no images were found
‘पुष्पा इम्पॉसिबल’ मालिकेत आपले सत्य उघड होऊ न देण्यासाठी कादंबरीने सगळ्या मर्यादा ओलांडल्या
सोनी सबवरील ‘पुष्पा इम्पॉसिबल’ मालिका सध्या गुपिते, फसवेगिरी आणि निर्णायक क्षणाच्या कथाभागामुळे प्रेक्षकांची उत्कंठा वाढवत आहे. या मालिकेत पुष्पा (करुणा पांडे) या एका असामान्य स्त्रीची कथा सांगितली आहे, जिचा प्रवास एक गृहिणी म्हणून सुरू होऊन आता न्यायासाठी निर्भीडतेने लढणाऱ्या वकिलापर्यंत पोहोचला आहे. सध्या प्रेक्षकांची उत्कंठा आणखीनच वाढली आहे आणि मालिकेत एक मोठे गुपित लवकरच उघडकीस येणार असे दिसत आहे.
आगामी भागांमध्ये, कादंबरीच्या (वृंदा त्रिवेदी) धमक्यांपासून वाचण्यासाठी हॉस्पिटलची मेट्रन रेखाबेन पुष्पाकडे मदत मागते, पण कादंबरीच वेगळ्या वेषात रेखाबेनला भेटते. रेखाबेन सांगते की तितली ही प्रत्यक्षात अश्विन (समृद्ध बावा) आणि दीप्ती (दीक्षा जोशी) यांची मुलगी आहे. जन्माच्या वेळी ती बदलली गेली आहे. कादंबरीची वेशभूषा अचानक उघडकीस येते, त्यामुळे कादंबरी काही विचार न करता रेखाबेनवर गोळी झाडते.
जुगल (अंशुल त्रिवेदी) हा गुन्हा घडताना पाहतो आणि कादंबरीला जाब विचारतो, पण त्यांच्या झटापटीत ती जुगलवर देखील गोळी झाडते. काही वेळाने पुष्पा तिकडे येते. तिकडचे दृश्य पाहून तिला धक्का बसतो. प्रचंड संतापलेली पुष्पा कादंबरीचा सर्वनाश करण्याची शपथ घेते आणि ती आपली सगळ्यात मोठी शत्रू असल्याचे जाहीर करते.
पण सत्य मात्र पुन्हा गाडले गेले आहे… रेखाबेनला काय सांगायचे होते, हे पुष्पाला कधी समजू शकेल का?
कादंबरीची भूमिका करणारी वृंदा त्रिवेदी म्हणते, “कादंबरीला वाटते आहे की, ती आपले प्रेम जुगलसाठी जगाशी लढा देत आहे आणि तिने घेतलेला प्रत्येक निर्णय, तिने केलेला अविचार हा त्या प्रेमासाठी आणि त्यांच्या चांगल्या भविष्यासाठी होता. पण या कथाभागातून एक मोठे सत्य समजते. कोणी सत्यापासून कितीही दूर पळण्याचा प्रयत्न केला तरी तुमचे कर्म तुमचा पिच्छा सोडत नाही. आपल्या प्रेमाचे रक्षण करण्यासाठी ती आपल्या प्रिय व्यक्तीचाच जीव घेते आणि या विरोधाभासामुळे तिचा प्रवास खूप दुःखद झाला आहे.”
पुष्पाची भूमिका करणारी करुणा पांडे म्हणते, “एक अभिनेत्री म्हणून या कथाभागात माझ्याकडून एका विशेष ऊर्जेची अपेक्षा होती. पुष्पा पहिल्यापासून तर्कनिष्ठ आणि सक्षम आहे. पण यावेळी मला भयंकर दुःख आणि संताप व्यक्त करायचा होता. जुगलला गमावल्याचे दुःख तिच्यासाठी फार मोठे आहे. तो तिचा खूप खास मित्र होता. तत्वनिष्ठा म्हणून त्याला न्याय मिळवून देण्यापेक्षा आता तिला वैयक्तिक बदला हवा आहे. हा तिच्यातील बदल मला दाखवायचा होता. हे दृश्य खूप तीव्र आणि दमछाक करणारे होते. पण हे परिवर्तन पडद्यावर दाखवताना धन्यता वाटली.”