no images were found
जनगणना 27:क्षेत्रीय प्रशिक्षकांसाठी 6 ते 15 एप्रिल या कालावधीत जिल्हाधिकारी कार्यालयात विशेष प्रशिक्षण शिबिराचे आयोजन
कोल्हापूर : जिल्हाधिकारी कार्यालयांतर्गत जनगणना २०२७ कामकाज सुरू झाले असून यामध्ये जिल्ह्यातील १२ तहसील कार्यालये व १३ नगरपालिका/नगरपंचायत कार्यक्षेत्राकरिता नियुक्त अधिकाऱ्यांच्या प्रशिक्षणाला सोमवार दि 6 एप्रिलपासून निवासी उपजिल्हाधिकारी गजानन गुरव तथा कोल्हापूर जिल्हा जनगणना अधिकारी यांच्या प्रमुख उपस्थितीत नवीन सभागृहात प्रारंभ करण्यात आला .
यावेळी मार्गदर्शन करताना श्री गुरव म्हणाले, जनगणनेचे कामकाज हे देशाच्या नियोजन व व्यवस्थापन प्रक्रियेत अत्यंत महत्त्वपूर्ण आहे . जिल्ह्यातील सर्व नियुक्त अधिकारी – कर्मचाऱ्यांनी हे प्रशिक्षण गांभीर्याने घ्यावे.या कामी दुर्लक्ष करू नये असे आवाहनही त्यांनी याप्रसंगी केले .
जिल्ह्यातील जनगणनेचा पहिला टप्पा (घरयादी व घरगणना) दिनांक १६ मे ते १४ जून दरम्यान होणार असून नागरिकांना घरबसल्या स्वयंगणना दिनांक १ मे ते १५ मे दरम्यान करता येणार आहे. यावेळची जनगणना ही प्रथमच डिजिटल पद्धतीने करण्यात येणार असून त्यासाठी CMMS पोर्टल व स्वतंत्र ॲप विकसित करण्यात आले आहे. यासाठी आवश्यक मनुष्यबळ नेमण्यात आले असून जिल्ह्यातील १२ तालुके व १३ नगरपालिका/ नगरपंचायतींसाठी सुमारे ५६९५ प्रगणक व तर ९८९ पर्यवेक्षक नियुक्त करण्यात आले आहेत.
काल जिल्ह्यातील ९० क्षेत्रीय प्रशिक्षकांना मास्टर ट्रेनर श्रीमती रूपाली सुर्यवंशी (तहसीलदार – गगनबावडा) व सांख्यिकी अधिकारी गजानन पाटील यांनी प्रशिक्षण दिले . यावेळी तहसीलदार (करमणूक) श्रीमती तेजस्वीनी पाटील,नायब तहसीलदार नितीन धापसे – पाटील, करमणूक कर निरीक्षक श्री प्रकाश जाधव यांच्यासह करमणूक कर विभागाचे इतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.