no images were found
जिल्ह्यात कुष्ठरोग शोध मोहिमेचे १७ नोव्हेंबर ते २ डिसेंबर २०२५ दरम्यान आयोजन
कोल्हापूर, : कुष्ठरोग हा एक संसर्गजन्य रोग असून तो मायकोबॅक्टेरियम लेप्री या जिवाणूमुळे होतो. संसर्गिक रुग्णाच्या खोकल्यातून, शिंकण्यातून हे जंतू हवेमार्फत पसरतात. याचा अधिशयन काळ (जंतू शरीरात गेल्यापासून लक्षणे दिसण्यापर्यंतचा कालावधी) हा साधारण ३ ते ५ वर्ष इतका तर कधी कधी हा कालावधी ३० ते ४० वर्षे इतका ही असू शकतो. तसेच या आजारावर अजून लस देखील उपलब्ध नाही.
या आजारामध्ये प्रामुख्याने त्वचा व त्वचे जवळील मज्जातंतू खराब होतात. त्यामुळे पुढीलपैकी कोणतेही एक किंवा अनेक लक्षणे कुष्ठरोग्यामध्ये आढळू शकतात.
१. अंगावर असणारा फिकट, लालसर रंगाचा चट्टा बधिर होणे
२. त्वचेवर गाठी, न दुखणारी व लवकर बरी न होणारी जखम
३. कानाच्या पाळ्या जाड होणे
४. भुवयांचे केस विरळ होणे
५. बसके नाक
६. त्वचेची संलग्न मज्जा जाड व दुखण्या होणे
७. हातापायामध्ये सतत मुंग्या येणे, अशक्तपणा येणे
८. क्वचित प्रसंगी हातातून वस्तू पडणे, पायातून चप्पल गळणे
९. डोळा सतत उघडा राहणे
१०. त्वचा गुळगुळीत, तेलकट व चमकदार होणे
कुष्ठरोग हा शापामुळे किंवा पूर्व जन्माच्या पापामुळे होत नाही. तो जंतूमुळे होतो. लवकर निदान व वेळेत उपचार चालू केला तर कुष्ठरोग हा विना विकृती बरा होतो. आपणाला २०२७ सालापर्यंत कुष्ठरोगाचा प्रसार शून्यावर आणायचा आहे. त्यासाठी आपल्याला सर्व कुष्ठरुग्ण लवकरात लवकर व सुरुवातीच्या अवस्थेत म्हणजेच असंसर्गिक स्थितीत असतानाच शोधून काढून त्यांना उपचाराखाली घेण्याची आहे.
यासाठीच आपण कुष्ठरोग शोध मोहीम १७ नोव्हेंबर २०२५ ते २ डिसेंबर २०२५ पर्यंत राबविणार आहोत. या मोहिमेत आपल्या जिल्ह्यातील १०० टक्के ग्रामीण व ३० टक्के शहरी जोखीमग्रस्त भाग तपासणी करणार आहोत. यामध्ये आपण एकूण ३५ लाख ९४ हजार ४९३ लोकसंख्येची २ हजार ६८४ पथके व ५३७ पर्यवेक्षकामार्फत तपासणी करणार आहोत. प्रत्येक पथकामध्ये एक अशा कार्यकर्ती व एक पुरुष आरोग्य सेवक, स्वयंसेवक असेल. स्त्रियांची तपासणी स्त्री सदस्य व पुरुषांची तपासणी पुरुष सदस्याकडून केली जाईल.
आपला जिल्हा कुष्ठरोग मुक्त करण्यासाठी आपल्या घरी सर्वेक्षण पथक येणार आहे या पथकांना आपण सहकार्य करावे व सर्वांनी शारीरिक तपासणी करून घ्यावी असे आवाहन जिल्हाधिकारी अमोल येडगे व मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस. यांनी केले आहे. तसेच कोल्हापूर आरोग्य सेवा मंडळाचे उपसंचालक डॉ. दिलीप माने, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध पिंपळे, जिल्हा शलचिकित्सक डॉ. प्रशांत वाडेकर, कोल्हापूर महानगरपालिकेचे आरोग्य अधिकारी प्रकाश पावरा, कुष्ठरोग सहाय्यक संचालक डॉ.हेमलता पालेकर यांनीही सर्वेक्षणात सहभागी होण्यासाठी आवाहन नागरिकांना केले आहे.