
no images were found
लोकशाही दिनी प्राप्त अर्जांवर पंधरा दिवसांत कार्यवाही करा – जिल्हाधिकारी
कोल्हापूर, : आत्तापर्यंत लोकशाही दिनामध्ये दाखल झालेले व प्रलंबित अर्ज निर्गत करून नव्याने दाखल झालेले अर्ज 15 दिवसांच्यावर प्रलंबित नको, अशा सूचना जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी दिल्या. जिल्हाधिकारी कार्यालयातील महाराणी ताराबाई सभागृहात महिन्याच्या पहिल्या सोमवारी लोकशाही दिन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आला होता, यावेळी ते बोलत होते. या लोकशाही दिनादिवशी नव्याने 176 अर्ज दाखल झाले. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस, अतिरिक्त पोलीस अधीक्षक बी धीरज कुमार, उपजिल्हाधिकारी संपत खिलारी, निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष जोशी, अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी श्री. येडगे म्हणाले, आपले सरकार, पीजी पोर्टलवरील तक्रारींचेही 15 दिवसांच्या आत निराकरण व्हायला हवे. प्रलंबित अर्ज वेळेत निकाली काढण्याचे निर्देश त्यांनी यावेळी दिले. यावेळी मागील प्रलंबित अर्जांचा आढावा घेण्यात आला. अनुपस्थित अधिकाऱ्यांना नोटीस काढण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. आज झालेल्या लोकशाही दिनादिवशी शासकीय निमशासकीय विषयांकीत कामांच्या प्रशासकीय स्तरावरील एकुण 176 अर्ज नागरिकांनी सादर केले. त्यापैकी जिल्हाधिकारी कार्यालय 48, जिल्हा परिषद 33, पोलिस विभाग 25 व कोल्हापूर महानगरपालिका 12 अशी संख्या होती.
यावेळी राज्य शासनाच्या 100 दिवसांच्या कृती कार्यक्रमाबाबत जिल्हाधिकारी यांनी आढावा घेतला व मार्गदर्शन केले. या वेळी त्यांनी लोकशाही दिनाचा समावेश असल्याने सर्व अर्जांवर सविस्तर निर्णय घेवून प्रकरणे निकाली काढण्याचे निर्देश दिले.