no images were found
भारत सरकार मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्ती योजनेबाबत विद्यार्थ्यांना आवाहन
कोल्हापूर : भारत सरकार मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्ती योजनेंतर्गत अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांकडून शैक्षणिक वर्ष सन 2021-22 करीता शिष्यवृत्तीचे अर्ज ऑनलाईन भरण्यात आले आहेत. सन 2021-22 या कालावधीची शिष्यवृत्तीची रक्कम विद्यार्थ्यांच्या खात्यावर जमा करण्यात येत आहे. जिल्ह्यातील सर्व महाविद्यालयांतील अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांनी भारत सरकार मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्ती योजनेंतर्गत जमा झालेल्या रकमेतून निर्वाह भत्ता वगळता इतर रक्कम महाविद्यालयास अदा करावी, असे आवाहन समाज कल्याण विभागाचे सहायक आयुक्त विशाल लोंढे यांनी केले आहे.
अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांच्या भारत सरकार मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्ती योजनेंतर्गत सन 2020-21 ते 2025-26 या कालावधीकरीता माहे मार्च 2021 पासून सुधारित मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. मार्गदर्शक सूचनामधील निधी वितरणासंदर्भातील बाबी राज्यात लागू करण्यास सामाजिक न्याय व विशेष सहाय विभागाने मान्यता दिली आहे. त्यानुसार संपूर्ण शिष्यवृत्तीची रक्कम म्हणजेच महाविद्यालयास देय असणारा भाग (शिक्षण शुल्क, परीक्षा शुल्क व इतर नापरतावा शुल्क इ.) तसेच विद्यार्थ्यांना देय असणारा भाग (निर्वाह भत्ता) विद्यार्थ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यावर जमा करण्यात येणार आहे. तसेच जमा झालेली रक्कम विद्यार्थ्यास अनुज्ञेय असलेला निर्वाह भत्ता वजा जाता उर्वरित महाविद्यालयास देय असलेली रक्कम विद्यार्थ्याने पुढील सात दिवसांच्या आत महाविद्यालयास जमा करणे अनिवार्य आहे.