no images were found
कोल्हापूर विमानतळावर 3 नोव्हेंबरपासून नाईट लँडिंग
कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्याच्या सर्वांगिण विकासासाठी अत्यंत महत्वपूर्ण असलेल्या कोल्हापूर विमानतळावर 3 नोव्हेंबरपासून नाईट लँडिंग सुविधा सुरु होणार आहे. भारतीय नागरी विमान वाहतूक प्राधिकरणाकडूनही त्यासाठी हिरवा कंदिल देण्यात आला आहे.
एरॉनॉटिकल इन्फॉर्मेशन पब्लिकेशन (एआयपी) या प्रणालीवर प्रकाशित झाली आहे. ही सुविधा सुरू झाल्यानंतर अर्थातच विमानतळ 24×7 सुरु राहणार आहे. विमानतळाच्या वैभवात भर घालणारी टर्मिनल इमारतीचे बांधकामही वेगाने सुरु असून मार्च 2023 पर्यंत काम पूर्ण केलं जाणार आहे.
जगभरातील विमान कंपन्या, वैमानिकांना कोल्हापुरात नाईट लँडिंग सुविधेबाबतची माहिती एआयपी या प्रणालीवर प्रकाशित करण्यासाठी विमानतळ व्यवस्थापनाकडू पाठपुरावा सुरु होता. त्यामुळे नाईट लँडिंग सुविधा सुरू करण्याचा मार्ग मोकळा झाला.
राज्यसभा खासदार धनंजय महाडिक यांनी दिवाळी पाडव्याला कोल्हापूर विमानतळावर अचानक भेट देत 3 नोव्हेंबरपासून सुरु होत असलेल्या नाईट लँडिग सुविधेची पाहणी केली. यावेळी त्यांनी विमानतळावरील कर्मचाऱ्यांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. खासदार महाडिक यांनी कोल्हापूर विमानतळावरील नाईट लँडिंग अपग्रेड, रनवे लाइटिंग, अन्य विकास उपक्रम समजून घेतले.
दरम्यान, कोल्हापूर विमानतळावर धावपट्टीचे 1930 मीटरपर्यंत विस्तारीकरण पूर्ण झालं आहे. 1370 मीटर धावपट्टीवर नाईट लँडिंगची सुविधा उपलब्ध झाली आहे. या सुविधेसाठी सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून डीजीसीएच्या पथकाने पाहणी करून परवानगी दिली आहे.
दुसरीकडे कोल्हापूर ते हैदराबाद दरम्यान अलायन्स एअरची विमानसेवा अनिश्चित काळासाठी रद्द करण्यात आली आहे. रविवारी कोल्हापूर विमानतळावरून विमान कंपनीचे शेवटचे उड्डाण झाले. गेल्या दोन वर्षांपासून सेवा अविरत सुरु होती. अलायन्स एअरची विमानसेवा बंद झाल्यामुळे इंडिगो आणि स्टार एअरलाइन्स या दोनच कंपन्यांची हैदराबाद, मुंबई व तिरुपती या मार्गावरील विमानसेवा सुरू आहे.
गेल्या सहा महिन्यांत विमान कंपनीने अनेक वेळा उड्डाणे रद्द केली होती. त्यामुळे अनेकवेळा विलंब झाला होता. नवरात्र काळात उड्डाणे रद्द केल्याने तेलंगणा आणि आंध्र प्रदेशातील प्रवासी कोल्हापूर विमानतळावर दोन दिवस अडकून पडले होते. कोल्हापूर विमानतळावरून हैदराबाद मार्गावरील विमानसेवा बंद झाल्याने अलायन्स एअरची विमानसेवा पूर्ण बंद झाली आहे.