no images were found
रुग्णवाहिका न मिळाल्याने बापानं बाळाचा मृतदेह बाईकच्या डिक्कीतून नेला
सिंगरौली : मृत अर्भकाला घेऊन जाण्यासाठी वडिलांना रुग्णवाहिका मिळाली नाही. त्यामुळे वडिलांना नाईलाजास्तव बाळाचा मृतदेह दुचाकीच्या डिक्कीत ठेऊन मदतीसाठी जिल्हाधिकारी कार्यालय गाठलं. सिंगरौलीतील जिल्हा रुग्णालयातील ट्रॉमा सेंटरमध्ये ही घटना घडली.
मध्य प्रदेशच्या सिंगरौली जिल्ह्यात एक दुर्दैवी घटना घडली आहे. प्रशासनाला लाज आणणारा प्रकार सिंगरौलीत घडला. दिनेश भारती त्यांची गर्भवती पत्नी मीना यांना घेऊन १७ ऑक्टोबरला जिल्हा रुग्णालयात पोहोचले. रुग्णालयातील डॉ. सरिता शाह यांनी प्रसुती करण्याऐवजी मीना यांना खासगी क्लिनिकमध्ये पाठवलं. वर त्यांच्याकडून ५ हजार रुपये घेतले. अर्भकाचा गर्भाशयातच मृत्यू झाल्याचं क्लिनिकमधील डॉक्टरांना समजलं.
त्यानंतर त्यांनी महिलेला पुन्हा जिल्हा रुग्णालयात पाठवलं. तिथे तिची प्रसुती करण्यात आली, तेव्हा बाळ मृतावस्थेत होतं. मृतदेह घेऊन जाण्यासाठी नातेवाईकांनी रुग्णालयाकडे रुग्णवाहिका मागितली. बाळाला गावी नेऊन त्याच्यावर अंत्यसंस्कार करायचे होते. मात्र रुग्णालयानं रुग्णवाहिका दिली नाही असा आरोप दिनेश भारती यांनी केला. यानंतर दिनेश यांनी बाळाचा मृतदेह दुचाकीच्या डिक्कीत ठेऊन जिल्हाधिकारी कार्यालय गाठलं.
दिशेन यांनी त्यांची व्यथा जिल्हाधिकाऱ्यांकडे मांडली. यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी एसडीएम यांना चौकशीचे आदेश दिले. अर्भकाचा मृतदेह घेऊन जाण्यासाठी रुग्णवाहिका न मिळाल्याची तक्रार मिळाल्याचं सिंगरौलीचे जिल्हाधिकारी राजीव रंजन मीणा यांनी सांगितलं. या प्रकरणी सिंगरौलीच्या एसडीएमना तपासाचे आदेश दिले आहेत. तपासानंतर दोषींवर कठोर कारवाई करण्याचं आश्वासन त्यांनी दिलं.