
no images were found
टीव्ही बंद केल्याने पत्नी-मुलाकडून वडिलांचा खून; घटनेने साताऱ्यात खळबळ
सातारा : घरात सुरू असलेला टिव्ही बंद केल्याच्या कारणावरून पत्नी व मुलाने वडिलांना काठीने आणि लाथाबुक्यांनी केलेल्या मारहाणीत मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. माण तालुक्यातील दिवड गावात घडलेल्या या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
माण तालुक्यात किसन नारायण सावंत आपल्या कुटुंबासह राहत होते. १ नोव्हेंबरला दुपारी अडीचच्या सुमारास किसन सावंत बाहेरून घरी आले. तर मुलगा व बायको मोबाईल पाहत होते. मात्र, घरातील टीव्ही तसाच चालू होता. तो कोणीही पाहत नाही म्हणून त्यांनी बंद केला. टीव्ही बंद केल्यामुळे पत्नी उषा किसन सावंत , मोठा मुलगा आदित्य किसन सावंत यांना राग आला. त्या दोघांनी आपआपसात संगनमत करून घरातील कळकाची दांडकी घेऊन त्यांना मारहाण केली. दोघांनी किसन यांच्या डोक्यात, अंगावर, छातीवर, पोटावर लाथाबुक्यांनी मारहाण केली. या मारहाणीत किसन सावंत गंभीर जखमी झाले.
या मारहाणीत गंभीर जखमी झाल्यामुळे किसन सावंत यांना त्यांच्या नातेवाईकांनी प्रथम पंढरपूर येथील खासगी रुग्णालयात दाखल केले. त्यानंतर पुणे येथील ससून हॉस्पिटल या ठिकाणी उपचारास नेले. उपचार सुरू असतानाच शनिवारी त्यांचा मृत्यू झाला आहे. या प्रकरणी मृताच्या बहिणीने म्हसवड पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. पोलिस या घटनेचा पुढील तपास करत आहेत.