no images were found
सेवा रुग्णालय कोल्हापूरकरांसाठी नवे आरोग्य केंद्र बनेल- पालकमंत्री प्रकाश आबिटकर
कोल्हापूर, : कोल्हापूरच्या आरोग्य क्षेत्रात एक नवा अध्याय सुरू होत आहे! छत्रपती प्रमिलाराजे जिल्हा रुग्णालयानंतर कोल्हापूरकरांचा विश्वास असलेल्या सेवा रुग्णालयाच्या विस्तारीकरणाला अखेर हिरवा कंदील मिळाला. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने बफर झोन नियमावलीत २०० मीटर सवलत देणारे आदेश जारी केल्याने रुग्णालयाच्या विस्तारीकरणाचा मार्ग मोकळा झाला आहे. यामुळे कोल्हापूरकरांना लवकरच अत्याधुनिक आरोग्य सुविधांचा लाभ मिळणार आहे, अशी माहिती सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री तथा पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिली. या वेळी राज्याचे खनिकर्म मंत्री शंभूराज देसाई उपस्थित होते.
सेवा रुग्णालयात आता ५० खाटांचे क्रिटिकल केअर सेंटर, १०० खाटांचे सिव्हिल रुग्णालय, १०० खाटांचे महिला व नवजात शिशु रुग्णालय आणि कार्डियाक कॅथ लॅबसारख्या सुविधा निर्माण होणार आहेत. यामुळे सीपीआर रुग्णालयाला पर्याय म्हणून सेवा रुग्णालय कोल्हापूरकरांसाठी नवे आरोग्य केंद्र बनेल. दसऱ्याच्या मुहूर्तावर आनंदाची बातमी आली असल्याचे आबिटकर यांनी सांगितले.
यापूर्वी बफर झोनच्या कठोर नियमांमुळे विस्तारीकरणात अडथळे येत होते. आमदार राजेश क्षीरसागर यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत यावर तोडगा काढण्यात आला. MPCB ने २०० मीटर सवलतीचे पत्र कोल्हापूर महानगरपालिकेला दिले असून, तातडीने सीमा निश्चित करून अहवाल सादर करण्याचे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले. जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी महानगरपालिका आणि सार्वजनिक बांधकाम विभागाला विशेष टीम नेमून बफर झोनची सीमा निश्चित करण्यास सांगितले. तसेच, क्रिटिकल केअर सेंटर, सिव्हिल हॉस्पिटल, महिला रुग्णालय आणि कॅथ लॅबसाठी आर्किटेक्चर डिझाईन तयार करण्याची प्रक्रिया सुरू करण्याचे आदेश दिले.
सध्याच्या ५० खाटांच्या रुग्णालयाचे १०० खाटांमध्ये श्रेणीवर्धन होणार आहे. याशिवाय, मंजूर १०० खाटांचे जिल्हा रुग्णालय, १०० खाटांचे महिला व नवजात शिशु रुग्णालय आणि ५० खाटांचे क्रिटिकल केअर युनिट तयार होणार आहे. कार्डियाक कॅथ लॅब, सिटी स्कॅन आणि एमआरआयसारख्या अत्याधुनिक यंत्रसामग्रीही उपलब्ध होणार आहे. या बैठकीला जिल्हाधिकारी अमोल येडगे, मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस., आरोग्य उपसंचालक डॉ. दिलीप माने, MPCB चे उपप्रादेशिक अधिकारी प्रमोद माने, अतिरिक्त आयुक्त शिल्पा दरेकर आणि जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रशांत वाडीकर उपस्थित होते.सेवा रुग्णालयाच्या विस्तारीकरणामुळे कोल्हापूरच्या आरोग्य सेवांचा कायापालट होईल. अत्याधुनिक यंत्रसामग्री आणि वाढीव खाटांमुळे स्थानिकांना दर्जेदार वैद्यकीय सेवा मिळेल. दसरा सणाच्या तोंडावर कोल्हापूरकरांसाठी आरोग्याचे नवे दालन सुरू होईल, अशी ग्वाही पालकमंत्री आबिटकर यांनी दिली.