no images were found
हेमंत खेर चे ‘पुष्पा इम्पॉसिबल’मध्ये नाट्यमय पुनरागमन
गुपिते, फसवेगिरी आणि असंभव वाटणारे पर्याय यांनी भरलेल्या दमदार कथानकाच्या बळावर सोनी सबवरील ‘पुष्पा इम्पॉसिबल’ मालिकेने प्रेक्षकांना खिळवून ठेवले आहे. या मालिकेत एका गृहिणीमधून न्यायासाठी झगडणाऱ्या वकिलापर्यंतचा प्रवास करणाऱ्या पुष्पाची (करुणा पांडे) कहाणी उलगडून सांगितली आहे. मालिका आत्ता एका अत्यंत तीव्र आणि धक्कादायक टप्प्यावर येऊन पोहोचली आहे. त्यात विरेन सेतलवाडच्या रूपात हेमंत खेरच्या पुनरागमनामुळे मालिकेतील नाट्य आणखीनच वाढणार आहे. ही व्यक्तिरेखा जुन्या जखमा पुन्हा ताज्या करणार आहे आणि नवे संघर्ष उभे करणार आहे.
जुगल (अंशुल त्रिवेदी) चा चुलता विरेन हा एकेकाळी एक यशस्वी व्यावसायिक होता आणि भरभराटीला आलेला पटोळा व्यवसाय चालवत होता. पुष्पा आणि जुगल यांनी जेव्हा ‘ताना बाना’च्या रूपात या मार्केटमध्ये प्रवेश केला, तेव्हा त्याची पडती सुरू झाली आणि व्यवसाय कोलमडला. निराश झालेल्या विरेनने एक अंधारा मार्ग स्वीकारला आणि पुष्पाचे जीवन उद्ध्वस्त करायला निघालेल्या विरेनचे पितळ उघडे झाल्यावर त्याची रवानगी तुरुंगात करण्यात आली होती. आता एक वर्षाने विरेन नवे हेतू मनात ठेवून आणि एक खतरनाक युती करून परतला आहे. कादंबरी (वृंदा त्रिवेदी) सोबत हातमिळवणी करून तितलीच्या ताब्याविषयी चाललेल्या लढ्यात तो सामील झाला आहे. मालिकेतील नाट्य अधिक रंगत जाते, जेव्हा कादंबरी विरेन या आपल्या कट्टर शत्रूला आपल्या जीवनात परत आणते आणि कोर्टात त्याला तितलीचे ‘बडे पापा’ म्हणून सादर करते. विरेन भावना आणि कायदेशीर तर्क यांची हुशारीने सांगड घालून विरेन तितलीचा ताबा मिळवण्यासाठी प्रबळ दावा करतो आणि तो पुष्पाच्या प्रयत्नांवर पाणी फिरवणार असे चित्र दिसू लागते तेव्हा तर पुष्पा आणि शास्त्री (गौरव चोप्रा) हबकून जातात.हेमंत खेरच्या पुनरागमनासह, ‘पुष्पा इम्पॉसिबल’मध्ये वेधक संघर्ष आणि जबरदस्त नाट्य अनुभवताना प्रेक्षक नक्कीच टेलिव्हिजनच्या पडद्याला खिळून राहतील.
विरेनची भूमिका करणारा हेमंत खेर म्हणतो, “एक वर्षाने पुन्हा ‘पुष्पा इम्पॉसिबल’ मालिकेत परतताना रोमांचित झालो आहे. विरेन सेतलवाड ही पहिल्यापासून एक गुंतगुंतीची व्यक्तिरेखा आहे. तो कुटिल आहे, महत्त्वाकांक्षी आहे आणि त्याच्या स्वतःच्या न्यायाच्या कल्पना औरच आहेत, मग भले त्या इतरांच्या कल्पनांशी जुळणाऱ्या नसोत. यावेळी तो अधिक तयारीने आला आहे आणि पुष्पा, जुगल आणि कादंबरीशी त्याचे नाते आणखी तीव्र असणार आहे. प्रेक्षकांना आता विरेनची आणखी एक वेगळी बाजू बघायला मिळणार आहे. त्याचे डावपेच, भावनिक तीव्रता आणि खटपट यामुळे तितलीच्या ताब्याच्या लढ्यावर कसा परिणाम होतो, हे प्रेक्षक बघतील. इतकी पाताळयंत्री आणि तरीही मानवी व्यक्तिरेखा साकारणे रोमांचक आहे. हे असे पात्र आहे, ज्याच्या उपस्थितीमुळे परिस्थिती पालटते आणि प्रेक्षकांची उत्कंठा वाढते. पहिल्यापासून या मालिकेचा विषय लवचिकता, कुटुंब आणि नैतिक द्विधा हाच आहे, पण मला वाटते विरेनच्या पुनरागमनामुळे या तणावाला आणखी एक स्तर मिळेल. हा अध्याय कसा उलगडतो हे प्रेक्षक लवकरच बघतील.”