no images were found
‘गणेश कार्तिकेय’ मालिकेत आयुध भानुशाली विघ्नहर्ता गणेशाची तर सुभान खान दिव्य योद्धा कार्तिकेयाची भूमिका करणार
प्रभावी कथानके सादर करणारी वाहिनी म्हणून प्रख्यात असलेल्या सोनी सबवर लवकरच ‘गाथा शिव पार्वती की – गणेश कार्तिकेय’ ही भव्य पौराणिक मालिका सुरू होत आहे. सर्वात शक्तिशाली आणि दिव्य देवांच्या परिवाराची महान गाथा ही मालिका सादर करेल. ही मालिका प्रामुख्याने भगवान शिव (मोहित मलिक) आणि देवी पार्वती (श्रेनु परीख) यांच्या माहीत नसलेल्या कथा आणि त्यांची मुले गणेश आणि कार्तिकेय यांचा जीवनप्रवास सादर करेल. त्यांचा संघर्ष, प्रेम आणि भावना आजही घराघरात दिसतात.
ह्या दिव्य व्यक्तिरेखा पडद्यावर जिवंत करताना आयुध भानुशाली श्री गणेशाची आणि सुभान खान कार्तिकेयाची भूमिका साकारणार आहेत. आपल्या प्रतिभेने आणि प्रामाणिक प्रयत्नांनी ते दोघे या लोकांच्या लाडक्या असलेल्या भूमिका जिवंत करणार आहेत आणि त्यांची सुजाणता, पराक्रम आणि भक्ती यांचे चित्रण प्रेक्षकांना नक्की आवडेल. या हृदयस्पर्शी कथानकाच्या केंद्रस्थानी कार्तिकेय आणि गणेश यांच्यातील गुंतागुंतीचे नाते आहे. कार्तिकेय एकाकीपणाशी लढा देत आहे, तर दुसरीकडे गणेश हा लाडका पुत्र आहे. त्यांच्या नात्यातून त्यांची असुरक्षितता दिसून येते आणि यातूनच स्वतःचा शोध घेण्याची प्रेरणा मिळते.
आपल्या भूमिकेविषयी आयुध भानुशाली म्हणतो, “श्री गणेशाची भूमिका मला करायला मिळाली, हे माझे भाग्य आहे. गणेश बुद्धीमान आहे, दयाळू आहे आणि विघ्नहर्ता आहे. देवी पार्वतीचा तो लाडका मुलगा आहे, तर आपल्या पित्याविषयी त्याच्या मनात अपार आदर आहे. त्याची निरागसता आणि सुजाणता पडद्यावर जिवंत करण्याचा माझा प्रयत्न असेल.”
कार्तिकेयाची भूमिका करण्याबद्दल सुभान खान म्हणतो, “भगवान कार्तिकेयाची भूमिका करताना मला खूप आनंद होत आहे. तो शूर आणि शक्तीशाली आहे, पण देवी पार्वतीची उणीव त्याला नेहमी जाणवते. त्याचा प्रवास हा धैर्याचा आणि त्याचबरोबर कुटुंबाविषयीच्या त्याच्या प्रेमाचाही प्रवास आहे. या दोन्ही बाजू मालिकेत दाखवण्यास मी उत्सुक आहे.”
‘गणेश कार्तिकेय’ ही एकता, प्रेम आणि परस्परांतील भाव-बंधांची कहाणी आहे. जी आपल्याला स्मरण करून देते की, दिव्य कुटुंबात देखील सर्वसामान्य कौटुंबिक भावनांचाच वास असतो.