no images were found
विनापरवाना व्यवसाय करणाऱ्या दोन यात्री निवासांवर महापालिकेची कारवाई : वांगी बोळ परिसरात संयुक्त पथकाची कारवाई; कामाक्षी ज्वेलर्सला धोकादायक इमारतीबाबत सूचना
कोल्हापूर, : शहरातील विनापरवाना व्यवसाय करणाऱ्या आस्थापनांविरोधात कोल्हापूर महानगरपालिकेने कारवाईचा बडगा उगारला आहे. महापालिकेच्या परवाना, घरफाळा, विभागीय कार्यालय क्रमांक २ (छत्रपती शिवाजी मार्केट) आणि उपद्रव शोध पथकाच्या संयुक्त पथकाने वांगी बोळ परिसरात कारवाई करून विनापरवाना व्यवसाय करणाऱ्या जगदंब यात्री निवास आणि तुलसी यात्री निवास या दोन आस्थापना सील केल्या. तसेच कामाक्षी ज्वेलर्स हा व्यवसाय धोकादायक इमारतीमध्ये सुरू असल्याचे निदर्शनास आल्याने संबंधितांना आवश्यक त्या सूचना देण्यात आल्या.
आयुक्त डॉ. राजेंद्र भारुड यांच्या निर्देशानुसार, उपआयुक्त किरणकुमार धनवाडे व सहायक आयुक्त स्वाती दुधाणे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. शहरातील विनापरवाना व्यवसाय करणाऱ्या आस्थापनांना नवीन व्यवसाय परवाना घेणे तसेच आवश्यक भाडेकरार सादर करण्याबाबत यापूर्वी नोटिसा बजावण्यात आल्या होत्या. मात्र, संबंधित आस्थापनांनी नोटिसांची दखल घेऊन आवश्यक कार्यवाही केली नसल्याने अखेर महापालिकेने सीलबंदची कारवाई केली.
महानगरपालिका क्षेत्रातील घरफाळा मिळकतधारक व व्यावसायिकांना थकीत घरफाळा भरणे, कर आकारणीतील त्रुटींची दुरुस्ती करणे तसेच व्यवसाय परवाना घेण्याबाबत नोटिसा बजावण्याची कार्यवाही सुरू आहे. यापुढेही विनापरवाना व्यवसाय, घरफाळा थकबाकी आणि कर आकारणीतील त्रुटींबाबत व्यापक स्वरूपात कारवाई करण्यात येणार आहे. तरी सर्व मिळकतधारक व व्यावसायिकांनी आपल्याकडील थकीत रक्कम तातडीने भरावी. तसेच आवश्यक व्यवसाय परवाने व कागदपत्रांची पूर्तता करून महापालिकेस सहकार्य करावे, असे आवाहन महानगरपालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.
ही कारवाई परवाना अधीक्षक अशोक यादव, उपद्रव शोध पथकाचे जवान तसेच घरफाळा, परवाना आणि विभागीय कार्यालय क्रमांक २ मधील कर्मचाऱ्यांनी केली.