no images were found
कोल्हापूमध्ये तरुणाची पाठलाग करुन हत्त्या
कोल्हापूर : रविवारी रात्रीच्या सुमारास कोल्हापूरमध्ये एका 22 वर्षांच्या तरुणावर धारदार शस्त्राने सपासप वार करत त्याचा खून करण्यात आला.
या थरारक घटनेमुळे कोल्हापूरमध्ये खळबळ उडाली. कुमार शाहूराज गायकवाड (वय २२, रा. राजेंद्रनगर) या तरुणाची हत्या करण्यात आली आहे. कुमारची टोळीयुद्धातून हत्या करण्यात आली असल्याचे समजतेय. रविवारी रात्रीच्या सुमारास कुमारचा पाठलाग करत त्याच्यावर तब्बल 20 वार करण्यात आले.
कोल्हापूरमध्ये कुमार गायकवाड हा तरुण आपल्या मामाच्या घरी राहत होता. कुमारचा राजेंद्र नगर परिसरातील एका टोळीतील तरुणासोबत नुकताच वाद झाला असल्याचे समजते. या झालेल्या वादातूनच विरोधी टोळीतील तरुणांनी कुमारच्या हत्येचा कट रचल्याचा संशय पोलिसांकडून व्यक्त केला जात आहे. कुमार हा तरून एका मॉलजवळ थांबला होता. विरोधी टोळीतील काही तरुण त्याठिकाणी आले. घटनास्थळावरुन कुमार आपल्यावर हल्ला होईल या भीतीपोटी जीव वाचविण्याच्या प्रयत्नात धावत सुटला. मात्र हल्लेखोरांनी कुमारचा पाठलाग करून त्याला गाठत त्याच्यावर सपासप वार केले.
कुमार उड्डाणपुलाकडून टाकाळा खणीच्या दिशेने पळाला होता. त्यादरम्यान, काही तरुणांनी कोयत्यासह एडक्याने कुमारवर हल्ला केला. कुमारचा चेहरा, हात, डोकं आणि छातीवर हल्लेखोरांनी सपासप वार केले. ह्ल्लेखोरांनी गंभीर स्वरुपाचे एकूण 20 वार करून कुमारची हत्या केली.
कुमार घरी बराचकाळ न परतल्याने त्याच्या मामाने फोन केला असता तो उचलत नसल्याने त्याला शोधण्यास सुरुवात झाली. शोधत असताना कुमार एका ठिकाणी गंभीर जखमी अवस्थेत आढळला. बेशुद्ध अवस्थेत पडलेल्या कुमारला घेऊन रुग्णालयात दाखल करण्यात आले परंतु त्याआधीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. कुमार हा आपल्या मामाचा व्यवसाय पाहत होता.
कुमारची अशाप्रकारे हत्त्या झाल्याचे समजताच त्याच्या गटातील तरुणांनी सीपीआर रुग्णालयाबाहेर एकच गर्दी केली होती. खुनाच्या या घटनेनंतर कोल्हापूरच्या सीपीआर रुग्णालय परिसरात तणाव निर्माण झाल्यामुळे पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत बंदोबस्त वाढवला. हल्लेखोरांचा शोध घेण्यासाठी राजारामपुरी पोलीस आणि स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पथक रवाना झाले असून पुढील तपास सुरू आहे.