no images were found
स्पर्धेबरोबरच सर्जनशीलता जपणे महत्वाचे – डॉ. रितुराज पाटील,: डी. वाय. पाटील स्कूल ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंटमध्ये ‘हॅकॅत्सोव’ संपन्न
कोल्हापूर : केवळ स्पर्धेत पुढे जाण्याचा विचार करण्यापेक्षा नवनवीन कल्पना मांडण्याची आणि त्यांची अंमलबजावणी करण्याची तयारी विद्यार्थ्यांनी ठेवली पाहिजे. स्पर्धेबरोबरच सर्जनशीलता जपणेही महत्वाचे असल्याचे प्रतिपादन, झेन्सार टेक्नॉलॉजीजचे डॉ. रितुराज पाटील यांनी केले.
कसबा बावडा येथील डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाच्या स्कूल ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंटमध्ये झालेल्या राष्ट्रीय स्तरावरील “हॅकॅत्सोव २०२६” मध्ये प्रमुख अतिथी म्हणून ते बोलत होते.
“ड्रीम, डेव्हलप, डिलिव्हर” या संकल्पनेवर आधारित या टेक फेस्टमध्ये देशभरातून विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग पाहायला मिळाला. कुलगुरू डॉ. राकेश कुमार शर्मा यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमास मनोरोमा इन्फोसोल्युशन्सचे मुख्य तंत्रज्ञान अधिकारी श्री. मुरलीधर परुळेकर व झेन्सार टेक्नॉलॉजीजचे डॉ. रितुराज पाटील हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.
पाटील पुढे म्हणाले, आजच्या तंत्रज्ञानप्रधान युगात समस्यांकडे वेगळ्या दृष्टीने पाहून त्यावर नाविन्यपूर्ण उपाय शोधणे हीच खरी प्रगतीची गुरुकिल्ली आहे. जिज्ञासा आणि प्रयोगशील वृत्ती जपल्यास विद्यार्थ्यांना भविष्यातील आव्हानांना समर्थपणे सामोरे जाता येईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
संचालक डॉ. अजित पाटील यांनी प्रास्ताविकमध्ये ‘हॅकॅत्सोव २०२६’ची संकल्पना स्पष्ट केली.
परुळेकर यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा दाखला देत समस्यांचे प्रभावी निराकरण करण्यावर भर दिला.
२४ तास झालेल्या या स्पर्धेत विविध अभिनव प्रकल्प सादर करण्यात आले. साताऱ्याच्या ज्ञानेश्री इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजीच्या विद्यार्थ्यांनी ‘सोनिक पे’ या प्रकल्पाद्वारे प्रथम क्रमांक पटकावला. वालचंद कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, सांगलीच्या विद्यार्थ्यांनी ‘बिट मॅनिप्युलेटर’ या महिलांच्या सुरक्षेसाठीच्या स्मार्ट उपकरणासह प्रथम उपविजेतेपद मिळवले, तर कोल्हापूर इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी संघाने ब्रेल-आधारित शिक्षण उपकरण सादर करून द्वितीय उपविजेतेपद पटकावले. विजेत्या संघांना एकूण ५०,००० रुपयांची पारितोषिके प्रदान करण्यात आली.
कुलपती डॉ. संजय डी. पाटील, संस्थेचे उपाध्यक्ष आमदार सतेज डी. पाटील, विश्वस्त ऋतुराज पाटील, विश्वस्त पृथ्वीराज पाटील, कुलगरू डॉ. राकेश कुमार शर्मा, कुलसचिव डॉ. व्ही. व्ही. भोसले यांचे मार्गदर्शन व प्रोत्साहन लाभले.