no images were found
अल्पसंख्याक , गरीब मराठा समाजाला EWS आरक्षण लाभदायक : देवेंद्र फडणवीस
मुंबई: आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांच्या आरक्षणासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने दिलेला निर्णय हा मैलाचा दगड ठरणार आहे, या निर्णयाचा फायदा महाराष्ट्रातील अल्पसंख्याक समूह आणि गरीब मराठा समाजाला होईल. महाराष्ट्रात सध्या मराठा आरक्षणाचा प्रश्न प्रलंबित आहे. मराठा आरक्षण पुन्हा लागू होईपर्यंत मराठा समाजातील तरुण EWS चा लाभ घेऊ शकतात. अल्पसंख्याक समाजातील गरीब तरुणांनाही याचे फायदे मिळतील, असे मत फडणवीस यांनी मांडले.
सर्वोच्च न्यायालयाने मे २०२१ मध्ये मराठा आरक्षण रद्दबातल ठरवल्यानंतर दोन आठवड्यांनी तत्कालीन महाविकास आघाडी सरकारने मराठा समाजाला आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठीच्या आरक्षणाचा लाभ मिळेल, याबाबतचा आदेश जारी केला होता. ज्या कुटुंबांचे वार्षिक उत्पन्न आठ लाखांपेक्षा कमी आहे आणि ज्यांना अन्य कोणत्याही प्रकारचे आरक्षण नाही, अशांना EWS आरक्षणाचा लाभ मिळणे शक्य झाले होते.मात्र, नंतरच्या काळात EWS आरक्षणालाही न्यायालयात आव्हान दिले गेले होते. अखेर सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी १०३व्या घटना दुरुस्तीच्या माध्यमातून ही करण्यात आलेली आरक्षणाची तरतूद वैध असल्याचा निकाल दिला होता.
सर्वोच्च न्यायालयाने EWS आरक्षणाला मंजुरी देण्याच्या निर्णयावर प्रकाश आंबेडकर यांनी नापसंती दर्शविली होती. कायमस्वरूपी नसणाऱ्या याद्यांमध्ये include किंवा exclude करण्याचा अधिकार संसदेला आहे. संविधान सामाजिक तत्व मानत असताना हे नवीन आर्थिक तत्व कोणत्या आर्टिकलनुसार अंतर्भूत केलं ते सांगा, असं कोणतंही प्रावधान नाही. त्याचं काहीच स्पष्टीकरण या निर्णयात आलेलं नाही. सुप्रीम कोर्ट स्वतः म्हणतंय की, सामाजिक आरक्षण आणि आर्थिक आरक्षण दोन वेगळ्या बाबी आहेत. या दोन्ही वेगळ्या बाबी असतील तर मग हे नवीन तत्व अंतर्भूत करण्याचं कोणतं प्रावधान आहे हे सांगा. हा निर्णय स्वतःलाच contradict करणारा असल्याचे प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले आहे.