no images were found
पतीच्या पाठोपाठ पत्नीने ४ तासातच प्राण सोडला
हृदय विकाराच्या झटक्यानं पतीचं अकाली निधन झाल्याचे दु:ख पत्नीला सहन न झाल्यामुळे ४ तासातच पत्नीने प्राण सोडला.
मुंबई: पतीच्या अकाली निधनामुळे धक्का बसून पत्नीनेही प्राण सोडल्याची दुर्दैवी घटना घडली. अवघ्या चार तासांमध्ये दोघांचाही मृत्यू झाल्यामुळे त्यांच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. हृदय विकाराच्या झटक्यामुळे पतीचे अकाली निधन झाले. त्यामुळे पत्नीला जबर धक्का बसला. पतीच्या मृत्युनंतर चार तासांतच पत्नीनेही प्राण सोडले.
मुंबईमध्ये विक्रोळी येथे राहणाऱ्या बिणू कोशी (वय ४५ वर्षे) व प्रमिला (वय ४३ वर्षे) या पती-पत्नीचा एकाच दिवशी थोड्या अंतराने मृत्यू झाला आहे. बिणू दोषी यांना त्रास जाणवू लागल्यामुळे त्यांना विक्रोळीतील आंबेडकर रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. सकाळी १० च्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली. बिणू यांनी अखेरचा श्वास घेतला त्याप्रसंगी प्रमिला या रुग्णालयातच हजर होत्या.
पतीच्या निधनाबद्दल समजताच त्यांना रडू कोसळले. नातेवाईकांसोबत त्याना घरी आणण्यात आले. घरी पोहोचल्यानंतर त्या बेशुद्ध पडल्याची माहिती त्यांच्या शेजारी चांदवती श्रीवास्तव यांनी दिली. प्रमिला यांना देखील आंबेडकर रुग्णालयात दाखल केले परंतु पतीच्या निधनाचा दु:खाचा डोंगर त्त्या सावरू शकल्या नाहीत त्यांनाही हृदयविकाराचा झटका आला. त्यातच प्रमिला यांचेही दु. २ वाजता निधन झाले. त्यांना २ मुले असून मोठा मुलगा २१ वर्षांचा तर छोटा १८ वर्षांचा आहे. दोघांच्या अशा जाण्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.