no images were found
स्व. डी. बी. पाटील सरांचा तृतीय स्मृतीदिन..
त्यांच्या स्मृतीस महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी शिक्षक सेलतर्फे विनम्र अभिवादन
म.जोतिबा आणि क्रांतीमाता सावित्रीमाई फुले, राजर्षी शाहू महाराज, क्रांतिसिंह नाना पाटील, थोर स्वातंत्र्य सैनिक नागनाथ अण्णा नायकवडी, कर्मवीर भाऊराव पाटील अण्णा यांच्या विचारांचा व कार्याचा प्रभाव डी. बी. सरांवर होता. विद्यार्थी केंद्रस्थानी ठेवून त्यांनी श्री प्रिन्स मराठा बोर्डिंग हाऊस व तिच्या शाखांची ताकद बहुजन शिक्षण प्रसारासाठी वापरली म्हणून त्यांची दखल केंद्र व राज्य शासनाला घ्यावी लागली.
पूज्य डी. बी. सरांच्या निधनाने शिक्षणातील गुणवत्ता पोरकी झाली. महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळाचे माजी कार्याध्यक्ष स्व. बी. बी. पाटील, माजी उपाध्यक्ष स्व. अॅड. एस. एस. पाटील व मी असे तिघे कोल्हापूर विभाग बैठकीसाठी कोल्हापुरात एकत्र होतो. बैठकीत डी. बी. सर अत्यंत तळमळीने बोलत होते. आदर्श मुख्याध्यापक, आदर्श संस्थाचालक, आदर्श शिक्षक, गुणवत्ता विकास, शालेय नियोजन, टीम वर्क, भौतिक सुविधा, शिक्षण संस्था चालकांची भूमिका, शिक्षण खात्याची जबाबदारी या विषयावर त्यांनी जे विचार मांडले ते निश्चितच महाराष्ट्राच्या शिक्षणाला दिशादर्शक आहेत. ते म्हणाले, ” शिक्षणात गुणवत्ता प्रस्थापित करायची असेल तर परिपूर्ण नियोजन, कठोर कार्यवाही आणि मूल्यमापन या तीन बाबी अत्यंत महत्त्वाच्या आहेत. शिक्षण व्यवस्था निकोप करण्यासाठी प्रशासक कुवतीचा हवा. कामात विलंब, हेळसांड व अव्यवस्थितपणा करणारा प्रशासक हा गुणवत्ता विकासातील मोठा अडथळा आहे.
शालेय नेतृत्वाने मे महिन्यात येणार्याण वर्षाचे उत्तम नियोजन करणे आवश्यक आहे. भौतिक सुविधा, मनुष्यबळ, वेळापत्रक, पहिली स्टाफ मिटींग, विद्यार्थी विकासाच्या दृष्टीने शालेय, सहशालेय उपक्रमांचे नियोजन, विषय समित्या, उपसमित्या, विद्यार्थी गणवेश, स्कूल कमिटी सभा, क्रीडांगण निगा, वर्गखोल्या, पिण्याच्या पाण्याची सोय, स्वच्छता गृहे इ. बाबत नियोजन महत्त्वाचे आहे. दर्जेदार प्रश्नपत्रिका आणि गोपनीय पध्दतीने परीक्षा आणि निर्दोष मूल्यांकन यातून गुणवत्ता वाढ या बाबी शाळेची पत वाढवितात. अभिलेख व नोंदवह्या, शिक्षक रोजनामा, शालेय शिस्त, प्रभावी पालक संपर्क, पर्यावरण व मूल्यशिक्षण, क्रिड व दर्जेदार शारीरिक व मानसिक आरोग्य शिक्षण, सहली, स्नेहसंमेलन या बाबतीत मुख्याध्यापक हे अत्यंत दक्ष असावेत. शाळा नावारूपाला आणण्यासाठी मुख्याध्यापकांकडे प्रभावी नेतृत्व गुण हवा. शाळाप्रमुख आणि शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी हक्काबरोबर कर्तव्य पालनात तत्पर राहणे महत्त्वाचे आहे. ”डी. बी. सरांचे वरील शैक्षणिक विचार शालेय गुणवत्ता वाढीचा मूलमंत्र देणारे आहेत.बहुजन समाजातील गरीब, सर्वसामान्य घरातील मुले केंद्रस्थानी ठेवून त्यांनी शैक्षणिक तत्त्वज्ञान मांडले.
”शासनाने शाळांना वेळेवर व पुरेसे वेतनेतर अनुदान दिले पाहिजे, नवीन शाळांना बृहत आराखड्यानुसार मंजूरी द्यावी. मराठी शाळा बंद पडता कामा नये, शिक्षक मान्यता वेळेवर मिळाव्यात, शिक्षकांना अशैक्षणिक कामाला जुंपू नये, वर्गातील भरमसाठ विद्यार्थी संख्या कमी करावी, शिष्यवृत्ती मदत भरघोस व वेळेत उपलब्ध करून दिली पाहिजे, मुख्याध्यापक हा लोकशाही संकेतानुसार सर्वांना विश्वासात घेऊन काम करणारा..निर्व्यसनी, चारित्र्यसंपन्न असावा.
छ. शिवाजी महाराज, छ. शाहू महाराज, महात्मा फुले व सावित्रीमाई, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, कर्मवीर भाऊराव पाटील, साने गुरुजी या महापुरुषांच्या विचारांचे संमेलन म्हणजे डी. बी. सर होत. छ. शाहू महाराज यांच्या जीवनावरील मालिका निर्मिती कामात त्यांचे मोठे योगदान आहे. प्रिन्स शिवाजी बोर्डिंग हाऊस च्या माध्यमातून त्यांनी बहुजन समाज शिक्षणाचे भरीव काम केले आहे. मुख्याध्यापक महामंडळातून शालेय नियोजन, परीक्षा व मूल्यमापन या बाबतीत प्रशंसनीय काम केले आहे. त्यांच्या या व्यासंगाची पोहोच पावती म्हणजे त्यांना मिळालेल्या आदर्श शिक्षक राष्ट्रपती पुरस्कारासह मिळालेले आठ पुरस्कार..! सांगली आणि कोल्हापूरच्या या पराक्रमी शिक्षण पुत्राने वादळात शिक्षणाचा दिवा तेवत ठेवला त्यामुळे असंख्य विद्यार्थ्यांच्या घरात ज्ञान आणि समृद्धीची उधळण झाली. या देशात कारखाने आणि धरणातून जी समृध्दी आली त्याहून काकणभर सरस समृद्धी डी. बी. सरांच्या श्रमातून साकारली.कोजिमाशी पतसंस्थेच्या माध्यमातून त्यांनी केलेले काम हे सहकाराचे भूषण आहे. महाराष्ट्र राज्य शिक्षणसंस्था महामंडळ, कोल्हापूर विभागीय मंडळ आणि सांगली जिल्हा शिक्षण संस्था संघ यांच्या कामानिमित्त डी. बी. सरांशी बऱ्याच वेळा आमचा संपर्क आला, त्यांच्या प्रत्येक भेटीत मला एका सात्विक, निर्मळ,स्वच्छ व पारदर्शी कारभार करणारा निष्कलंक चारित्र्य असलेल्या शिक्षण क्षेत्रातील तपस्वी विचारवंताचा साक्षात्कार झाला. त्यांना तृतीय पुण्यस्मरण दिनी भावपूर्ण अभिवादन करतो.