no images were found
एक फुल दो माली, एक तरुणी, दोन मित्र, एकाचा खून
दिल्ली : करोल बागेत मृतदेह गटारात आढळून आला होता. मित्राच्या प्रेयसीसोबत मैत्री केल्यानं नाराज झालेल्या मित्रानंच व्यावसायिकाची हत्या केल्याची माहिती पोलीस तपासात उघडकीस आली आहे. पोलिसांनी मृताच्या मित्रासह आणखी दोन आरोपींना अटक केली आहे.
पोलिसांनी धौलाकुआतील गटारातून व्यावसायिकाचा मृतदेह ताब्यात घेतला. त्याचं नाव मनिष आहे. ३३ वर्षांचा मनिष करोल बागेत मोबाईलचं दुकान चालवायचा. २१ ऑक्टोबरपासून मनिष अचानक बेपत्ता झाला. त्याच्या कुटुंबियांनी पोलिसात तक्रार दाखल केली होती. दुसऱ्याच दिवशी मनिषची कार धौलाकुआ येथे बेवारस स्थितीत सापडली. मनिषचं अपहरण झाल्याचा संशय पोलिसांना आला. त्यांनी तपास सुरू केला. पोलिसांनी मनिषचे कॉल रेकॉर्ड तपासले. दोन क्रमांकांवर त्याचा सर्वाधिक संवाद झाल्याचं तपासातून समोर आलं.
दोन मोबाईल नंबर कोणाचे आहेत याचा शोध पोलिसांनी घेतला. ते नंबर संजय आणि सीताराम यांचे होते. दोघेही राजस्थानच्या चुरुचे रहिवासी आहेत. पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतलं आणि चौकशी केली. संजय कोलकात्यात शेयर ब्रोकिंगचं काम करायचा. तो मनिषचा मित्र होता.
मनिष आणि संजय यांची एका तरुणीसोबत मैत्री होती. मनिषच्या मैत्रीमुळे संजय नाराज होता. त्यानं मनिषला भेटायला बोलावलं. संजयनं मनिषला त्याच्या (संजयच्या) प्रेयसीचा मोबाईल नंबर डिलीट करण्यास सांगितलं. पण मनिषनं नकार दिला. यानंतर संजयनं मनिषची हत्या केली.
आपल्या प्रेयसीसोबत मनिष मैत्री करतो याचा संजयचा राग आला होता. २१ ऑक्टोबरला तो कोलकात्याहून दिल्लीला आला. त्यानं त्याचा मित्र सीतारामलाही बोलावलं. दोघे मनिषच्या कारमध्ये दारु प्यायले. त्यानंतर त्यांनी मनिषचा गळा दाबून खून केला.