no images were found
स्पर्धा परीक्षा विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी मार्गदर्शनाची नवी दिशा:आयपीएस बिरदेव ढोणे यांचे मार्गदर्शन
कोल्हापूर,: स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी जिल्हा प्रशासनाकडून महाविद्यालयांच्या समन्वयाने एक अनोखा व महत्त्वाकांक्षी उपक्रम सुरु होत आहे. जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या संकल्पनेतून “स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन शिबिर” या विशेष उपक्रमाची सुरुवात प्रतिष्ठित शाही दसरा महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर होणार आहे. जिल्हा प्रशासन व सायबर कॉलेजच्या संयुक्त विद्यमाने या मालिकेचा शुभारंभ 29 सप्टेंबर रोजी सकाळी 11 वाजता सायबर कॉलेजच्या आनंदभवन सभागृहात होणार असून, विद्यार्थ्यांसाठी हा उपक्रम ज्ञानवर्धनाचा आणि यशाच्या दिशेने वाटचाल घडवून आणणारा ठरणार आहे.या शिबिर मालिकेचे वैशिष्ट्य म्हणजे दर महिन्याला एक मार्गदर्शन सत्र आयोजित केले जाणार आहे. या सत्रांतून स्पर्धा परीक्षांमध्ये यश संपादन केलेल्या यशस्वी विद्यार्थ्यांकडून तसेच प्रत्यक्ष पदावर असलेल्या अधिकाऱ्यांकडून मार्गदर्शन दिले जाईल. यामुळे अभ्यासक विद्यार्थ्यांना थेट त्यांच्या अनुभवानुसार दिशा मिळेल, अभ्यासाचे नियोजन आणि धोरण कसे ठरवायचे याबाबत प्रत्यक्ष उदाहरणांसह शिकण्याची संधी उपलब्ध होणार आहे.
पहिल्या सत्रामध्ये कोल्हापूर जिल्ह्याचे भूषण ठरलेले व यूपीएससी परीक्षेत यश संपादन करून आयपीएस पदाला गवसणी घातलेले बिरदेव ढोणे हे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणार आहेत. त्यांच्या यशोगाथेतून प्रेरणा घेऊन विद्यार्थ्यांना त्यांच्या अभ्यासात नवी उर्जा मिळेल, असा विश्वास जिल्हाधिकारी यांनी व्यक्त केला आहे.
स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी नेहमीच योग्य दिशाअभ्यासाचे सातत्य आणि मार्गदर्शन यांचा अभाव जाणवतो. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी या शिबिर मालिकेची संकल्पना राबवून विद्यार्थ्यांच्या भविष्याला बळकटी देण्याचा नवा उपक्रम सुरु केला आहे. प्रशासनाच्या या प्रयत्नामुळे ग्रामीण व शहरी भागातील सर्व विद्यार्थ्यांना समान पातळीवर दर्जेदार मार्गदर्शन मिळणार असून, त्याचा लाभ अनेकांना होईल.
या उपक्रमाचे समन्वयक राधानगरी- कागलचे उपविभागीय अधिकारी प्रसाद चौगुले असून सर्व शिबिर महाविद्यालयांच्या स्तरावर आयोजित केले जाणार आहेत. या शिबिर मालिकेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना केवळ परीक्षेतील तयारीची दिशा नव्हे, तर आत्मविश्वास, वेळेचे व्यवस्थापन, अभ्यासाची सवय आणि यशासाठी आवश्यक मानसिक तयारी यांसारखे मुद्देही समजावून सांगितले जाणार आहेत. कोल्हापूर जिल्ह्यातील स्पर्धा परीक्षा अभ्यासक विद्यार्थ्यांसाठी ही मार्गदर्शन मालिका खऱ्या अर्थाने संधीचे सुवर्णद्वार ठरेल, असा आशावाद व्यक्त होत आहे.