no images were found
“आयुर्वेद हे केवळ औषधशास्त्र नसून जीवनशैली आहे” – श्री. शशांक साण्डू
धन्वंतरी जयंती व पूजनाच्या शुभ प्रसंगी साण्डू फार्मास्युटिकल्स लिमिटेड तर्फे आयोजित विशेष कार्यक्रमात आयुर्वेद क्षेत्रातील नामवंत वैद्य पुष्कर नरहर प्रभू यांचा सत्कार करण्यात आला. या प्रसंगी साण्डू फार्मास्युटिकल्स लिमिटेडचे संचालक श्री. शशांक साण्डू यांनी कंपनीचा १२५ वर्षांचा समृद्ध आयुर्वेदीय वारसा, विश्वासार्हता आणि समाजासाठीचे योगदान यावर प्रकाश टाकला.
कार्यक्रमात वैद्य पुष्कर प्रभू यांच्या दीर्घकाळाचा आयुर्वेद सेवाकार्याचा वारसा जोपासल्याबद्दल सन्मान करण्यात आला. या प्रसंगी डॉ. नागेश सांडू (संचालक), श्री. घनश्याम सांडू (संचालक), सौ. विद्या पुष्कर नरहर प्रभू आणि श्री. शशांक सांडू (संचालक), सांडू फार्मास्युटिकल्स हे उपस्थित होते.
श्री. साण्डू म्हणाले, “वैद्य पुष्कर प्रभू यांनी आपल्या वडिल आदरणीय वैद्य नरहर प्रभू यांचे आयुर्वेद क्षेत्रातील कार्य समर्थपणे पुढे चालवले आहे. आज चौथी पिढी त्यांच्या रूपाने हा वारसा पुढे नेत आहे. दादर येथील ‘प्रभुवेद चिकित्सालय’मार्फत ते अनेक रुग्णांना निसर्गाधारित उपचार देत असून, विशेषतः कर्करोग व्यवस्थापनातील त्यांच्या संशोधनात्मक कार्याचा आम्हाला अभिमान आहे.”
आयुर्वेदाविषयी बोलताना श्री. साण्डू म्हणाले, “आयुर्वेद हे केवळ औषधशास्त्र नाही, तर जीवनशैली आहे. धन्वंतरी पूजनाच्या या मंगल क्षणी साण्डू परिवार आरोग्यवर्धन आणि आयुर्वेदीय वारशाच्या संवर्धनासाठी कटिबद्ध असल्याचे आम्ही पुन्हा अधोरेखित करतो.”
श्री. साण्डू यांनी पुढे सांगितले, “साण्डू फार्मास्युटिकल्सचा प्रवास १२५ वर्षांहून अधिक काळाचा आहे. १८९९ साली आमचे संस्थापक स्वर्गीय वैद्य दत्तात्रय कृष्ण साण्डू आणि त्यांच्या 4 भावंडांनी याची मुहूर्तमेढ रोवली आणि प्राचीन आयुर्वेदाचे ज्ञान विज्ञानाधिष्ठित पद्धतीने समाजापर्यंत पोहोचविण्याचे ध्येय ठेवले. त्यानंतर साण्डू परिवाराने पारंपरिक ग्रंथांवर आधारित पण आधुनिक गुणवत्ता मानकांनुसार तयार केलेली सुरक्षित आणि परिणामकारक औषधे लोकांसाठी उपलब्ध करून दिली. आमचा हेतू नेहमीच ‘विश्वासार्ह आयुर्वेद’ हा विचार प्रत्यक्षात उतरविण्याचा राहिला आहे.”
ते म्हणाले, “आजच्या काळात काही निकृष्ट औषधनिर्मितीमुळे लोकांमध्ये निर्माण झालेल्या असुरक्षिततेच्या पार्श्वभूमीवर आयुर्वेदिक औषधे ही एक विश्वासार्ह, नैसर्गिक आणि सुरक्षित पर्याय ठरत आहेत. साण्डू फार्मास्युटिकल्स लिमिटेडने नेहमीच शुद्ध घटक, शास्त्रोक्त प्रक्रिया आणि काटेकोर गुणवत्ता नियंत्रण यांचा अवलंब केला आहे हेच आमचे सर्वात मोठे बळ आहे.”
यानंतर वैद्य पुष्कर प्रभू यांनी उपस्थिताना मार्गदर्शन करून आयुर्वेद हे आपले शास्त्र जगाचे आरोग्य जपण्याचे कार्य करू शकते, यासाठी याचा प्रसार आणि प्रचार तसेच संतुलित जीवनशैलीचा दैनंदिन जीवनात कसा उपयोग करावा याबाबत त्यांनी मार्गदर्शन केले. तसेच आयुर्वेदीय उपचार कॅन्सर चिकित्सेत कशी प्रभावी भूमिका बजावू शकतो याची चर्चा त्यांनी केली. आज भारतभर कॅन्सर ज्या झपाट्याने वाढत आहे आणि आणि आधुनिक चिकित्सा कशी प्रभावहीन, महागडी आणि अनेक दुष्परिणामांचा सामना रुग्णांना करावा लागत आहे.
वैद्य पुष्कर प्रभू यांनी पुढे सांगितले, एक रिसर्च रिपोर्ट नुसार भविष्यात भारतात दर १० व्या मनुष्यास कॅन्सरची लागण होण्याची शक्यता नाकारता येत नाही . या पार्श्वभूमीवर आयुर्वेद औषध निर्माता कंपन्यांनी कर्करोगावरील औषधांचे संशोधन करावे याला शासनाकडून आर्थिक पाठबळ लाभावे हि काळाची गरज आहे. हे संशोधन अखंड मानवजातीच्या सुरक्षित आरोग्यासाठी मैलाचा दगड सिद्ध होईल . कॅन्सर सारखा भस्मासुरावर आयुर्वेदीय चिकित्सापद्धती ब्रम्हास्त्र ठरू शकते असा विश्वास त्यांनी व्यक्त केला .
साण्डू फार्मास्युटिकल्स लिमिटेडची औषधे तसेच आयुर्वेदीय रसायने रोगप्रतिरोधक क्षमता वाढविण्यात आणि शरीराचे आरोग्यदायी संतुलन राखण्यात अत्यंत उपयुक्त ठरली आहेत. याबाबत श्री. साण्डू म्हणाले, “ही औषधे समाजातील प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहोचावीत, यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. वैद्य समुदायाकडून मिळणारे मार्गदर्शन आणि सहकार्य आमच्यासाठी प्रेरणादायी आहे.”