no images were found
शिवाजी विद्यापीठात एकता दौड
कोल्हापूर : भारताचे लोहपुरूष सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती आणि माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांचा स्मृतिदिन या निमित्ताने त्यांच्या स्मृतींना आज शिवाजी विद्यापीठात अभिवादन करण्यात आले. राष्ट्रीय सेवा योजनेमार्फत एकता दौडही आयोजित करण्यात आली.
शिवाजी विद्यापीठाच्या मुख्य प्रशासकीय भवनात आज सकाळी सरदार वल्लभभाई पटेल आणि इंदिरा गांधी यांच्या प्रतिमांचे पूजन कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के आणि प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. तत्पूर्वी, विद्यापीठ प्रांगणात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भव्य पुतळ्यापासून एकता दौड आय़ोजित करण्यात आली. या दौडीस कुलगुरू डॉ. शिर्के आणि प्र-कुलगुरू डॉ. पाटील यांनी ध्वज दाखवून उद्घाटन केले. दौडीनंतर सर्व उपस्थितांना एकता व सद्भावना यांची शपथ देण्यात आली.
यावेळी प्रभारी कुलसचिव डॉ. विलास शिंदे, क्रीडा संचालक डॉ. शरद बनसोडे, विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ. आर.व्ही. गुरव, राष्ट्रीय सेवा योजना संचालक अभय जायभाये, डॉ. पी.टी. गायकवाड, स्कूल ऑफ नॅनो सायन्स अँन्ड टेक्नॉलॉजीचे डॉ. किरण कुमार शर्मा यांच्यासह विविध महाविद्यालयांचे एनएसएस समन्वयक, शिक्षक आणि स्वयंसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.