९९५ आणि २००२-२००४ या वर्षांमध्ये असे विशेष सखोल पुनरिक्षण घेण्यात आले होते. त्यानंतर मागील २० वर्षांमध्ये केवळ ‘विशेष संक्षिप्त पुनरिक्षण’ घेण्यात आले असून, विशेष सखोल पुनरिक्षण घेण्यात आलेले नाही. या २० वर्षांच्या कालावधीत मतदार याद्यांमध्ये मोठ्या प्रमाणात नावे समाविष्ट करणे व वगळणे या प्रक्रिया झाल्या आहेत. तसेच, झपाट्याने झालेल्या शहरीकरणामुळे लोकसंख्येचे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर स्थलांतर झाले असून, अनेक मतदारांनी नवीन ठिकाणी नाव नोंदवले असले तरी जुन्या ठिकाणचे नाव वगळलेले नाही; ज्यामुळे मतदार याद्यांमध्ये दुबार नावे वाढली असण्याची शक्यता आहे. संविधानाच्या कलम ३२६ नुसार मतदार यादीत नाव समाविष्ट करण्यासाठी संबंधित व्यक्ती भारताचा नागरिक असणे व वयाची १८ वर्षे पूर्ण असणे आवश्यक असल्याने, मतदार यादीतील व्यक्ती भारतीय नागरिक असल्याची खातरजमा करण्याची जबाबदारी आयोगावर येते. लोकप्रतिनिधित्व अधिनियम, १९५० च्या कलम २१ नुसार आयोगाला हे अधिकार प्राप्त आहेत.

      या मोहिमेच्या पहिल्या टप्प्यात बिहारमध्ये आणि दुसऱ्या टप्प्यात ९ राज्ये व ३ केंद्रशासित प्रदेशांमध्ये हा कार्यक्रम २०२५-२६ मध्ये राबविण्यात आला आहे. आता तिसऱ्या टप्प्यात महाराष्ट्र राज्यासह एकूण १६ राज्ये आणि ३ केंद्रशासित प्रदेशांमध्ये ही मोहीम व्यापक स्वरूपात राबवली जात आहे, ज्यामध्ये महाराष्ट्रातील सुमारे ९ कोटी ८६ लाख मतदारांच्या नोंदींची प्रत्यक्ष पडताळणी केली जाईल. राज्यातील सध्याच्या जनगणनेच्या कामात व्यस्त असलेल्या क्षेत्रीय यंत्रणेचा विचार करून निवडणूक आयोगाने महाराष्ट्रासाठी तिसऱ्या टप्प्याचे वेळापत्रक निश्चित केले असून, ही प्रक्रिया जून महिन्यापासून सुरू होऊन ऑक्टोबर २०२६ मध्ये पूर्ण होईल. या अंतर्गत राज्यातील एकूण ९,८६,४४,४१३ मतदारांच्या तपशिलाची खातरजमा १,००,२५३ मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांमार्फत (BLO) केली जाणार आहे. कोल्हापूर मध्ये ३४५० मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांमार्फत (BLO) हे काम केले जाणार आहे. या प्रक्रियेत पारदर्शकता राखण्यासाठी राजकीय पक्षांतर्फे नेमण्यात येणारे मतदान केंद्रस्तरीय प्रतिनिधी (BLA) त्यांना सहकार्य करतील. कोल्हापूर जिल्ह्यात ३९२८ राजकीय पक्षांतर्फे मतदान केंद्रस्तरीय प्रतिनिधींची (BLA) नेमणूक करण्यात आली आहे.

      निश्चित केलेल्या वेळापत्रकानुसार, २० ते २९ जून २०२६ या कालावधीत गणना अर्जांची छपाई आणि बीएलओ (BLO) यांचे प्रशिक्षण पार पडेल. त्यानंतर ३० जून ते २९ जुलै २०२६ या कालावधीत बीएलओ घरोघरी जाऊन  मतदारांना आधीच काही माहिती भरलेल्या गणना प्रपत्राचे वाटप करतील आणि भरलेले अर्ज परत घेतील. या प्रपत्रामध्ये मतदारांची मतदार यादीतील सद्यस्थितीतील माहिती तसेच संबंधित मतदाराची किंवा त्याच्या आई-वडील/आजी-आजोबांची २००२-२००४ मधील मागील विशेष सखोल पुनरीक्षणातील माहिती आधीच भरलेली असेल किंवा मतदाराला ती स्वतः भरता येईल व नवीन छायाचित्रही उपलब्ध करून देता येईल. प्रत्यक्ष गृहभेटीच्या काळात जुनी माहिती भरणे सहज शक्य व्हावे म्हणून सध्या मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांकडून सद्यस्थितीतील मतदारांची जुळवणी जुन्या नोंदींशी करण्याची पूर्वतयारी सुरू असून, आजमितीस राज्यात ७२.०४% मॅपिंग पूर्ण झाले आहे.

       मतदारांना देखील आपली किंवा आपल्या कुटुंबाची २००२-२००४ च्या कालावधीतील माहिती निवडणूक आयोगाच्या https://voters.eci.gov.in/ या संकेतस्थळावरून केवळ त्यावेळचे राज्य, जिल्हा, विधानसभा मतदारसंघ आणि संपूर्ण नाव ही प्राथमिक माहिती भरून सहज मिळवता येईल. मतदारांनी ही माहिती जतन करून ठेवून गृहभेटीसाठी आलेल्या ओळखपत्र धारक अधिकाऱ्याला उपलब्ध करून द्यावी. गृहभेटीदरम्यान घर बंद आढळल्यास बीएलओ किमान ३ वेळा संबंधित घराला भेट देऊन तशी नोंद ठेवतील आणि योग्यरितीने भरलेले व स्वाक्षरी केलेले गणना प्रपत्र गोळा करण्यासाठी पुन्हा भेट देतील. मतदारांना हे गणना प्रपत्र ऑनलाइन पद्धतीनेही भरण्याची सुविधा उपलब्ध असेल.

      यानंतर मतदारांकडून प्राप्त झालेल्या अर्जांचा विचार करून ५ ऑगस्ट २०२६ रोजी प्रारुप मतदार याद्या प्रसिद्ध केल्या जातील. या प्रारुप यादीवर ५ ऑगस्ट ते ४ सप्टेंबर २०२६ या कालावधीत दावे व हरकती नोंदवता येतील, ज्या ३ ऑक्टोबर २०२६ पर्यंत निकालात काढल्या जातील आणि अखेर ७ ऑक्टोबर २०२६ रोजी अंतिम मतदार याद्यांची प्रसिद्धी केली जाईल. प्रारुप यादी प्रसिद्ध झाल्यावर ज्या मतदारांची नावे जुन्या नोंदींशी जुळली नसतील किंवा जुळणीत त्रुटी असतील, अशा व्यक्तींना मतदान नोंदणी अधिकाऱ्यांमार्फत नोटिसा पाठवल्या जातील. तसेच अशा व्यक्तींच्या नावांची यादी संभाव्य कारणांसह स्थानिक स्वराज्य संस्था कार्यालय, तहसीलदार कार्यालय, जिल्हा निवडणूक अधिकारी आणि मुख्य निवडणूक अधिकारी यांच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध केली जाईल. अशा मतदारांनी सादर करावयाच्या कागदपत्रांची यादी गणना प्रपत्राच्या मागे दिलेली आहे. निवडणूक आयोगाच्या ९ सप्टेंबर २०२५ च्या आदेशानुसार आधार हे ओळख पुरावा म्हणून वापरले जात असले, तरी ‘आधार ॲक्ट, २०२६’ च्या कलम ९ प्रमाणे आधारकार्ड हा नागरिकत्वाचा पुरावा मानला जाणार नाही, याची मतदारांनी नोंद घ्यावी.

     या संपूर्ण प्रक्रियेत राजकीय पक्षांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असून दुबार व मृत व्यक्तींची नावे काढणे आणि नवीन पात्र मतदारांची नोंदणी करणे ही प्रक्रिया अधिक अचूक व पारदर्शक होण्यासाठी प्रत्येक मतदान केंद्रावर जास्तीत जास्त प्रतिनिधी (BLA) नियुक्त करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. राज्यात सध्या राजकीय पक्षांनी फक्त १,१३,५५८ मतदान केंद्रस्तरीय प्रतिनिधी नेमले आहेत. या कार्यक्रमाची सविस्तर माहिती देण्यासाठी लवकरच मान्यताप्राप्त राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींसमवेत एका बैठकीचे आयोजन करण्यात येत आहे. मतदार याद्या दोषविरहित आणि अचूक होण्यासाठी सर्व पात्र नागरिकांनी या मोहिमेत आपला सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

 

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In Uncategorized
Comments are closed.

Check Also

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या 12 वर्षांची पूर्तता: भारत जागतिक शक्ती म्हणून उदयास; 

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या 12 वर्षांची पूर्तता: भारत जागतिक शक्ती म्हणून उदयास;  देश…