no images were found
छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल सातत्याने अपमानजनक विधाने करणार्या जितेंद्र आव्हाड यांची आमदारकी रहित करा ! – कोल्हापूर येथे निवेदन
कोल्हापूर – गेल्या काही काळापासून राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) आमदार जितेंद्र आव्हाड हे जाणीवपूर्वक आणि नियोजित पद्धतीने छत्रपती शिवाजी महाराज, प्रभु श्रीराम आणि हिंदू संस्कृतीबद्दल वादग्रस्त विधाने करून समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत.
छत्रपती शिवरायांच्या राज्याभिषेकाच्या संदर्भात अत्यंत खोटारडे, खालच्या पातळीवरील आणि जातीयवादी विष पसरवणारे वक्तव्य जितेंद्र आव्हाड यांनी केले. तरी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल सातत्याने अपमानजनक विधाने करणार्या जितेंद्र आव्हाड यांची आमदारकी रहित करावी आणि धार्मिक भावना दुखावल्याबद्दल, तसेच चुकीचा इतिहास पसरवल्याबद्दल त्यांच्यावर कठोर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात यावा. या मागणीचे निवेदन हिंदु जनजागृती समितीच्या वतीने कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयात देण्यात आले.
मुख्यमंत्र्यांच्या नावे असलेले हे निवेदन नायब तहसीलदार नम्रता चौगुले यांनी स्वीकारले. या प्रसंगी हिंदु जनजागृती समितीचे श्री. शिवानंद स्वामी, महाराजा प्रतिष्ठानचे श्री. निरंजन शिंदे, मंदिर महासंघाचे श्री. अशोक गुरव, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख श्री. किशोर घाटगे, हिंदु राष्ट्र समन्वय समितीचे श्री. रामभाऊ मेथे, शिवशाही फाऊंडेशनचे संस्थापक श्री. सुनील सामंत, ‘मराठा तितुका मेळवावा’चे श्री. योगेश केरकर, हिंदू महासभेचे श्री. मनोहर सोरप, भाजपचे एस्.बी. देवणे, हिंदू महासभा शहराध्यक्षा पूजा शिंदे, हिंदुत्वनिष्ठ सर्वश्री प्रकाश घाटगे, शशिकांत बीडकर, दीपक हारूगडे उपस्थित होते.
* जितेंद्र आव्हाड यांनी यापूर्वी केलेली विधाने*
१ ‘तुम्ही औरंगजेबाला इतिहासातून काढू शकत नाही. औरंगजेबाला काढलं तर तुम्ही छत्रपती शिवाजी महाराज यांना समजवू शकत नाही. असे क्रूरकर्मा असतात म्हणून माझा माणूस हिरो होतो,’
२. ‘छत्रपती संभाजी महाराजांचे डोळे फोडले, त्याठिकाणी विष्णूचे मंदिर होते. औरंगजेब क्रूर आणि हिंदू द्वेष्टा असता तर विष्णूचं मंदिरही तोडलं असतं’
३. ‘मोगलांचा इतिहास अभ्यासक्रमातून काढणार, मग शिवाजी महाराज काय गोट्या खेळले असे दाखवणार ? समोर औरंगजेब आहे, म्हणून शिवाजी महाराज आहेत ना? समोर अफझलखान आहे, म्हणून शिवाजी महाराज आहेत ना? शाहिस्तेखान आहे, म्हणून शिवाजी महाराज आहेत ना?’
४. ‘राम आमच्या बहुजनांचा आहे, शिकार करुन खाणारा राम मांसाहारी होता’ असे म्हणत प्रभु श्रीरामांच्या संदर्भातही अत्यंत अपमानजनक टिप्पणी केली होती.