no images were found
पंतप्रधानांचे देशवासियांना आवाहन आत्मनिर्भर भारताचा ‘मास्टरप्लॅन’-हेमंत पाटील
भारताला आर्थिक महासत्ता बनवण्यासाठी मोदींचा मंत्र प्रभावी
पुणे,: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतेच देशवासियांना केलेले आवाहन हे केवळ सल्ले नसून भारताला आर्थिक महासत्ता बनवण्यासाठीची एक दूरदृष्टी आहे, असे प्रतिपादन ‘भारत अगेन्स्ट करप्शन’चे राष्ट्रीय अध्यक्ष हेमंत पाटील यांनी मंगळवारी (ता.१२) केले. पंतप्रधानांच्या या आवाहनामुळे देशाचे परकीय चलन वाचण्यास मदत होईल आणि स्थानिक अर्थव्यवस्थेला मोठी उभारी मिळेल, असा विश्वास यानिमित्ताने त्यांनी व्यक्त केला.
पंतप्रधानांनी सोने खरेदी टाळण्याचे आणि खाद्यतेलाचा वापर मर्यादित करण्याचे केलेले आवाहन अत्यंत महत्त्वाचे आहे. भारताच्या परकीय चलनाचा मोठा साठा या दोन गोष्टींच्या आयातीवर खर्च होतो. जर नागरिकांनी या आवाहनाला प्रतिसाद दिला, तर आपली अर्थव्यवस्था अधिक मजबूत होईल. तसेच विदेशी उत्पादनांऐवजी स्थानिक दुकानदारांकडून स्वदेशी वस्तू खरेदी करण्याचा आग्रह धरणे, हे ‘व्होकल फॉर लोकल’ या मोहिमेला बळ देणारे असल्याचे पाटील म्हणाले.
भारतीयांमध्ये सध्या वाढत असलेल्या विदेशी डेस्टिनेशन वेडिंगच्या ट्रेंडवर चिंता व्यक्त करत हेमंत पाटील यांनी पंतप्रधानांच्या भूमिकेचे स्वागत केले. ते म्हणाले की, “आपल्या देशातील पैसा परदेशात जाण्यापेक्षा तो भारतातच राहिला पाहिजे. भारतात अनेक निसर्गरम्य आणि ऐतिहासिक स्थळे आहेत. ‘वेड इन इंडिया’ आणि देशांतर्गत पर्यटनाला प्राधान्य दिल्यास स्थानिक तरुणांना रोजगार मिळेल आणि भारताच्या मातीचा आशीर्वादही लाभेल. तसेच परदेशातील भारतीयांनी पाच विदेशी पर्यटकांना भारतात आणण्याचे आवाहन जागतिक स्तरावर भारताची प्रतिमा उंचावणारे ठरेल, असे मत पाटील यांनी व्यक्त केले.
रासायनिक खतांचा त्याग करून नैसर्गिक शेतीकडे वळणे आणि डिझेल पंपाऐवजी सौर ऊर्जेचा वापर करणे, ही काळाची गरज आहे. यामुळे शेतकऱ्यांचा खर्च कमी होऊन जमिनीचा कस टिकून राहील. तसेच मेट्रोचा वापर आणि ऑनलाईन मीटिंगला प्राधान्य दिल्यास इंधनाची बचत होऊन प्रदूषणावर नियंत्रण मिळवता येईल.”पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची ही दूरदृष्टी भारताला जागतिक स्तरावर आघाडीवर नेणारी आहे. प्रत्येक भारतीयाने या आवाहनाकडे एक जबाबदारी म्हणून पाहावे. भ्रष्टाचारमुक्त आणि समृद्ध भारत घडवण्यासाठी अशा शिस्तबद्ध जीवनशैलीची नितांत गरज आहे,” असे आवाहन हेमंत पाटील यांनी यावेळी केले.