no images were found
समग्र शिक्षा अभियाना अंतर्गंत मोफत पाठयपुस्तक वाटपास प्रारंभ
कोल्हापूर : कोल्हापूर महापालिकेच्या प्राथमिक शिक्षण समितीच्यावतीने महापालिकेच्या कार्यक्षेत्रातील सर्व शाळांना समग्र शिक्षा अभियाना अंतर्गंत आजपासून मोफत पाठयपुस्तकांचे वाटप सुरु करण्यात आले आहे. यामध्ये महापालिका कार्यक्षेत्रातील 190 प्राथमिक शाळांतील सुमारे 45,378 विद्यार्थ्यांकरीता 1,81,512 पुस्तकांच्या प्रती प्राप्त झाल्या आहेत. याचा सुरक्षितपणे साठा शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असणाऱ्या आयर्विन ख्रिश्चन हायस्कूलच्या इमारतीत करण्यात आला आहे. आज प्राथमिक शिक्षण समितीचे प्रशासनाधिकारी शंकर यादव यांच्या हस्ते शहरातील सर्व शाळामधील मुख्याध्यापकांकडे पाठयपुस्तके सुपूर्त करण्यात आली. यावेळी शाळांना पाठयपुस्तकांच्या सुरक्षिततेबाबत सूचना देण्यात आल्या आहेत.
विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेत भर टाकणारा पाठयपुस्तक हा एक महत्वाचा घटक आहे. इ. 1 ली ते 8 वी पर्यंतच्या मराठी, उर्दू, सेमी इंग्रजी, इंग्रजी माध्यमाच्या शासकीय व अनुदानित शाळांमध्ये शिक्षण घेणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना समग्र शिक्षा अभियाना अंतर्गंत दरवर्षी मोफत पाठयपुस्तकांचे वाटप करण्यात येते. या उपक्रमामुळे विद्यार्थी, पालक, शिक्षक यांचेकडून समाधान व्यक्त केले जात आहे.
सदर पाठयपुस्तके विद्यार्थ्यांना शाळेच्या पहिल्याच दिवशी देण्यात येणार असून त्यासाठी प्रत्येक शाळेमध्ये समारंभपूर्वक कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहे. यावेळी समाजसेवक, शिक्षणप्रेमी, शाळा व्यवस्थापन समितीचे प्रतिनिधी यांचेहस्ते विद्यार्थ्यांना पुस्तके वितरीत करण्यात येऊन शाळेचा पहिला दिवस हा ‘बुक डे’ म्हणून साजरा करण्यात येणार आहे. यावेळी सहा.प्रकल्प अधिकारी रसूल पाटील, शैक्षणिक पर्यवेक्षक विजय माळी व बाळासो कांबळे, शाळांचे मुख्याध्यापक, राजेंद्र आपुगडे, विक्रम भोसले, अविनाश लाड, राजू गेंजगे, शांताराम सुतार, सेवक उपस्थित होते.