no images were found
शुभांगी अत्रे ऊर्फ अंगूरी भाबी संघर्षमय दिवसांबाबत सांगताना म्हणाल्या, ”मी बेघर होते”
एण्ड टीव्हीवरील मालिका ‘भाबीजी घर पर है’मध्ये अंगूरी भाबीच्या भूमिकेसाठी सर्वत्र लोकप्रिय झालेल्या शुभांगी अत्रे यांच्यासाठी स्टारडमचा मार्ग नेहमीच हास्य आणि कौतुकाचा नव्हता. एक काळ असा होता जेव्हा स्वप्ननगरीने त्यांच्या सहनशक्तीची परीक्षा घेतली, क्षणभर त्यांना राहण्यासाठी घर देखील नव्हते. पण प्रत्येक शक्तिशाली कथेप्रमाणे करुणा, बहिणभाव आणि अनपेक्षित दयाळूपणासह त्यांच्या जीवनाला हृदयस्पर्शी वळण मिळाले. संघर्षाच्या त्या सुरुवातीच्या दिवसांना उजाळा देत शुभांगी अत्रे ऊर्फ अंगूरी भाबी म्हणाल्या, ”असे वाटते तो क्षण कालच घडला आहे. मी पुण्यामध्ये माझ्या दहा महिन्यांच्या बाळाला मागे सोडून स्वप्ननगरी मुंबईत आले होते. तो मी जीवनात घेतलेला सर्वात कठीण निर्णय होता. एका महिन्यामध्ये मी एका मालिकेमध्ये काम करू लागले आणि प्रगतीच्या दिशेने वाटचाल सुरू झाल्याचे वाटत होते. पण नशीबात काही वेगळेच लिहिलेले होते. मी इतर काही मुलींसोबत पीजीमध्ये एकत्र राहत हाते आणि एकेदिवशी अधिक वेळ शूटिंग केल्यानंतर मी घरी परतले आणि मला मोठ्या संकटाचा सामना करावा लागला. घरमालकाने अचानक आम्हा सर्वांना घर खाली करण्यास सांगितले. हे ऐकताच आम्हाला धक्का बसला. मी शहरामध्ये नवीन होते, माझ्या बाळाची आठवण येत होती आणि आता राहण्यासाठी घर नव्हते. मी त्यावेळी मुंबईत कोणालाही ओळखत नव्हते. मी खूप दु:खी होते आणि पुण्याला परतण्याचा व माझ्या अभिनयाच्या स्वप्नाला सोडून देण्याचा विचार केला. पण सगळं काही बिघडत चाललंय असं वाटत असताना एक मैत्रिण जीवनात नवीन आशेचा किरण घेऊन आली.” त्या पुढे म्हणाल्या, ”त्या घाबरलेल्या आणि असहाय्यतेच्या क्षणी मी फक्त माझी जिवलग मैत्रिण आणि अभिनेत्री मेघा धाडेचा विचार करू शकत होते, जिला मी शूटिंग दरम्यान भेटले होते. मी तिला फोन केला आणि सर्व काही समजावून सांगितले. अजिबात संकोच न करता ती म्हणाली, ‘तू जिथे आहेस तिथेच थांब. मी तुला घ्यायला येत आहे.’ दिलेल्या शब्दाप्रमाणे तिने मला पिक अप केले आणि घरी नेले. तिने मला आश्रय दिला, आधार दिला आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे आशा दिली. मी तो क्षण कधीही विसरणार नाही.”
जीवनाला कलाटणी देणाऱ्या त्या क्षणाला उजाळा देत त्या पुढे म्हणाल्या, ”प्रत्येकाला अशी एक व्यक्ती हवी असते, जी जग तुमच्या विरोधात असतानाही मदतीसाठी धावून येते. माझ्यासाठी, मेघा ती व्यक्ती होती. तिने मला राहण्यासाठी जागा देण्यासोबत संघर्षमय दिवसांमध्ये माझ्यामध्ये आशेचा किरण देखील जागृत केला. आपण अनेकदा यश साजरे करतो, पण आयुष्यातील आव्हानात्मक क्षण आपल्या जीवनाला आकार देतात. मुंबईने माझी अनेक प्रकारे परीक्षा घेतली, पण मला मेघासारखे देवदूत देखील दिले. आजही, ती फोन करते तेव्हा मी तिच्यासाठी सर्वकाही सोडून वेळ देते. आमचे हे नाते मैत्रीच्या पलीकडे आहे, आम्ही बहिणींसारखे आहोत, ज्यांनी आयुष्यातील वादळांना एकत्र तोंड दिले आहे.”